‘ती’ची मुलगी नुकतीच एक वर्षाची झाली. मुलीच्या येण्याने घरातलं वादळ क्षमलं नाही. पण त्या वादळाचा वेग मात्र मंदावल्या सारखा झालाय. त्याची धार बोथट झाली आहे काहीशी. ‘ती’च्या मुलीच्या रुपाने ‘ती’ला जगण्याचे निमित्त मिळाले. नाहीतरी ज्याच्यासाठी ‘ती’ जगत होती, त्याला ‘ती’ची किंमत कुठे होती?
‘ती’ उच्च शिक्षित. मध्यमवर्गीय, सुशिक्षित कुटुंबात जन्मली, वाढली. कॉलेज मध्ये गरिब मुलाच्या प्रेमात पडली. हट्टाने त्याच्याशी लग्न केले. त्याने मात्र पैशालाच सर्वस्व मानले. पैशामागे धावण्यात तो गुंग. त्याच्या मागे धावण्यात हिची फरफट. दोघांतही काही वैद्यकीय दोष नाही पण तरी मुलं झालं नाही. वय निघून जाऊ लागले तसे इतर वैद्यकीय उपायांसाठी तिची तगमग सुरु झाली. त्यातही त्याचा वाटा शून्य. त्याच्या घरी ‘ती’ नकोच होती आधीपासून. त्यात हे कारण म्हणजे ‘आगीत तूप’. मुल दत्तक घेण्याचे ठरले. त्यासाठीचे सोपस्कारही सुरू झाले. त्याच्या आई-वडिलांनी बंड पुकारला की दत्तक मुलं नकोच. तो बिथरला. सगळे जुळत आले असताना अचानक त्याने माघार घेतली. दोघे वेगवेगळीकडे राहू लागले. प्रेम, काळजी, आदर, आस्था त्याच्या गावीच नव्हती. किंबहुना बायकोशी कसे वागायचे हे त्याला माहितच नाही. तशी सुसंकृतपणाची शिकवणच नाही मुळी त्याला घरातून.
मधल्या काळात पुला खालून बरेच पाणी वाहून गेले. ‘ती’ने अखेर एक मुलगी दत्तक घेतली. त्याने वकिलासमोर ‘ना हरकत’ दर्शवत वडिल म्हणून दत्तकपत्रावर सही केली. ‘ती’ने मुलीची सगळी जबाबदारी एकटीच घेणार हे त्याला निक्षून सांगितले. अवघ्या दोन दिवसांचं ते गोंडस बाळ बघून तो कदाचित हलला असावा. ‘ती’ आत्ता ताकही फुंकून पिणार होती. एकत्र राहायला ‘ती’ तयार होती पण आई-वडिलांना सोडून तो राहणार असेल तरच. ‘ती’ ला पुन्हा विषाची परिक्षा नको होती. तो त्यावर अडून बसलेला. पुन्हा त्याच त्याच विळख्यात अडकलेला. अधे मधे मुलीला भेटायला येणारा तो, गेले काही महिने फिरकलाच नाही. ‘ती’ तिच्या मुलीला काहीच कमी पडू देत नाही.
या सगळ्यात ते बाळ छान मोठं होतंय. त्या दोघी मायलेकीचं आता एक वेगळं विश्व आहे. त्या बछडीला बाहेरच्या जगात काय चाललंय याची कल्पना नाही. ती, ‘ती’चं सर्वस्व आहे हे मात्र त्या चिमुकलीला चांगलंच उमगलंय!
************
‘ती’ शृंखला –
‘ती’ – २४
‘ती’ – २३
‘ती’ – २२
‘ती’ – २१
‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
sarvach “tee” lekh sundar ahet..
vishesh mhanaje prasanna varil lekh vachala tevha dolyat pani ale..
asach lihit raha ashi parmeshwarajaval prarthana.