माझी ‘सिल्की’

9 10 2010
ती माझ्या आयुष्यात येऊन ६ वर्ष होत आली आहेत. अजुनही तो दिवस मनात लख्खं आठवतोय जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिले होते. …एखादी छोटीशी वस्तू खरेदी करायला जावे इतके सहज आम्ही तिघे (मी, माझी जिवलग मैत्रिण आणि माझा लहान भाऊ) तिला आणायला गेलो होतो. तिकडे पोचलो आणि वरच्या मजल्यावर काही final formalities करत होतो, तेवढ्यात डिलरचा माणूस खिडकीतून बोट दाखवत म्हणाला होता – “ती… ती दिसतेय ना… ती तुमची.” आम्हाला तिचा top view मिळाला. खाली आमची ‘सिल्की’ मस्त आंघोळ करुन तयार होती. तिची रीतसर पूजा करुन तिला घरी आणली. रत्नगिरीच्या घरुन आणि मित्र-मैत्रिणींचे अभिनंदनाचे फोन वर फोन सुरु होते. आणि तिचे कौतुक करताना मनं अधिकाधिक आनंदीत होत होते. अशा प्रकारे ‘सिल्की’ ने माझ्या आयुष्यात प्रवेश केला आणि पार ह्रुदयाचा ताबाच घेऊन टाकला.
 
नोकरीत बर्‍यापैकी स्थिरावले तेव्हा गाडी घ्यायच्या खुमखुमीला सुरुवात झाली. किंबहुना आपली स्वता:ची गाडी असावी हे स्वप्नंच होते आणि देवाच्या दयेने ते वयाच्या पंचविशी आधी पूर्ण झाले. गाडी कोणती घ्यायची हा प्रश्न उद्भवलाच नाही कारण ‘झेन’ मनात आधी पासुनच भरली होती. ड्रायविंग शिकायला क्लास लावायचे ठरले. मी आणि माझ्या दोन मैत्रिणी. सैनादत्त पोलिस चौकी जवळच्या ‘काळे ड्रायविंग स्कूल’ मध्ये जाऊन आलो कारण तेच घराच्या सगळ्यात जवळ होते. १२००/- (लायसन्स सहित) ८ तासांसाठी फी. तिघींनाही ऑफिस वेळेला सोईस्कर म्हणून सकाळी ६ ची पहिली बॅच ठरवली. ऐन थंडीच्या दिवसात, कुडकुडत, ५:४५ ला, २ सन्न्यांवर (सन्नी चे बहुवचन) आमच्या स्वार्‍या निघायच्या. आम्ही पोहचलो की फक्त ड्रायविंग स्कूलचे संचालक स्वत: ‘काळे’ हजर असायचे. ते दुकान उघडायचे. मग आम्ही चौघेजणं टपरीवर चहा घ्यायचो. शिक्षक आले की आम्ही ड्रायविंगसाठी निघत असू. सुरुवातीचे काही दिवस बरे गेले आणि मग दर दिवशी नविन शिक्षक असा लोचा सुरु झाला. सकाळी ६ ला येण्याचे सगळ्यांच्या जीवावर येत असावे. कधी कधी आम्ही काळेंबरोबर त्यांच्या ‘स्कॉर्पियो’ मधून सरांना आणायला त्यांच्या घरी कोथरुडला जायचो आणि मग येऊन क्लास सुरु व्हायचा. शेवटी अनेक विनवण्यावजा तक्रारी करुन एक शिक्षक मिळाला जो क्लास संपेपर्यंत टिकला. एक-एक गमतीशीर शिक्षक आम्हाला लाभले. पहिले सर आम्हा तिघींना “power puffed girls” म्हणायचा. शेवटचा सर तर अजून सही होता. आमचा steering चा control गेला की तो ओरडायचा “गाडी कुठे चालली बघा…गाडी कुठे चालली बघा…” ‘ट्रॅफिक’ ला “ट्रोपिक” म्हणायचा. गाडीचा स्पीड कमी झाला की म्हणायचा “गाडी पळवा..पळवा..!”. शेवटी शेवटी तो आम्हाला कात्रजच्या घाटात पण सरावासाठी घेऊन गेला होता. ते सगळे आठवले की आता गंमत वाटते.
 
गाडी चालविण्याचे विविध धडे शिकण्याची ठिकाणे ही ठरलेली होती. रिवर्स गिअरच्या सरावासाठी सैनादत्त समोरच्या मोठ्या कॉलनीतले रस्ते होते. हाफ-क्लच शिकायला ‘गरवारे पुला’ हून वैकुंठ कडच्या वळणाचा छोटासा चढाव होता. गाडी स्वत: पहिल्यांदा चालविली ती म्हात्रे पुला जवळच्या १०० फुटी डी.पी रस्त्यावर. अजूनही त्या-त्या स्पॅटहून जाताना सर्व डोळ्यांसमोर उभे रहाते.
 
ज्या दिवशी सकळी permanent license ची driving test दिली त्याच दिवशी दुपारी ४ ला ‘सिल्की’ ची चावी हातात घेतली. २००५ ला ‘गणेश जयंती’ च्या मुहुर्तावर सिल्कीला आणले. तिचा रंग Silky Silver’ म्हणून मी आणि माझ्या मैत्रिणिचे तिचे बारसे केले. बाळाचे नाव ‘सिल्की’ ठेवण्यात आले. 🙂

सिल्की माझी सर्वत्र सोबत करु लागली आणि माझी सखी बनली. दर दिवशी तिला ऑफिसात नेऊ लागले. लहानपणी ती एका मोठ्या आजारपणातून वाचली. एका दिवशी तिला  ऑफिसला नेले नाही आणि नेमके त्याच दुपारी पहिला पावसाचे मोठे वादळ झाले.  माझ्या लाडक्या सिल्की वर समोरचे झाड पडले. ती तेव्हा अवघी ३ महिन्यांची होती. ऑफिस मधून घरी येई पर्यंत जीव कासावीस झाला होता आणि आल्यावर माझ्या सिल्कीची दशा बघून तर पार काळीज कळवळले माझे. त्यात कमी म्हणून की काय – काही झोपडपट्टीतले लोक तिच्या टपावर चढून, जाळणासाठी लाकूड मिळेल म्हणून कोयतीने त्या झाडाच्या फांद्या तोडत होते. त्याचे घाव सिल्कीवरही पडत होते. मी अक्षरश: त्यांच्या पाया पडून त्यांन गाडीच्या टपावरुन खाली उतरवले. मग काही मदतीचे हात घेऊन कसेबसे ते झाड बाजूला केले. आणि तडक घरी रत्नागिरीला फोन करुन भावाला बोलावून घेतले. तो ही हे ऐकून लगेच रात्रीच्या बसने निघाला. घर सोडून पुण्याला १० वर्ष राहिले. एवढ्या वर्षात फक्त दोनदा घरी फोन करुन मी रडले – एकदा घर सोडून आले त्याच्या दुसर्‍या दिवशी आणि एकदा सिल्कीवर झाड पडले तेव्हा. पुढे insurance चे सोपस्कार करुन गाडी कामाला दिली. तब्बल महिन्याभराने माझी सिल्की बरी होऊन घरी आली. आणि त्यानंतर ‘मी तिथे ती” हा नियम करुन टाकला. जे काही व्हायचे ते माझ्या बरोबर होऊदे.

माझ्या बरोबर ती (की तिच्याबरोबर मी???) आम्ही खूप खूप फिरलो. पुण्यातल्या ट्रॅफिक मध्ये, पेठांमधल्या चिंचोळ्या रस्त्यांतून, नागमोडी वळणे घेणार्‍या निसर्गरम्य घाटांतून, हिरव्यागार डोंगरांच्या पायथ्यांशी, अथांग समुद्रकिनारी, धो-धो पावसातल्या मुळशी-ताम्हिणीत, रख-रख उन्हाळ्यात नगर जिल्ह्यातल्या निघोज-टाकळी-ढोकेश्वरला, निळकंठेश्वरला जाणार्‍या जलमय वाटेतून, पहाटे-पहाटेच्या असंख्य भटकंतींसाठी, रामदरा, मोराची चिंचोळी, रांजणगाव, थेऊर, मोरगाव, भुलेश्वर, कानिफनाथ, अम्रुतेश्वर, बनेश्वर, सासवड, बालाजी, नारायणेश्वर, जेजुरी, मयुरेश्वर, सिंहगड, लवथालेश्वर, घोरवडेश्वर, तळेगाव, पाषाण लेक, वढु, तुळापुर, कोल्हापुर, पन्हाळगड, ते मैसूर-बंगळूरू पर्यंत, कित्ती नावे घेऊ आणि हिचे कित्ती कित्ती आभार मानू? प्रत्येक भटकंतीची खास आठवण आहे. मी काढलेला प्रत्येक फोटो आणि माझ्या भटकंतीच्या ब्लॉग वरचे लिखाण, सिल्कीने मला त्या-त्या ठिकाणी सोबत केल्यामुळेच आहे. सिल्कीने मला असंख्य आनंदाचे क्षण दिले. आणि म्हणूनच तिला आलेला छोटासा स्क्रॅच पण मला स्वत:वर झालेल्या एखाद्या जखमे एवढा वेदनादाई भासत असे आणि दु:ख देत असे. तिची योग्य काळजी घेत होते. वेळेवर तिची servicing व maintenance करत होते.
 
दिवसेंदिवस ड्रायविंग सुधारत जात होते. ऑफिस खालच्या छोट्याशा पार्कींग लॉट मधे पण सफाईदारपणे गाडी पार्क करता येऊ लागली. भावाकडून त्याच्या driving secrets and tips ची शिकवण मिळत होती. टायर puncture झाला की जॅक कसा लावायचा, एकटीने स्टेपनी कशी बदलायची हे सगळे काळांतराने जमू लागले. दिवसांचे महिने झाले आणि महिन्यांची वर्ष. पाच वर्षांचे कार लोन चार वर्षात फेडून सिल्कीला मी कायमचे आपले करुन टाकले. आत्ता ती सर्वस्वी ‘माझी’ आहे. RTO कडून मिळालेल्या नविन RC Smart card वर तिची मालकीण म्हणून माझं नाव आहे.
 
लग्न करून परदेशी जायची वेळ जवळ आली तसे सगळे विचारु लागले – “तू गाडीचे काय करणार आहेस? विकणार आहेस का गाडी?” मला उत्तरादाखल काहीच सुचत नसे. सिल्कीला विकू??? ही कल्पनाच माझ्या विचारांच्या पलिकडची होती आणि कायम असेल. ती माझ्या आयुष्यात नाही हे मी सहनच करु शकत नाही. शेवटी तिला माहेरी, माझ्या भावाच्या सुखरुप हातात सोपवून मी परदेशी आले. तो तिची १०१% माझ्याहून जास्त कालजी घेत असेल यात काहीच शंका नाही परंतु तरीही मी तिची चौकशी करत असतेच. हे माझे वेड समजणार्‍या काही मोजक्याच व्यक्ती आहेत. कारण त्यांचे पण सिल्कीवर तेवढेच प्रेम आहे. ‘राहुल’ – माझा भाऊ, ‘प्रज्ञा’ – माझी जिवलग मैत्रिण (ह्या दोघांबरोबरच मी सिल्कीला आणायला गेले होते) आणि माझी अजून एक जिवाभावाची मैत्रिण ‘नयना’.
 
बरेच दिवस भावाला विनवण्या करत होते की वेब कॅम वर मला सिल्की दाखव. शेवटी त्याला आज मुहुर्त मिळाला. सिल्कीला video chat वर बघून मनं भरुन आले. chat संपले आणि तिच्या अनेक आठवणी जाग्या झाल्या – तिच्या पहिल्या भेटी पासून ते अगदी मला airport वर सोडायला येई पर्यंतच्या. आज अचानक मी माझ्या सिल्कीच्या आठवणीने हळवी झाले. I miss u Silky…I miss u a lot!

Page copy protected against web site content infringement by Copyscape

Advertisements

अंमलबजावणी

Information

10 responses

21 08 2011
dr avinash

khupach chan lihile aahes. kharach ashi attatchment hote

23 12 2010
tonmay0903

छानच!

विसरायचा प्रयत्न फार केला
परत परत समोर येतेस,
सहवासातल्या धुंद क्षणांचे रंग
अचानक उधळून जातेस.

14 10 2010
abhijit pendharkar

मस्त झालेय पोस्ट!
बाय द वे,

कानिफनाथ, अम्रुतेश्वर, नारायणेश्वर, मयुरेश्वर, लवथालेश्वर, घोरवडेश्वर

ही ठिकाणं कुठे आहेत?

12 10 2010
bhagwanagapurkar

Namaskar
silkichya changalya athwani

Bhagwan

11 10 2010
11 10 2010
prasad

u brought her alive for us….i had seen her couple of times…but today she seems special…madhe palio detana asach kahisa halwa zalo hoto…
next time punyala ali ki agodar silkya la punyat bolav 🙂

11 10 2010
Shishir

Keep on writing Ruhi…

10 10 2010
SANGEETA

SUNDER LEKH LIHILE AHE, SILKY CHE CHAN VARNAN KELE AHE!!!!

23 10 2010
medha

khoop chhan lihile aahes…

10 10 2010
Maithili

खूप मस्त झालिये पोस्ट…. 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s
%d bloggers like this: