‘ती’ – २८

9 09 2017

‘ती’ चे वडिल गेले. सांत्वनासाठी मी फोन केला. ती अगदी शांत होती. हो-नाही करत मी ‘ती’ला विचारायचे धाडस केले, “मुलं जायची त्यांच्याकडे? तुम्हाला पुन्हा आपलंसं केलं होतं भाऊंनी?”. यांच्या वडिलांना सगळे ‘भाऊ’ म्हणायचे. शहरातील ते प्रसिद्ध असामी.

एवढ्या वर्षांच्या परिचयात या विषयावर आम्ही कधीच बोललो नव्हतो. वयाचा लिहाज़ हा महत्वाचा मुद्दा आणि ‘ती’चे मन जपणे हा सुप्त हेतू.

ती नेहमीप्रमाणे मनमोकळेपणाने बोलू लागली. “हो! या मे महिन्यात समेट झाला आमचा. मग येणं-जाणं सुरु झालं.” मला ऐकूनच खूप बरं वाटलं.
मी – “मुलगी आणि वडिलांचं नातं काही वेगळंच नाही का हो?”
ती – “हो ना! त्यांचं माझ्यावर जरा जास्तच होत तसं…समाधाने गेले भाऊ. त्यांनाही हे जवळ आलंय याची प्रचिती आली असावी.”

मला उगाच हलकं झाल्यासारखं वाटलं. ‘ती’च्या बोलण्यातही वेगळे समाधान जाणवत होते.

‘ती’ने वडिलांच्या मनाविरुद्ध जाऊन प्रेमविवाह केला होता. वडिलांनी सगळे पाश तोडून टाकले. ‘ती’ने त्याच शहरात राहून मस्त संसार फुलवला होता. सगळं आलबेल होतं. पुढं भावंडांनी ‘ती’च्याशी बोलणे-चालणे सुरु केले. तरी वडिलांचा रोष काही कमी होत नव्हता. यंदा जवळ-एक २६-२७ वर्षांनी मनं स्फटिकासारखी साफ झाली होती. त्यांतून परिवर्तित होणारा मायेचा प्रकाश, आनंदाचे-समाधानाचे सप्तरंगी इंद्रधनू होऊन ओसंडला होता. ‘ती’च्या प्रेमाच्या विजयाचा तो राजरोस स्विकार होता!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २७
‘ती’ – २६
‘ती’ – २५
‘ती’ – २४
‘ती’ – २३
‘ती’ – २२
‘ती’ – २१
‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape

Mother’s day!

14 05 2017

शुक्रवारची गोष्ट. सकाळी आॅफिसला निघायचे म्हणून दाराचे लॅच ओढले, गाडीपाशी आले आणि लक्षात आले – गाडीची चावी घरी विसरले. पटकन दाराकडे धाव घेतली. बेल वाजवली पण तोवर नवरा आंघोळीला गेलाच. शावरच्या आवाजात बेल त्याला ऐकू जाणे अशक्य! नशिबाने मी निघताना शिव उठला होता. मी आधी बऱ्याचदा बेल वाजवली. मग दारात उभं राहून हळूच त्याला हाक मारुन, “शिव, दार उघडतोस का प्लीज?” असं विचारु लागले. सलग बेल ऐकून तो कावराबावरा झाला होता. पपाला ‘बेल वाजतेय’ हे ओरडून सांगायचा त्याने निष्फळ प्रयत्नही केला. माझा आवाज ऐकून अर्ध्या पायऱ्या उतरुन, काकुळतीला येत मला विचारलं त्याने, “mom, where are you?”. मी दिसत नव्हते पण माझा जिन्यातून कुठूनतरी आवाज तर येत होता. तो बावरला हे लक्षात आले तेव्हा मी जरा गप्प झाले. वर चढताना त्याच्या पावलांचा आवाज आला. तो बाथरूमकडे धावला. बाथरुमचे दार जोराजोराने ठोकत, रडत त्याच्या पपाला ओरडून सांगत होता – “Papa, my mom is in danger! We need to rescue her…” नवरा आला तोच माझ्या नावाने शंख फोडत, त्याच्या मागून शिव पायऱ्या उतरत होता. पाण्याने डबडबलेले डोळे, रडवेला आवाज…मला बिलगला…मी निघाले आॅफिसला…त्याची ती व्याकूळता, माझ्यासाठीची धडपड, सगळंच सुखद, तितकचं अनपेक्षित…

दुपारी फोनवर काॅल येताना दिसला. माझ्या मैत्रिणीचा (जी शिवच्या मित्राची आई सुद्धा) होता. मी सहकाऱ्याशी चर्चा करत होते. मागोमाग मेसेज किणकिणला. Mother’s Day celebration ची त्यांच्या शाळेत tea party होती. त्यासाठी ती आली होती. शिव मला शोधतोय असं तिने लिहिले होते. माझ्या लक्षात असूनही मी कामात अडकले, वेळेत निघता आले नाही. मी शाळेत पोहचेपर्यंत पार्टी संपणार होती. बरीचशी मुलं आपल्या आईबरोबर लवकर घरी गेली. उरलेली मोजकीच मुलं बाहेर खेळत होती. माझी गाडी आत शिरताना बघून शिवचा चेहरा खुलला. आधी एक गोड हसू, आणि दुसऱ्या क्षणाला थोडीशी मान खाली, कपाळाला आट्या, डोळे लहान, राग दर्शविण्याची ही त्याची नेहमीची सवय…मी सरळ त्याच्या वर्गात गेले, त्याची बॅकपॅक घ्यायला. त्याच्या cubby ला शिवने माझ्यासाठी बनवलेले ग्रिटींग कार्ड पिन लावून लटकत होतं. ते वाचत हातात घेतलं…ते बघून गील्ट अजूनच वाढलं. Corridor मध्ये टिचरनेही तेच सांगितलं, शिव नाराज झाला. मी playground ला गेले तेव्हा आधी मला बघून न बघितल्या सारखं केलं. मग नेहमीचे “5 more minutes!”. Playground वरुन त्याला काढणं महाकठिण…कसंबसं त्याला गाडीत बसवलं. मग हळूहळू रागाने डोकं वर काढलं. अमक्याची आई आली होती, तमक्याची आई आली होती. “Mom, I am super angry and disappointed that you missed the mother’s day party.” अधेमधे माझं सबबी देणं सुरु होतं. “They also got coffee and TEA. No more tea for you…” त्याला माहितीए मला चहा आवडतो. मधेच त्याला ग्रिटींग कार्ड आठवले, “Oh! I even made a greeting card for you. We forgot it in school…”. “I got it Baby…It is AWESOME!!! मला खूपच आवडलं” – मी. मग तो रडायला लागला. “I want to give it you right now….stop the car!” घरी आल्या आल्या त्याने स्वत: मला ते दिलं तेव्हा तो जरा शांत झाला. गाडीपासून वरपर्यंत मला उचलून घे, हा हट्ट पुरा करुन, त्याला खाली ठेवताना, त्याचं ते “I missed you Mom…”

माझ्यापुरता Mother’s day कालच साजरा झाला…

‘ती’ – २७

17 01 2017

सकाळी ‘ती’ हाॅस्पिटल मधे दाखल झाल्याचे समजले. गेले वर्षभर ‘ती’च्या हाॅस्पिटलच्या वाऱ्या वाढल्या होत्या. २-३ दिवसात बरं वाटले की ती घरी येईल या विचारात असतानाच तिची तब्येत बिकट झाली व एका दिवसात सगळे संपले.

काही सुचायला मार्गच उरला नाही…

“आता तुझ्या घरच्यांना, माझ्या काकू (जिला आम्ही ‘आई’ म्हणतो) शी बोलून घ्यायला सांग. तू ही बोल जमेल तसं. घरात तीच मोठी आहे. एकदम साधी आहे. काही टेन्शन घेऊ नकोस. आमची मम्मी गेल्यावर हिनेच एका परीने आम्हाला लहानाचे मोठे केले. आम्ही तिला मानतो.” नुकतीच प्राथमिक पसंती झाली होती आमची, तेव्हा तो मुलगा (आताचा माझा नवरा) मला म्हणाला होता. देवाच्या दयेने योग जुळून आला व त्या माझ्या ‘अहो आई’ (चुलत सासू) झाल्या. अवघा ६-७ वर्षांचा ऋणानुबंध, (दूर राहत असल्यामुळे) एकून ८-१० भेटी. पण पहिल्या काही भेटींमधेच त्या फार मायाळू असल्याचा प्रत्यय आला…येतच राहिला.

आम्ही आमचे लग्न इंटरनेटवर ठरविले पण प्रत्यक्ष भेटलो ते त्यांच्या समोर. पुढे मग लग्नाची तारिख ठरविणे, खरेदी, कोर्ट मॅरेज, खरं लग्न, ती घाई-गडबड, त्यांचा तो उरक, सिद्धीविनायक, देव दर्शन. माझ्या माहेरी आम्ही गेलो, माझ्या कुलदैवतेला. केवढे आवडले होते त्यांना माझं माहेरचं घर, रत्नागिरी, गणपतीपुळे, सिंधुदूर्ग, समुद्र, भगवतीचे देऊळ! “हा पट्टा बघायचा राहिला होता. तुझ्यामुळे बघून झाला…” पायरी चढताना माझा हात धरत त्या म्हणालेल्या मला आठवतंय.

मी इकडे येऊन लगेच गाडी चालवायला लागले त्याचे कौतूक, काही नविन पदार्थ केला की मला कधी करून घालतेयस? हा प्रश्न…फार हौशी. माझ्या डोहाळ-जेवणाला हिरवी साडी लागते म्हणून त्यांनी कोणाकरवी ती पाठवून दिली होती. लोकांना तसदी होईल म्हणून आम्ही सांगत होतो, पण त्यांच्या मनात आले की त्यांनी ते केलेच समजा. मानव सुलभ डावे-उजवे त्यांच्या ठायीही होते. पण त्यांच्या मायेचे पागडे इतकं वजनदार होतं की त्यापुढे सगळे हलकंच. ‘ती’ने सगळ्यांवर भरभरून वेडी माया केली. एका अनाथ जीवाला आपले केले. त्याला नावं, घर, कुटुंब तर दिलेच पण ममता दिली. नवऱ्या पश्चात कष्ट करुन त्याला एकटीने हिंमतीने वाढवले.

आमच्यातले कुणा ना कुणाची वर्षातून एकदा भारतात फेरी होतेच. त्यांना नुसती कुणकुण लागली तरी त्या कंबर कसून तयारीला लागायच्या. कुठे चकल्या, चिवडा, लाडू, पापड-कुरडया, कुठे हळद-मसाला. वयोमानानुसार सगळे जमायचेच असे नाही. मग मुलं रागवणार, बॅगेत जागाच नाही तुझ्या खाऊ साठी सांगणार आणि निमूटपणे तिने बनविलेले  सगळे बॅगेतून इकडे येणार आणि मग आम्ही त्यावर ताव मारणार. हे गेली अनेक वर्ष मी बघत आले आहे. “मी जिवंत आहे तोपर्यंत मी बनवणारच.” हे त्यांचे बोलणे त्यांनी खरे करुन दाखविले.

प्रत्येक सणा-सुदीला काय-कसे करायचे हे त्या सांगायच्या. त्यातले सगळे करायला जमायचेच असे नाही. इकडे अमेरिकेत अमुक-तमुक गोष्ट मिळत नाही किंवा करता येत नाही हे कळल्यावर त्या आधी अमेरिकेच्या नावाने बोटं मोडायच्या व मग स्वतःच त्यातील पळवाटा सुचवायच्या. फार गंमत वाटायची. (अमेरिकेवर तसाही त्यांचा रोष होता. काय करणार? अमेरिकेने त्यांच्या लाडक्या मुलांना त्यांच्यापासून लांब केलं होतं.) कुळाचार करावा हा त्यांचा आग्रह होता पण हट्ट नव्हता. त्यांचे विचार सुधारित होते. म्हणूनच जाती बाहेर प्रेमविवाह करणाऱ्या आपल्या पुतण्याच्या मागे त्या ठामपणे उभ्या राहिल्या, तो ही दीराचा राग ओढवून व विरोध पत्करुन. त्यांच्यासाठी त्यांच्या मुलाचा आनंद इतर कुठल्याही गोष्टापेक्षा अधिक महत्वाचा होता.

त्या फार शिकलेल्या नव्हत्या पण वाचन पुष्कळ केले होते. खूप फिरल्या होत्या. यादोन्हीचे श्रेय त्या दिवंगत नवऱ्याला द्यायच्या. कधी प्रसंगी दोन कवितेच्या ओळीही सुचायच्या त्यांना…कुठे नात्यात लग्न, कार्य निघाले की त्या निघायला एका पायावर तयार. अगदी हल्लीच त्या ‘द्वारका’ बघून आल्या, मुला-नातवंडांसाठी आशिर्वाद मागून आल्या.

त्या कधी कुणाबद्दल वाईट बोलल्याचे मला स्मरत नाही. अलीकडे मात्र त्या बोलताना हळव्या व्हायच्या. जुन्या आठवणी सांगत बसायच्या. “तुला सांगते रुही,….” अशी सुरुवात करुन मनातला एखादा सल हळूच डोकं वर काढायचा.

ठेंगणी – बैठी मूर्ती, गहू वर्ण, पिकलेले केस, कपाळावर गोंदलेले बारिक कुंकू, सांधेदुखीमुळे थोडे अडखळत चालणे, नाशिक-धुळे कडील बोलायची लकब, प्रचंड उत्साह, फिरायची हौस आणि ऐकूनच जगण्याची हौस!

काॅफी, चाॅकलेट, आईस्क्रिम, आणि मसाला डोसा खास आवडीच्या गोष्टी. आत्ताही कुणी लहानगी आजीसाठी, (तिला लवकर बरं वाटावं म्हणून) कॅडबरी घेऊन आली होती. ती कॅडबरी तशीच पडलीए अजून फ्रिज मधे. त्या ती न खाताच निघून गेल्या…कायमच्या…कुणालाही कसलीही पूर्व-कल्पना न देता…त्यांचे त्यांनाही न उमजता!

या मकरसंक्रांतीला, उत्तरायणात शिरणारा सुर्य, आधीच्या पिढीचा, शेवटचा प्रतिनिधी असलेला एक तेजस्वी तारा घेऊन मावळला.

फोन केल्यावर, “हा बोल बेटा…” अशी मायाची हाक आता कायमची बंद झाली!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २६
‘ती’ – २५
‘ती’ – २४
‘ती’ – २३
‘ती’ – २२
‘ती’ – २१
‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape

गजरा

25 08 2016

पायऱ्यांपलिकडे जमिनीत लावलेला जाई-जुईचा वेल टेलिफोनच्या वायरचा आधार घेऊन वर गच्चीपर्यंत गेला आणि तिथे बहरू लागला. अंगणातून चार पायऱ्या चढून वर कुणी दाराशी आलं की, आतून कुणी, दार उघडेस्तोवर हा फुलांचा सुगंध येणाऱ्याचे स्वागत करायला आधीच सज्ज असायचा.

दर संध्याकाळी वर गच्चीत जाऊन जाई-जुईच्या कळ्या वेचून त्यांचा गजरा करणं हा आईचा नियमित कार्यक्रम! एकावेळी २-३ गजरे सहज होतील एवढ्या कळ्या… संध्याकाळ जशी कूस बदलून काळोखाकडे मुखडा फिरवी तशा या गजऱ्यातील टपोऱ्या कळ्या उमलून फुलांच्या चांदण्या होऊन जायच्या, सुगंधू लागायच्या.

एखादा गजरा स्वत:ला ठेऊन बाकीचे गजरे कुणाच्याही नशिबी यायचे. कधी कुणी शेजारीण तो आंबाड्यात रोवून मिरवायची, कधी घरी आलेली पाहुणी, तर कधी कामवाली बाई तो माळून टाकायची. हा परिपाठ अनेक वर्ष सुरू होता, अगदी तिचे गुढगे साथ देईपर्यंत… नंतर तिला जिने चढणे जमेना. म्हणून की काय कल्पना नाही पण जाई-जुईच्या वेलींनी आपला बहर कमी केला.

पुण्यात सिग्नलला कुणी ना कुणी वासाचे गजरे विकत असायचे. माझाही एक ठरलेला गजरेवाला होता. आधी गजऱ्यासाठीचा आग्रह, मग ओळखीचा सुप्त होकार. मी नेमाने गजरे घेऊ लागले. त्यालाही माहित होते, अचानक सिग्नल सुटलाच तर मी पुढे जाऊन गाडी बाजूला ओढणार आणि पैसे चुकते करणार. अर्थात तो घेतलेला गजरा मी केसात न माळता, गाडीच्या rearview mirror वर लावायचे. त्या सुवासात माझी आई जवळ असल्याचा भास होता!

आॅफिसात अशीच एक मुलगी गजरा माळून यायची. ती आली की त्याच ओळखीच्या वासाने मनं एकदम प्रफुल्लीत व्हायचे. तिच्याशी माझी घट्ट मैत्री झाली, गजऱ्यातल्या घट्ट विणेसारखी.

गजरा दिसला की आठवते ती माझी आई, तिचे फुलांसाठीचे वेड, माझं घर, तो वेल, तो गजरेवाला, आणि माझी मैत्रिण… सगळं खूप जिव्हाळ्याचं, खूप मना जवळचं, अगदी मनभावन!

आज अनेक वर्षांनी मनाच्या बंद कुपीतला तो गजऱ्याचा सुवास निसटून, मनात घमघमू लागला. मनाचं आणि आठवणींचं अजबच नातं आहे. मनात आठवणी ओत-प्रोत भरून वाहत असतात आणि मनं त्याच आठवणींत रमत असते…

************
Page copy protected against web site content infringement by Copyscape

‘ती’ – २६

8 06 2016

‘ती’ तशी सामान्य मुलगी. हुषार या पठडीत मोडली जाणारी. माझ्याने वयाने मोठी तरी आमची मैत्री! लग्नाचं वय होण्या आधीच घरच्यांनी वरसंशोधन सुरु केले. काही सकारात्मक घडत नव्हते. कधी समोरुन नकार येई, कधी मुलाचे शिक्षण कमी म्हणून नकार कळवावा लागत होता. असे करत जेव्हा लग्नाचे वय आले तेव्हा ती काहीशी निराशेकडे झुकत चालली होती.

आपण लग्नाळू तेव्हा होतो जेव्हा, आपल्याला स्वत:ला जोडीदाराची गरज भासते, कोणी न सांगता/मागे लागता आपण लग्नासाठी पुढाकार घेतो. मग अगदी प्रत्येकात नाही पण समोर येणाऱ्या, जवळपासच्या व्यक्तीत आपण संभाव्य साथीदार आढळतोय का ते चाचपतो. वय, आवडी-निवडी, स्वभाव, आपल्या जातीतला/ली आहे की नाही हे व असे अनेक criteria ठळक होत जातात. त्यात कोणी बसतंय का ते मनोमन पडताळले जाते.

अशातच ‘ती’ची त्याच्याशी ओळख झाली. तो तिच्याच गावातला, अतिशय हुषार, काहीसा विक्षिप्त म्हणून ओळखला जाणारा. ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले. कधी कधी मैत्रीसाठी समान बुद्ध्यांक गरजेचा असतो. थट्टा-मस्करी, रुसवे-फुगवे, रुठना-मनाना सुरु झाले. एकदा त्याने म्हणे त्याच्या चुकीसाठी हिला “I’m sorry!”  असं infinite loop मध्ये म्हणणारा computer program लिहून पाठवला होता. पुढे तो गाव सोडून पुण्यात निघून आला व त्यांचा संपर्क तुटला.

दोघांशी छान संबंध असल्याने मी दोघांच्या संपर्कात होते. तिने माझ्याकडे मन मोकळे केले तेव्हा खरंतर मला जरा धक्का बसला कारण मी दोघांना ओळखत होते व दोघांमधे बरेच वेगवेगळेपण होते. एव्हाना त्याच्याशी माझी चांगली मैत्री जमली होती. पण मैत्रीत काही बंधने पाळावी लागतात. शिवाय त्याने काहीच न सांगितल्यामुळे मी सरळ विषयाला हात घालणे योग्य नव्हते.

तिने मला त्याची भेट घडवून आण अशी विनंती वजा ईच्छा दर्शविली. मी पण मदत करायचे ठरविले. शिवाय माझा सहभाग फक्त भेट करुन देण्या इतकाच असणार होता.

ती अनायसे पुण्यात मुलं बघायला येणार होती. त्यातच एक दुपार तिने राखून ठेवली त्याच्यासाठी. लाॅजवर ती उतरली होती. आई-वडिलांचीही भेटीला संमती होती. ते दोघे काही कामाचे निमित्त काढून (नेमके) दुपारी बाहेर पडले. मी तिच्या खोलीवर गेले. त्याला फोन लावला व तिला भेटायची ईच्छा असल्याचे सांगितले. त्याने भेटण्यास सरळ नकार न देता, काही न पटणारी कारणे देऊन भेट टाळली. तरी आम्ही संध्याकाळ पर्यंत वाट पाहिली. मग ती काय समजायचे ते समजून गेली. मी ही फार काही न बोलता तिथून निघाले.

डोक्यात विचारतक्र चालू होते. ती काही त्याच्या प्रेमात होती असे नाही पण त्याच्यातले काहीतरी (किंवा एखादा पैलू) तिला पटले होते. म्हणून तिला एक प्रयत्न करावासा वाटला. तो तर नामानिराळाच राहिला. तो विषय तिथेच संपला!

पुढे दोघांना अनुरुप जोडीदार मिळाले. ‘ती’च्या मुळे मी यात गोवली गेले. कोणाला मदत होत असले तर काय वाईट या विचाराने मी सरसावले होते. आम्हा तिघांसमोर असा काही पेचप्रसंग त्या दुपारी समोर ठाकला होता, याची आम्हा तिघांशिवाय विशेष कुणाला कल्पना नव्हती!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २५
‘ती’ – २४
‘ती’ – २३
‘ती’ – २२
‘ती’ – २१
‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape

‘ती’ – २५

4 12 2015

‘ती’ची मुलगी नुकतीच एक वर्षाची झाली. मुलीच्या येण्याने घरातलं वादळ क्षमलं नाही. पण त्या वादळाचा वेग मात्र मंदावल्या सारखा झालाय. त्याची धार बोथट झाली आहे काहीशी. ‘ती’च्या मुलीच्या रुपाने ‘ती’ला जगण्याचे निमित्त मिळाले. नाहीतरी ज्याच्यासाठी ‘ती’ जगत होती, त्याला ‘ती’ची किंमत कुठे होती?

‘ती’ उच्च शिक्षित. मध्यमवर्गीय, सुशिक्षित कुटुंबात जन्मली, वाढली. कॉलेज मध्ये गरिब मुलाच्या प्रेमात पडली. हट्टाने त्याच्याशी लग्न केले. त्याने मात्र पैशालाच सर्वस्व मानले. पैशामागे धावण्यात तो गुंग. त्याच्या मागे धावण्यात हिची फरफट. दोघांतही काही वैद्यकीय दोष नाही पण तरी मुलं झालं नाही. वय निघून जाऊ लागले तसे इतर वैद्यकीय उपायांसाठी तिची तगमग सुरु झाली. त्यातही त्याचा वाटा शून्य. त्याच्या घरी ‘ती’ नकोच होती आधीपासून. त्यात हे कारण म्हणजे ‘आगीत तूप’. मुल दत्तक घेण्याचे ठरले. त्यासाठीचे सोपस्कारही सुरू झाले. त्याच्या आई-वडिलांनी बंड पुकारला की दत्तक मुलं नकोच. तो बिथरला. सगळे जुळत आले असताना अचानक त्याने माघार घेतली. दोघे वेगवेगळीकडे राहू लागले. प्रेम, काळजी, आदर, आस्था त्याच्या गावीच नव्हती. किंबहुना बायकोशी कसे वागायचे हे त्याला माहितच नाही. तशी सुसंकृतपणाची शिकवणच नाही मुळी त्याला घरातून.

मधल्या काळात पुला खालून बरेच पाणी वाहून गेले. ‘ती’ने अखेर एक मुलगी दत्तक घेतली. त्याने वकिलासमोर ‘ना हरकत’ दर्शवत वडिल म्हणून दत्तकपत्रावर सही केली. ‘ती’ने मुलीची सगळी जबाबदारी एकटीच घेणार हे त्याला निक्षून सांगितले. अवघ्या दोन दिवसांचं ते गोंडस बाळ बघून तो कदाचित हलला असावा. ‘ती’ आत्ता ताकही फुंकून पिणार होती. एकत्र राहायला ‘ती’ तयार होती पण आई-वडिलांना सोडून तो राहणार असेल तरच. ‘ती’ ला पुन्हा विषाची परिक्षा नको होती. तो त्यावर अडून बसलेला. पुन्हा त्याच त्याच विळख्यात अडकलेला. अधे मधे मुलीला भेटायला येणारा तो, गेले काही महिने फिरकलाच नाही. ‘ती’ तिच्या मुलीला काहीच कमी पडू देत नाही.

या सगळ्यात ते बाळ छान मोठं होतंय. त्या दोघी मायलेकीचं आता एक वेगळं विश्व आहे. त्या बछडीला बाहेरच्या जगात काय चाललंय याची कल्पना नाही. ती, ‘ती’चं सर्वस्व आहे हे मात्र त्या चिमुकलीला चांगलंच उमगलंय!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २४
‘ती’ – २३
‘ती’ – २२
‘ती’ – २१
‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape

‘ती’ – २४

17 11 2015

माझा मित्र ‘ती’च्या प्रेमात वगैरे होता. ती त्याच्याच कॉलेज मधली, त्याची ज्युनियर. माझेही स्टडी सेंटर तेच कॉलेज. त्याने कधीतरी ‘ती’ची तोंडदेखली ओळख करुन दिली. मला फक्त तिचं नावं लक्षात होतं.

एके दिवशी अचानक कोणीतरी मुलगी मला भेटायला माझ्या शक्रवारपेठेतल्या रुमवर आली. तिने नाव सांगितले तरीही मी तिला पाहून जरा गोंधळलेच. मग तिने माझ्या मित्राचे नाव घेतले. आणि लगेच लिंक लागली. ‘ती’ त्याची ती होती तर…

ती काही कामासाठी मी राहते तिथे आली होती व तिला काही पैशांची गरज होती. त्याने तिला सांगितले असावे की मी त्याच परिसरात राहते. ती माझा माग काढत माझ्याकडे आली. रक्कम अगदीच शुल्लक नव्हती. पंधरावर्षा पूर्वी तेवढ्या पैशात अर्ध्या महिन्याचे मेसचे जेवता येऊ शकत होते. ‘ती’ने हे पैसे त्याला लगेच द्यायला सांगते असे म्हणून गळ घातली. मीही तयार झाले. नशिबाने तेवढे होते माझ्यापाशी. तिचे धन्यवाद वगैरे स्विकारुन मी पैसे दिले व ते पैसे स्विकारुन ‘ती’ निघून गेली.

ती जाताच माझ्या मैत्रिणीने मला फटकारलेच की विसर आता हे पैसे. तिची बत्ताशी खरी निघेल हे वाटलेच नव्हते तेव्हा. ‘ती’ गेली ती गेलीच. नंतर ती काही मला भेटली नाही. तो भेटला काही वेळा पण कुठेकाही मागमूस नाही. मी सुद्धा स्वत:हून पैसे परत मागितले नाहीत. असतात आपले काही घेणेकरी असा विचार करुन मी त्यांवर पाणी सोडले. माणूस चुकून विसरतो कधीतरी.

मुद्दा तो नाहीच मुळी, ज्यावेळी मी तिला मदत केली त्यावेळी शिक्षण, पुस्तकं, पार्ट-टाईम नोकरी, रुमचे भाडे, मेसचा डब्बा या सगळ्यांत महिन्याचा हिशेब जुळवणे ही कसरतच होती. घरुन पैसे घेणं मी जवळ-जवळ बंद करुन टाकलं होतं. जे करायचं ते स्वत:च्या बळावर हा नारा. त्यात हा भुरदंड (तेव्हा) मोठा होता. ‘ती’ला ते विसरणे फारच सहज, सोईस्कर व सोप्पं होतं. आणि मला…?

पुढे तिचे त्याच्याशी लग्न झाले. दोघांनी भरपूर पगाराच्या नोकऱ्या पटकावल्या. परदेशात राहिले बरीच वर्ष. त्यात आनंदच आहे. मधली काही वर्ष संपर्क तुटला. जुना विषय तर मी केव्हाच विसरले होते पण एक माणूसकी म्हणून ‘ती’ने नुसती आभासी ओळख तरी ठेवावी ना? ते ही नाही… आज एवढा काळ लोटल्यावर मी थोडीच पैसे परत दे म्हणणार आहे?

काही माणसं त्यांच्या विशिष्ट वर्तवणूकीमुळे लक्षात राहतात. ‘ती’ त्यांतलीच एक!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २३
‘ती’ – २२
‘ती’ – २१
‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape
%d bloggers like this: