‘ती’ – २४

17 11 2015

माझा मित्र ‘ती’च्या प्रेमात वगैरे होता. ती त्याच्याच कॉलेज मधली, त्याची ज्युनियर. माझेही स्टडी सेंटर तेच कॉलेज. त्याने कधीतरी ‘ती’ची तोंडदेखली ओळख करुन दिली. मला फक्त तिचं नावं लक्षात होतं.

एके दिवशी अचानक कोणीतरी मुलगी मला भेटायला माझ्या शक्रवारपेठेतल्या रुमवर आली. तिने नाव सांगितले तरीही मी तिला पाहून जरा गोंधळलेच. मग तिने माझ्या मित्राचे नाव घेतले. आणि लगेच लिंक लागली. ‘ती’ त्याची ती होती तर…

ती काही कामासाठी मी राहते तिथे आली होती व तिला काही पैशांची गरज होती. त्याने तिला सांगितले असावे की मी त्याच परिसरात राहते. ती माझा माग काढत माझ्याकडे आली. रक्कम अगदीच शुल्लक नव्हती. पंधरावर्षा पूर्वी तेवढ्या पैशात अर्ध्या महिन्याचे मेसचे जेवता येऊ शकत होते. ‘ती’ने हे पैसे त्याला लगेच द्यायला सांगते असे म्हणून गळ घातली. मीही तयार झाले. नशिबाने तेवढे होते माझ्यापाशी. तिचे धन्यवाद वगैरे स्विकारुन मी पैसे दिले व ते पैसे स्विकारुन ‘ती’ निघून गेली.

ती जाताच माझ्या मैत्रिणीने मला फटकारलेच की विसर आता हे पैसे. तिची बत्ताशी खरी निघेल हे वाटलेच नव्हते तेव्हा. ‘ती’ गेली ती गेलीच. नंतर ती काही मला भेटली नाही. तो भेटला काही वेळा पण कुठेकाही मागमूस नाही. मी सुद्धा स्वत:हून पैसे परत मागितले नाहीत. असतात आपले काही घेणेकरी असा विचार करुन मी त्यांवर पाणी सोडले. माणूस चुकून विसरतो कधीतरी.

मुद्दा तो नाहीच मुळी, ज्यावेळी मी तिला मदत केली त्यावेळी शिक्षण, पुस्तकं, पार्ट-टाईम नोकरी, रुमचे भाडे, मेसचा डब्बा या सगळ्यांत महिन्याचा हिशेब जुळवणे ही कसरतच होती. घरुन पैसे घेणं मी जवळ-जवळ बंद करुन टाकलं होतं. जे करायचं ते स्वत:च्या बळावर हा नारा. त्यात हा भुरदंड (तेव्हा) मोठा होता. ‘ती’ला ते विसरणे फारच सहज, सोईस्कर व सोप्पं होतं. आणि मला…?

पुढे तिचे त्याच्याशी लग्न झाले. दोघांनी भरपूर पगाराच्या नोकऱ्या पटकावल्या. परदेशात राहिले बरीच वर्ष. त्यात आनंदच आहे. मधली काही वर्ष संपर्क तुटला. जुना विषय तर मी केव्हाच विसरले होते पण एक माणूसकी म्हणून ‘ती’ने नुसती आभासी ओळख तरी ठेवावी ना? ते ही नाही… आज एवढा काळ लोटल्यावर मी थोडीच पैसे परत दे म्हणणार आहे?

काही माणसं त्यांच्या विशिष्ट वर्तवणूकीमुळे लक्षात राहतात. ‘ती’ त्यांतलीच एक!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २३
‘ती’ – २२
‘ती’ – २१
‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape

‘ती’ – २१

25 09 2015

अचानक ‘ती’ चे लग्न ठरल्याचे तिने कळविले. एकदम तडकाफडकी! लग्नकार्यही लगबगीने उरकले. मी तर विना लग्न पत्रिका, आमंत्रण स्विकारुन मंगलकार्यालयात पोहचले होते, मला आठवतंय. नवरा मुलगा दिसायला तिच्यापेक्षा गोरा, देखणा, उजवा, चांगली नोकरी, सुखवस्तू कुटुंब. ‘ती’ तशी सावळी, दिसायला चार-चौघींसारखी.

लग्नानंतर तिच्या आईकडून तिचे सासरचे किस्से कानावर येत होते. सासरी ती अगदी मजेत व आनंदात होती. सासूला सासूरवास ठाऊक नव्हता. दोघी सकाळी मस्त चहा घेत, गप्पा मारत बसायच्या, वगैरे. मलाही खूपच आनंद वाटला. प्रत्येक मुलीला असे सासर हवे असे वाटले.

हळूहळू ती संसारात रमली. एकाच शहरात राहून भेटी-गाठी कठिण झाल्या. पाच-एक वर्षां अलिकडची गोष्ट असावी. मी लक्ष्मी रस्त्यावर एका दुकानात शिरले आणि अचानक ‘ती’ दिसली. बरोबर नवराही होता. मी बोलायला गेले. ती ही बोलली – अलिप्तपणे, तुटक व मोजकंच! जणू मैत्री नसून आमची फक्त तोंडदेखली ओळख होती. काम झाले तशी, न थांबता दोघे नजरेआड गेलेही.

‘ती’शी छान मैत्री होती. पण ‘ती’ ने स्वत:च काही संपर्क ठेवला नाही. जणू ‘ती’ला टाळायचे आहे. मला की कोणाला? की एखादे कुणी नको ‘त्या’ विषयाला उगाच हात घालू नये म्हणून मुद्दाम…

‘ती’च्या लग्नाला नक्कीच दहा वर्ष झाली असावीत. अजून मुल-बाळ नाही. यामुळेच तर नसेल ना..? या बेरक्या समाजाने बोलचे असेल का तिला या टोकदार, धारेच्या सावालाने? इतके की ‘ती’ ने स्वत:च्याच कोषात स्वत:ला लपवून घेतले. दूर-दूर केले ‘ती’ने जाणून-उमगून, आपल्याला इतरांपासून…

की अजून काही असेल? घाईत झालेले लग्न फसवून तर केले गेले नसेल? एखादे व्यंग लपवायला? आणि ‘ती’ पदरी पडले व पावन झाले म्हणत जगतेय आपली. हे आणि असे खंडीभर प्रश्न मनात उभे राहतात ‘ती’चा विचार केला की.

मागे म्हणाले तसे – मुलं होणं, न होणं, मुलं होऊ देणं, न देणं हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे व आपण त्यात फार स्वारस्य घेणं मला पटत नाही. सहज म्हणून जाणून घ्यायलाही विचारते कोणीही – मुलं आहेत का? कोण आहे? किती? हा स्वाभाविकपणाचा एक भाग झाला. नेहमी हे विचारण्यात हिणविणे वा तुच्छ लेखणे हा हेतू असतो असे नाही. खाजगी असलेतरी ‘खाजगी’ वर्तुळाच्या आत घुसण्याची काहींना (निदान जिवाच्या मैतरांना) बुभा असतेच! आणि ती असावीच लागते…याने झालीच तर मदतच होते.

आज कितीतरी विनापत्य जोडपी नांदतायत आनंदाने. त्यांना प्रयत्न करुनही नाही झाली मुलं. हे वास्तव स्विकारुन, एकमेकांवर तितकेच प्रेम करत, जपत, सुखाने संसार करतात. यातील काहींनी अनाथ मुलांना दत्तक घेऊन आपले आणि त्या निराधार लेकरांचे आयुष्य संपन्न केले. अनेक जोडप्यांना (होणार असलीतरी) मुलं नकोच आहेत. ते आपल्या मतांवर ठाम आहेत. ओळखी-पाळखीतले मुलं असलेले लोकं जेव्हा मुलांच्या त्रासापाई आसवं गाळतात तेव्हा ही लोकं स्वत:ला भाग्यवानच समजत असतील. संसारसुखाला ‘मुलं असणं’ या मोजमापात तोलणंच मुळी चुकीचं आहे. मागासलेला समाज कधी कात टाकणार देव जाणे? बरं हा कलंक अजूनही लागतो फक्त बायकांचाच माथी. पुरुषांच्या पौषार्थाला कुठेही कणभर सुद्धा धक्का लावला जात नाही. मी काही वादात शिरत नाही किंवा पुरषांच्या विरोधात नाही. पण निदान आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती(?) प्रचलीत आहे. हे सुधारण्याची नितांत गरज आहे. प्रेम, आदर एकीकडे आणि शारिरीक व्यंग दुसरीकडे. माझ्या ओळखीत एक-दोघी आहेत ज्यांना चक्क फसवून विवाह करण्यात आला. एकीने घटस्फोट घेऊन सासरकडच्यांना अद्दल शिकवली. दुसरे लग्न करुन सुखी झाली. दुसरी दोष नसला तरी रोष ओढवून घेत जगतेय.

वाटल्याने सुख वाढते आणि संकटं, दुःख कमी होते. आणि म्हणूनच माझ्या या मैत्रिणीला सांगावेसे वाटते की तू ही अढी, हा न्यूनगंड मनातून काढून टाक व बोलती हो. हे यातले अगदीच काहीही असले/नसले तरी “मी खूप सुखात आहे!” एवढेच सांग…!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape

‘ती’ – १६

15 09 2015

माझ्या जन्मा आधीपासून आमच्या दोघींच्या आईंची एकमेकींशी घट्ट मैत्री होती. तिच्या आईला सगळे ‘भाबी’ म्हणायचे. आमच्या चाळी शेजारी त्यांचा बंगला होता. अगदी गडगंज श्रीमंती, गाई-म्हशी, दुध-दुभते, घरीच कुकुटपालन, गाड्या, बागकामाला माळीबुवा! भाबी अतिशय प्रेमळ व निगर्वी होत्या. आमच्याशी त्यांचे विशेष सख्य होत्या. त्यांना तीन मुलं. आजची ‘ती’ ही त्यांची मोठी लेक.

‘ती’ चे वय पंचावन्नच्या आसपास असेल कारण तिचा मोठा मुलगा माझ्या वयाचा आहे. मध्यम उंची, सुदृढ, गोरी, आत्ता केस कापलेले आहेत पण तेव्हा एक पोनी, पंजाबी ड्रेस, बोलघेवडी, थोडासा घोगरा आवाज, हसरी मुद्रा आणि जणू आईकडून वारसाहक्काने मिळालेला निगर्वीपणा!

‘ती’ वाढली श्रीमंतीत पण तिचं लग्न एका हुशार, सामान्य, होतकरु तरुणाशी लावून देण्यात आले. ह्या तरुणाने पुढे खूप मेहनत घेऊन असामान्य कामगिरीने बलाढ्य उद्योग साम्राज्य उभं केले. आज त्यांच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त आहे. त्यांच्या उद्योगधंदा देशभर पसरला आहे.

त्या भाबी गेल्या पण ‘ती’ आमच्या संपर्कात होती. माझ्या बहिणीची लग्नाची पत्रिका द्यायला मी ‘ती’च्या घरी गेले. तिथे जाऊन त्यांच्याशी आपण काय बोलणार ही मनात शंका होती पण हे श्रीमंत लोक असलेतरी त्यातले नाहीत अशी आईने खात्री दिली. ‘ती’ने हसून माझे स्वागत केले आणि मनातले दडपण एकदम कमी झाले. मी पुण्यात काय करते, कुठे राहते अशी आस्थेने चौकशी केली. मी नको-नको म्हणत असताना मला खाऊ-पिऊ घातले. कधी काही लागले तर नि:संकोचपणे सांग असे मला सांगितले.

‘ती’ खूप बोलत होती, स्वत:बद्दल, आपल्या नवर्याबद्दल, मुलांबद्दल, शून्यातून उभ्या केलेल्या सगळ्या डोलार्याबद्दल! नवर्याची हुशारी, नेतृत्वाचे गुण, आपल्या गावातल्या लोकांना रोजगार मिळावा म्हणून कंपनीत त्यांना कशा नोकर्या दिल्या, वसाहत बांधून दिली. ‘ती’ने ह्या वयात चिकाटीने एम.बी.ए पूर्ण केले होते. पैसा आहे म्हणून शिकली हे बोलणे सोप्पं आहे. पण सगळं आहे, मग आणखी काही करायची गरजच काय असे म्हणणारेही आहेतच की. जे आहे ते सांभाळायला ही जमायला हवे.

माहेरची सुबत्ता असूनही ती ने नव्या संघर्षात नवर्याला साथ दिली. जगाचे चांगले वाईट अनुभव ती सांगत होती. जितका व्याप जास्त तितके ताप जास्त. बाहेरुन दिसते तसे नेहमीच असते असे नाही.

पुढे काही वर्षांनी मी व माझी आई माझ्या लग्नाची पत्रिका द्यायला ‘ती’च्या घरी गेलो. यंदा पूर्वीचे दडपण तर नव्हतेच. दरम्यान तिच्या मुलाचे लग्न होऊन घरी सून आली होती. सूनही बोला-वागायला छान होती. माझी प्रगती, माझे छंद याला ‘ती’ने दाद दिली. माझा होणारा नवरा कोण, कुठला, काय करतो ही चौकशी केली. माझ्या आईच्या हातच्या पदार्थांची चव अजून इतक्या वर्षांनंतरही कशी जिभेवर रेंगाळतेय वगैरे दिलखुलास गप्पा रंगल्या. आई सोबत असल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तिची सून सुद्धा आमच्यात सहभागी झाली.

‘ती’ तिच्या सूनेला व मला कौतुकाने सांगत होती,”हिची (माझी आजी) मुंबईहून काय छान मिठाई आणायची…वर्ख लावलेल्या मिठाईचे भारी आकर्षण असायचे आम्हाला तेव्हा!”. मनोमनी मी अवाक् झाले. ‘ती’ ला कशाचीच कमी नव्हती, तेव्हाही आणि आत्ताही. तरीही किती सहजतेने ‘ती’ने आपल्या सूनेसमोर व माझ्यासमोर हे बोलून टाकले. आत एक बाहेर एक, किंवा आम्ही कोणीतरी बडे रईस, आम्हाला कसले कौतुक असे तिच्या ठायी नाही. तसेच आपल्याकडे नेहमी कुणी ना कुणी कोणत्यातरी आशेनेच येते हा पूर्वग्रह बांधून, दुसर्याला उडवून लावणेही नाही. किंवा एखादी आपली गोष्ट सांगितली तर आपल्याला कमीपणा येईल ही दांभिकता नाही.

माझ्या लग्नात ‘ती’, सूनेला आवर्जून घेऊन आली होती. निघताना आईला मिठ्ठी मारुन लग्नकार्य चांगले झाले हे सांगायला ‘ती’ विसरली नाही.

खरंतर कोण कुणाकडे अपेक्षेने जात-येत नसतं. पण नाती जपणं, ती टिकवणं ही देखील एक कसब आहे. काही माणसांचं ‘साधेपण’ हे त्यांचं खरं ऐश्वर्य असतं. ही ‘ती’ मला तशी ‘प्रतिभावान धनाढ्य’ भासते.

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape

‘ती’ – १५

11 09 2015

मी एकोणीसाव्या वर्षी नोकरीला लागले. तेव्हा माझे सगळेच सहकारी माझ्याहून वयाने बरेच होते. मेहनतीचे फळ म्हणून असेल किंवा होतकरु, लहान म्हणून असेल पण सगळे प्रेमाने वागायचे, वागवायचे. ‘ती’ ही त्यांतलीच एक होती.

‘ती’ गोरी, नाकावर चष्मा, गोड हसू, खट्याळ बोलणं, सुबक ठेंगणी. ‘ती’ बंगाली. पण पुण्यात वाढल्यामुळे मराठी तर इतके अस्खलित बोलते की मातृभाषा असूनही, मराठी बोलायची लाज वाटते अशा अमराठी जीवांना थोतरीत बसेल. ‘थोडंसं खाल्लं की आणखी जास्त भूक लागते’ याला ‘ती’ (बंगाली असूनही) ‘भूक खवळली’ हा वाक्प्रचार वापरते. यातच सगळे आले. ‘ती’ चे इंग्रजीही अफलातून आहे, अगदी अग्रगणी व सुप्रसिद्ध वर्तमानपत्रात पत्रकारीता करण्या इतके. पण मला ‘ती’ची वेगळी ओळख करुन द्यायची आहे.

‘ती’ चे एका मुलावर प्रेम होते. तिच्या बोलण्यात त्याचा खूप वेळा उल्लेख असायचा. वयाच्या अदबीमुळे मी स्वत:हून त्याच्याबद्दल तिला कधीच काही विचारले नव्हते. तो मुंबईचा होता एवढेच ठाऊक. एकदा तो तिला भेटायला येणार होता. जेवणाच्या सुट्टी आधी थोडावेळ ती मला म्हणाली,”रुही बेबी, (हो. मला बेबी झाले तरी ती अजूनही मला याच नावाने हाक मारते) तो आलाय. चल तू पण. आपण एकत्र बाहेर जाऊ लंचला.” तेव्हा ‘कबाब में हड्डी’ वगैरे गावीही नव्हते. मी पण तिच्या खास मित्राला भेटूया या उत्साहात तिच्या बरोबर निघाले. आम्ही वेळेच्या आधीच रेस्टॉरंटला पोहचलो आणि टेबल रिझर्व केला. वाट पाहत असताना एक तरुण आत शिरला. तिच्याकडे बघून हसत आमच्या दिशेने आला. लागलीच आणखी एक तरुण आत येताना दिसला. त्याचा काखेत कुबड्या होत्या. तो आमच्या टेबलवर येताच ‘ती’ ने माझी ओळख करुन दिली. मला एका क्षणासाठी काहीच कळेनासे झाले. हे अनपेक्षित होते. भानावर येत मी हस्तांदोलन केले. आधी आलेला तरुण त्याचा मित्र होता. गप्पा करत करत जेवण झाले. पुढे त्याच्याशी छान ओळख झाली.

धडधाकट असलेल्या ‘ती’ चा ‘तो’ दोन्ही पायांनी पांगळा आहे. हे पचविणे मला जड गेले. तिचे घरचे लग्नाला तयार नव्हते. तब्बल आठ एक वर्षांनी त्या दोघांनी लग्न केले. तो कामानिमित्त परदेशात आला. दोघांनी तिथेच संसार थाटला. तो हुशार आहे. त्याच्या बुद्धीने त्याने कमतरतेवर मात केली. त्याने उत्तम करियर घडविले.

कालांतराने मी ही परदेशी आले. आम्ही फोनवर बोलत होतो. ‘ती’ सांगत होती,”अॉफिस जवळच घर बघतो आम्ही. बरं पडते. मी इकडे गाडी चालवायला लागले. त्याला ऑफिसला सोडावे-आणावे लागते. तो गाडी चालवतो पण मलाही गाडी लागते बाहेरची कामे करायला.” तिचे सगळेच आयुष्य त्याच्या भोवती फिरत होते. तिच्या बोलण्यात त्याच्यासाठी कुठे आईची माया होती, कुठे बायको या नात्याने त्याच्या हुशारीचे कौतुक होते, कुठे प्रेयसीची काळजी होती, कधी त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान डोकावत होता. दाखवायला ही राग, तक्रार, त्रागा, कंटाळा नव्हता. आणि वेळप्रसंगी यातील एक किंवा सगळ्या गोष्टी तिने दर्शविल्या असत्यातरी ते वागणे मनुष्यसुलभ वृत्तीला धरुनच आहे. तेवढी मुभा तिला नक्कीच आहे. संयम नेहमीच बाळगता यावा अशी सक्ती कुठं आहे?. तो कधी ढळला ही असेल. बोलणे आणि करणे यात जमिन-अस्मानाची तफावत असते. आणि ‘ती’ सगळं आनंदाने करतेय.

तिची परदेशात स्थिरावण्याची मुख्य कारणं होती, अपंगांसाठी इथे असलेल्या सोई, दिली जाणारी समानतेची वागणूक. अगदी खरं होते ते. परदेशात अपंगांना दयेचा नजरेने कोणी बघत नाही. त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी योग्य त्या सोई करण्यात मात्र देश कार्यशील असतो. अशांसाठी खास प्रकारच्या कार, आरक्षित पार्कींग, दुकानांमधे बसून खरेदी करता येईल अशा बैठ्या गाड्या, व्हीलचेरसकट आत जाता येईल अशा बस, तशी प्रसाधनगृह आणि पुष्कळ काही.

प्रेम आंधळं असतं म्हणतात पण ‘ती’ ने असे काही प्रेम केले की प्रेमाला एका नविन अर्थ, एक नविन परिभाषा दिली! ‘ती’ने त्याचे आयुष्य नुसते सुखकरच नाही तर सुकर ही केलं.

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape

‘ती’ – १४

11 09 2015

‘ती’ च्या बद्दल खूप वेळा लिहावं वाटलं – तिच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका मिळाली तेव्हा, ती आजी झाली तेव्हा, तिचा व्हॉटस् ॲपचा फोटो पाहिला तेव्हा…निमित्त बरीच होती पण योग जुळून येत नव्हता. आज तिच्याशी बोलावे असे खूप वाटले. तिच्याशी छान तासभर गप्पा मारल्या. दोघीही फ्रेश झालो. तिचे खळखळणारे हसू ऐकले आणि वाटलं आजच लिहायला घ्यावे.

‘ती’ मुंबईची. रुईयाची. एस्.वाय. ला होती तेव्हा लग्न झाले. सासरी आली तेव्हा तिला काहीच स्वयंपाक येत नव्हता ते (ज्याने आत्ता तिच्या हातचे खाल्लेय त्याला) सांगून विश्वास बसणार नाही. तिच्या नवर्याने तिचा पदार्थ जमून आला नाही म्हणून ताट भिरकावले होते. तिने लगेच ते आव्हान स्विकारले. नुसतेच स्विकारले नाही तर त्यात बाजीही मारली. आज तिचा नवरा तिच्या स्वयंपाकाची तारीफ करताना थकत नाही.

संसारात पूर्णपणे रमली असताना अचानक नशीबाने परिक्षा घेतली. तिच्या नवर्याला तरुण वयात ह्रदयविकाराचा झटका आला आणि शस्त्रक्रिया करावी लागली. हॉस्पिटल मागे लागले. डॉक्टरांशी भेटी होत होत्या. त्यातून तिला एका नविन ‘पर्फुशनीस्ट’ नावाच्या ‘पॅरामेडिकल’ क्षेत्राशी ओळख झाली. पुढे नवर्याची तब्येत सुधारली. तिने ‘पर्फुशनीस्ट’ चा वर्षभराचा कोर्स करायचे ठरविले. त्याच अभ्यासक्रमासाठी ती पुण्यात होती, जेव्हा आमची भेट झाली. नवर्या-मुली पासून लांब राहून तिने कोर्स पूर्ण केला. परत आपल्या गावी जाऊन नोकरीला लागली.

चौकटीच्या बाहेर पडून तिने एक वेगळे पाऊल टाकले. शिक्षणानंतर एका तपानंतर तिचे करियर सुरु झाले. तिचा निर्णय सत्यात उतरविण्यात तिच्या नवर्याचा मोलाचा वाटा होताच, मुलीचे-घरच्यांचे सहकार्य होतेच पण तिची जिद्धही होतीच! कुठलीही गोष्ट पूर्णत्वाला नेण्याकरिता, ती करण्यासाठीची जिद्ध लागते. सबबी, पळवाटा शोधल्या की चिक्कार सापडतात पण त्यावर मात करता यायला हवी. मग प्रगती ही होणारच! आज ‘ती’ स्वतंत्रपणे स्वत:च्या पायावर उभी आहे.

‘ती’च्या नातीचे कौतुक ऐकून झाल्यावर मी तिला ‘आजीबाई’ म्हणून चिडवत विचारले,”काय गं, लेकीचा बाल-विवाह केलास?” त्यावर तिचे उत्तर,”बाल-विवाह तिचा कुठे? बाल-विवाह तर माझा झाला होता!” पुढे ती म्हणाली,”मुलीचे तिनेच जमविले. सगळे वेळीच झाले की चांगले. थांबायचे कारण नव्हते मग करुन टाकले तिचे.” मलाही पटते – कमी वयात आपण जास्त परिवर्तशील असतो. पार्टनरशी जुळवून घ्यायला सापं जाते. वयामुळे जितके विचार प्रगल्भ होतात, तितकेच ते ठाम होत जातात व जुळवून घेणे कठिण होत जाते. संसार म्हंटलं की सगळे पुढे-मागे, कमी-जास्त जुळवून घेतातच. इथे वय कोवळे असण्याचा फायदाच जास्त होत असावा. अगदीच वीशीत नाही पण शिक्षण पूर्ण झाले व नोकरीला लागून स्थिरावलो की पंचविशी उलटतेच, आणि तेच वय योग्य. त्यावयात योग्य जोडीदाराची योग्य साथ मिळाली की दोघांचे आयुष्य बहरु शकते असे मला तरी वाटते. असो! हे ज्याचे त्याचे वैयक्तिक प्राधान्य आहे.

परवाच ‘ती’ने व्हॉटस् ॲपवर तिचा ‘सितार’ वाजवितानाचा फोटो टाकला. तो बघून मी (हम आपके हैं कोन स्टाईलने) तिला विचारले,”बजाना-वजाना भी आता हैं, या सिर्फ पोज लेगे खडी हो?”. तिचे लगेच उत्तर आले,”अगं शिकतेय सितार. बरेच वर्षापासून ईच्छा होती.” मी मनातून आनंदले. कुठलीही नविन गोष्ट शिकायला, करायला कधीच उशीर झालेला नसतो हे ‘ती’ने पुन्हा दाखवून दिले.

नेहमी प्रमाणे मी या ‘ती’ची नीटशी ओळख करुन देते – ‘ती’ गोरी, घारी, उंच आहे, लांब केस, उत्साही, बोलघेवडी व हसरी आहे. आशा आणि जगजीतसाठी वेडी आहे. ‘ती’ चिरतरुण आहे आणि तशीच राहवी असे मला वाटते. आम्ही पेईंग गेस्ट होतो तिथे ही ‘ती’ काही महिने माझी शेजारी होती. माझ्या या मैत्रिणीत आणि माझ्यात तब्बल दहा वर्षांचा फरक आहे पण मैत्रीला थोडंच वयाचे बंधन असते?

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape

‘ती’ – १२

3 09 2015

खडकमाळ मधे पोलिस वसाहतीत तिचे घर होते. पहिली छोटीशी खोली म्हणजे तिचे ‘पार्लर’. एक आरसा, त्यालाच जोडून तिचे साहित्य ठेवायचे टेबल, गिर्हाईक बसेल ती खुर्ची, अवघडलेपण टाळायला पडदा, एवढे सगळे आणि उभ्याने काम करण्यासाठी परतायला जेमतेम जागा उरत होती. ‘ती’ कडे मी केस कापायला जात असे. मुलगी मेहनती होती, काम चोख करायची, शिवाय ओळखीतून तिच्याकडे गेले होते.

गोरी, उंच, लांब केस, त्यांची कायम एक जाड वेणी, तपकीरी डोळे, दिसायलाही बरीच म्हणाली लागेल, वय पंचविशी पुढचे असावे कारण लग्नाळू होती.

‘ती’ कडे गेलं की गप्पा व्हायच्या. ती घरच्यांबद्दल वगैरे बोलायची. तिचं लग्न ठरायला उशीर होत होता यामुळे ‘ती’ च्या घरचे चिंतेत होते. ती सुद्धा बरेच उपास-तापास करायची.

थोड्या महिन्यात ‘ती’ने लग्न ठरल्याची बातमी दिली. नवरा कोण कुठला ते सांगून, ‘ती’ आनंदाने पुढे बोलत होती,”तू रत्नागिरीचा ना गं? मग तुम्हाला चांगलंच जवळ आहे राजेंद्र (नाव बदलले) महाराजांचे गाव. त्यांच्याच आशीर्वादाने लग्न ठरले!” मला कळायला काही मार्ग नव्हता. तिने खुलासा केला – “मी महाराजांच्या दर्शनाला गेले. त्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले एका महिन्यात तुझं लग्न ठरेल. आणि अगदी तसेच झाले बघ”. मी महाराजांकडे का गेले नाही? ते किती महान आहेत वगैरे ती सांगत राहिली.

माझ्या विवेकबुद्धीला हे काही पटणारे नव्हते तरी तिला मी काहीच बोलले नाही. एक तर माझा बुवा-महाराजांवर विश्वास नव्हता-नाही. तसेच या महाराजांचे ‘खरे’ कारनामे बहुश्रृत होते. म्हणूनच हा पाजी बुवा आमच्या प्रांतातला असलातरी त्याचा ‘भक्तगण’ घाटावरच्या भागातला होता. जनतेला टोप्या घालणार्यांपेक्षा, त्या घालून घेण्यार्यांची मला जास्त कीव येते.

कालांतराने ती सासरी गेली, रूळली. अचानक तिने काम बंद केले. का विचारायची गरज नव्हतीच पण तरी तिने स्पष्टीकरण दिले,”महाराजांच्या कृपेने गोड बातमी आहे!” 🙂

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape

‘ती’ – ११

2 09 2015

अकाळी वडिल गेले. त्यांचे कार्य उरकून मी परत नोकरीवर रूजू झाले. मन हळवे झाले होते. आठवणींनी टचकण डोळ्यांत पाणी येई. मी परत आले कळल्यावर माझी मॅनेजर माझ्या डेस्कपाशी थांबली. मला गहिवरून आले. ती सांतवन करत म्हणाली,”वाईट झालं. पण तुला तुझे वडिल इतकी वर्ष लाभले तरी, मी अगदी लहान असताना माझे वडिल गेले. त्यांचा चेहराही मला आठवत नाही!”

एवढेच बोलून ती निघून गेली. माझं दु:ख उगाच हलकं झाल्यासारखं वाटायला लागलं आणि तिचंच सांतवन करावंसं वाटायला लागलं.

‘ती’ चायनीज होती. शिकायला पुण्यात आली व तिथेच नोकरीला लागली. तिच्याशी फक्त कामापुरतेच बोलणं होत असे. बरेच वर्ष पुण्यात काढल्यामुळे बोलता येत नसलेतरी तिला मराठी कळते असे काहीजण म्हणायचे.

त्या कठिण समयी तिने माझ्या दु:खावर जी फुंकर व मनावर जो चटका दिला, त्यामुळे आपल्याहूनही कमनशिबी लोकं आहेत याची जाणीव झाली. त्यासाठी ‘ती’ चे आभार मानायचे मात्र राहूनच गेले.

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape

१३१८, शुक्रवार पेठ

6 04 2011

शेवडे बोळातला फ्लॅट ही तात्पूर्ती सोय होती. महिन्या अखेरीला तो फ्लॅट सोडून नविन जागेत जायचे होते.त्या आधी नविन जागा शोधायचा खटाटोप होता. महिनाभर सकाळ-संध्याकाळ नविन जागेच शोध हाच उद्योग होता माझा आणि प्रज्ञाचा. बोळात १-२ ठिकाणी सांगून ठेवले होते की कोणाला कुठे पेईंग गेस्ट हव्या आहेत असे कळले तर आम्हाला सांगा. काही एजंटस् ना पण भेटून आलो. असे करत करत महिना संपत आला पण जागेची विवंचना काही सुटली नव्हती. दुपारी मेसचा डब्बा घेऊन आलो आणि जेवायला बसणार तोच एक मुलगी आम्हाला शोधत आली. नाव ‘कविता कुंटे’. तिने सांगितले एका आजींकडे २ मुलींसाठी १ खोली रिकामी होतेय, आम्हाला ती तिकडे घेऊन जाऊ शकते. आम्ही संध्याकाळची वेळ ठरवली आणि तिच्याबरोबर चालत निघालो. रस्त्यात आमचे बोलणे सुरु होते. कविताचे घर शेवडे बोळातल्या एका वाड्यातल्या जागेत होते. तिची मोठी बहिण डिलेवरीसाठी माहेरी आली होती, कविताची कसलीशी परिक्षा होती…जागे अभावी व कविताला अभ्यास करता यावा म्हणून ती या आजींकडे महिना-दीड महिना रहिली. तिला कळले आम्हाला जागेची गरज आहे आणि निघताना आजींनी कोणी मुली माहित असल्यास सांग असे तिला म्हणाल्या असणार. मी आणि प्रज्ञा आम्ही आधीच ठरवून टाकले होते की जागा जशी असेल तशी, आवडो न आवडो पक्की करुन टाकायची…दुसरा काही पर्याय नव्हताच.

शुक्रवार पेठेतल्या ‘श्रीशोभा’ नावाच्या मोठ्या बंगल्यासमोर आम्ही आलो आणि पाहताक्षणी त्या घराच्या प्रेमात पडलो. आत शिरलो. कविताने आजींशी ओळख करुन दिली. आजींचे वय ८३-८४ च्या घरात होते, ठेंगणीशी मूर्ती, गोरीपान कांती, पांढरे केस, थरथरते हात, फेंट रंगाची कॉटनची काष्टाची नऊवारी साडी, डोळ्यांवर जाड भिंगाचा – सोनेरी फ्रेमचा चष्मा, पायात सपाता, खणखणीत आवाज, सुस्पष्ट बोलणे, चेहर्‍यावर श्रीमंतीचे तेज आणि त्या जोडीला डोळ्यात मिश्किल भाव. अशा या आजी होत्या.
 
आजींनी आमची मोघम चौकशी केली – कोणत्या गावच्या, काय शिकता, वगैरे. खोली वरच्या मजल्यावर होती. आम्ही वर खोली बघायला गेलो. २ मुलींना पुरेल एवढी खोली, त्यात २ खाटा, गाद्या, भिंतीवर आरसा असलेले ड्रेसींग टेबल, एक भिंतीतले पुस्तकांचे कपाट, एक खाऊ ठेवायचे, आणि खोली बाहेर समोर एक  कपड्यांची कपाटे, हवेशीर जागा, खिडकीतून दिसणारी ‘महाराणा प्रताप’ बाग आणि वर्दळीचा ‘बाजीराव’ रस्ता. खोलीला लागून मोठी गच्ची, त्यात फुलंझाडांच्या अनेक कुंड्या, गच्चीच्या एक कोपर्‍यात एटॅच्ड् टॉयलेट-बाथरूम. आम्ही खाली आलो आणि आजींना सांगितले की रूम आम्हाला आवडली आणि भाडे ठरवून टाकले.
 
दोघींच्या प्रत्येकी २ बॅगस् घेऊन ३१ ऑक्टोबर १९९९ ला संध्याकाळी आम्ही आमचे बस्थान नविन जागेत हलविले. ४ ठिकाणी चौकशी करुन नविन मेसचा डब्बा लावला. टेलिफोन एक्सचेंज या कॉलनीला लागून होते, त्यामुळे रात्री ८ नंतर एस. टी. डी हाफ रेट मध्ये घरी रत्नागिरीला फोन करणे सोयीचे झाले होते. शनिवार-रविवार आजींकडे घरुन फोन येत असे. नविन जागेशी, आजींशी आम्ही जुळवून घेत होतो. हा बंगला ३ मजली होता. खालच्या फ्लोअरवर बरेच जुने असे २ भाडेकरु, मधल्या फ्लोअरवर आजी, आणि टॉप फ्लोअरवर आमच्या खोल्या आणी गच्ची. आजींच्या मजल्यावर एक मस्त अर्ध-गोलाकर, ग्रीलने बंदिस्त केलेली बालकनी होती. तिथे एका वेताच्या खुर्चीवर आजी संध्याकाळी बसत असत. आमची खोली ही वास्तविकरित्या एका मोठ्या खोलीची अर्धी खोली होती, लाकडाचे पर्मनंट पार्टिशन होते आणि त्यालाच एक दार होते जे नेहमी बंद असे. ती उरलेली दुसरी जागा आमच्या जागेपेक्षा जराशी मोठी होती आणि तिला स्वतंत्र दार होते जे गच्चीत उघडत होते. त्या जागेत कोणी परदेशी संस्क्रुत स्कॉलर ६ महिने येऊन रहात. हा बंगला आजींच्या नातेवाईकाने स्वत:  ४० वर्षांपूर्वी बांधला होता. पुण्यात झालेल्या भूकंपामुळे त्या घराला एक चीर गेली होती. परंतु त्याच्या भक्कम बांधकामामुळे फक्त एका चीरेवरच निभावले होते. खूपच सुंदर घर होते ते.

आजींना त्यांच्या घरचे सगळे ‘एमी’ म्हणत आणि ती हाक देखील ‘ए एमी’ अशी एकेरी असायची. मी एकदा त्यांना विचारल्यावर त्यांनी हे ‘एमी’ नाव कसे पडले ते सांगितले. त्यांचे माहेरचे नाव ‘विमल’ होते. घरचे सगळे याच नावाने हाक मारत. त्यांचा मुलगा जेव्हा बोलायला लागला तेव्हा तो ते एकून बोबडया बोलात ‘विमल’ चे ‘एमल’, ‘एमील’ असे म्हणू लागला आनि शेवटी ते ‘एमी’ असे नाव पडले. आजींचा मुलगा हा पुण्यातला मोठा उद्योगपती आहे, आजींना सुना-मुली, नात-नाती, पंतवंड आहेत. नाती आमच्याहुन मोठ्या, लग्न होऊन सासरी गेलेल्या. आम्ही ज्या खोलीत रहात होतो ती त्या २ नातींचीच खोली होती.  म्हणूनच दोन मुलींना लगेल असे सगळे होते त्या आमच्या खोलीत.
 
आजी बोलायला एकदम छान होत्या, शिस्तीला कडक होत्या. ७-७:३० पर्यंत घरी आलेच पाहिजे असा नियम होता. विकेन्डला थोडा उशीर चालत असे. आजींचे विचार सुधारीत होते, नव-नविन माहिती जाणून घेण्याची आवड होती. संध्याकाळी कधी कधी आम्ही गप्पा मारत बाल्कनीत बसत असू. आजी भारत, अमेरिका, युरोप सगळं फिरल्या होत्या. एवढेच काय तर त्यांचे नातजावई आर्मी मध्ये होते म्हणून त्या त्यावर्षी पुण्याहून ट्रेनने जम्मू-काश्मिर चा दौरा करुन आल्या. वाघा बॉर्डर बघून आल्या. त्यांचा उत्साह दांडगा होता.

दर दिवशी पहाटे ५:३० ला उठून, चहा करत, दूध तापवत, फडके दूधवाला दूधाची पिशवी आणि पेपरवाला मुलगा ‘सकाळ’ या दोन्ही गोष्टी, जिन्याला शंकरपाळी सारख्या डिझाईनची भोके होती, त्यात ठेवून जात. मग चहा तयार झाला की आजी ते आत घेऊन जात. त्यांच्याकडे नेहमी आदल्या दिवशीची दूधाची पिशवी असे जी त्या आजला तापवत. कालची आजला, आजची उद्याला असे काहीसे. आजची नविन दूधाची पिशवी फ्रीजमध्ये ठेवत असत. किटलीत चहा घेऊन गादीवर पपेर वाचत त्या चहा घेत. उजेडासाठी एक जुना टेबल लॅम्प असे. दुपारी पूर्ण जेवण, अगदी दही-ताकासकट. संध्याकाळी ७-७:३० ला फक्त एक कप दूध, एखादे बिस्किट किंवा ब्रेड स्लाईस असा हा त्यांचा आहारक्रम आम्ही बघत आलोय. आजींचे करणे सुग्रण होते. वेगवेगळ्या वड्या करत असत. आंब्याच्या मौसमात कोकणातून आंब्याची पेटी येत असे, नातवा-पंतवंडांसाठी त्या भरपूर साखरांबा करायच्या आणि ज्याच्या-त्याच्या घरी पोस्त करायच्या.

२००० साली एप्रिलमध्ये मला नोकरी लागली. मी icici बॅंकेत खाते काढले. ए.टी.एम. कार्ड नविन होते तेव्हा आणि मला या नविन गोष्टींचा भारी सोस. आजींना मी ए.टी.एम. काय भानगड आहे व ते कसे वापरले जाते ते एकदा सांगितले आणि ते एकून त्या एकदम अचंबीत झाल्या. “मी पण येईन एकदा ए.टी.एम. सेंटरला” असे त्या म्हणाल्या. सकाळ पेपरच्या ‘वाचकांचा पत्रव्यवहार’ यात त्या काही काही लिहून त्या पाठवायच्या. कुठे आपली मते, कुठे कॉलनीतले प्रॉब्लेम्स, कुठे काय. गणपतीमध्ये रात्री ११ नंतर लाऊड स्पीकर बंद ठेवावेत म्हणून त्या गणपती आधीच पुणे पोलिस कमिशनर ला भेटून लेखी अर्ज देऊन यायच्या. याचा जेवढा उपयोग होणार तेवढाच व्हायचा पण यांना समाधान असे की आपण आपले कर्तव्य करुन आलो.

असाच एक किस्सा आठवतो – एकदा आजी फुथपाथवरुन चालल्या होत्या. कोणालातरी दुर्बुद्धी झाली असेल त्याने गाडी फुथपाथवर चढवून पार्क केली होती. आजींना राग आला. त्यांनी समोरुन येणार्‍या शाळकरी मुलाला थांबवले आणि त्याच्याकडून वहीचा कागद-पेन घेऊन, “ही जागा चालण्याकरिता आहे. वहाने लावण्यासाठी नाही. असे करुन वयोवृद्धांची गैरसोय करु नये.” अशी चिठ्ठी लिहिली व त्या गाडीच्या वायपर वर लावून आल्या.

त्यांच्या शिस्तीचा आम्हालाही कधीतरी कंटाळा येई, याचा अर्थ आम्ही बेफाम होतो असा नाही. त्या शिस्तीचे महत्त्वही कळत होते. माझे इन-मीन तीन मित्र घरी यायचे. घरी म्हणजे दारात. वर त्यांना प्रवेश नव्हता. आजींना आधी त्यांचा राग यायचा. कदाचित बेल वाजवली की दार उघडायचा त्यांना त्रास होत असावा. मग बर्‍याच वेळेस त्या आम्ही असतानाही रागाने नाही आहोत असे सांगून टाकायच्या. थोड्याच दिवसात आम्ही थिल्लर मुली नाही आणि हे आमचे फक्त मित्रच आहेत हे पटले आणि नंतर त्यांचा राग कमी झाला.

त्यांचा आमच्यावर नंतर इतका विश्वास बसला की ३-४ वेळा संपूर्ण घराची जबाबदारी आमच्यावर टाकून त्या बिंधास्त फिरायला गेल्या. काश्मिरला गेल्या तेव्हा, आजारी पडून मुलाकडे-मुलीकडे रहायला गेल्या तेव्हा. पण कधी काही गैर फायदा घ्यावा असे मनातही आले नाही. किचन वापरची आणि कधी आजारी पडलो तर खिचडी करुन खायची मुभा होती. तसा आमचा मेसचा डबा होताच. कधीतरी आजी थोडीशी भाजी देत असत. रात्री हॉलमध्ये एकत्र आम्ही अधेमधे टि.व्हि बघायला जात असू.

पाकिस्तानवर आजींचा फार रोश होता. राजकारणात भयंकर इंटरेस्ट. वाजपेईंना पत्र पाठवून झाले होते. मस्करीत म्हणायच्या एक-एक बंदुक देऊन सीमेवर पाठवले पाहिजे आपल्या लोकांना, पाकड्यांना ठार करायला. आणि हातात बंदुक मिळाली तर ह्या वयात देखील असे काही करायला डगमगणार नाहीत अशी आम्हाला खात्री होती. त्या दरम्याने मला एका पोलिसाच्या जीपने टक्कर दिली आणि अपघात झाला. मी त्या पोलिसाची, पोलिस कमिशनरकडे तक्रार केली आणि त्याला शिक्षा झाली. अन्याया विरुद्ध लढा दिला या सगळ्या प्रकरणावर आजी बेहद्द खुष झाल्या होत्या.

आजींना स्वच्छता फार प्रिय. त्या स्वत: वर येऊन आमची रूम स्वच्छ आहे का ते बघत असत. आमची रुम नेहमीच स्वच्छ असायची. नियमित केर काढायचो, आठवड्यातून एकदा लादी पुसायचो. त्यांना खात्री पटल्यावर त्यांनी रुम चेक करणे सोडले. रूम मध्ये कॉम्पूटर आल्यावर रुमला कुलुप लावायला परवानगी मिळाली. 

त्यांच्या मुलाचे नाव ‘श्रीनिवास’ आणि मुलीचे ‘शोभा’ म्हणून घराचे नाव ‘श्रीशोभा’ होते हे त्यांनी सांगितले. कधी कधी आजी पूर्वीच्या आठवणींमध्ये रमून जात आणि आमच्याशी बोलत्या होत. स्वत:च्या नवर्‍याचा उल्लेख ‘शोभा आत्याचे वडिल’ असा करत. त्यांच्याबद्दल सांगत. त्यांच्या स्म्रुतीदिना दिवशी त्या घरी भजनाचा, व्याख्यानाचा किंवा गाण्याचा प्रोग्राम ठेवत. आम्हाला नेहमी आश्चर्य वाटायचे की एवढी सुबत्ता असतानाही एमी एकट्या का आणि कशा रहातात. नंतर कळले की त्यांचे घर हेच त्यांचे सोबती आहे. त्यात त्यांच्या संसाराच्या, चांगल्या-वाईट दिवसांच्या असंख्य आठवणी दडलेल्या आहेत. एवढ्या वयात देखील त्या घरातील प्रत्येक बाबीवर जातीने लक्ष देत व देख-रेख ठेवत.

९ मे ला आजींचा वाढदिवस आम्ही साजरा करायचो. अशाच एका वाढदिवसला त्यांच्या मुलाने हिरवट रंगाची नवी कोरी ‘झेन’ पाठवली होती त्यांना घेऊन जायला. त्यांचा ठरलेला ‘पंडित’ नावाचा ड्रायवर असे जो आजींना नेहमी आणायला-सोडायला येत असे. तशाच ‘विठाबाई’ म्हणून एक म्हातार्‍या बाई आजींकडे खूप वर्षांपासून घर कामाला होत्या.

आजींना सगळे ओळखत होते. पोस्टमन पासून ते आसपासच्या परिसरातले सगळेच. कोलनीमध्ये पण त्यांचा रुबाब होता. दर दिवशी संध्याकाळी आजींकडे कॉलनीतल्या बायका जमायच्या आणि रामायणाचे की गीतेचे वाचन करायच्या. गंमत आठवतेय – परिक्षा संपवून दोन-अडीच महिने प्रज्ञा सुट्टी लागली की रत्नागिरीला जात असे. मग आम्ही एकमेकींना पत्र लिहायचो. एकदा तिने फक्त ‘१३१८, शुक्रवार पेठ, पुणे’ एवढाच पत्ता घालून पत्र टाकले, ‘बाजीराव रस्ता’ हे घालायचे ती विसरली तरी ते पत्र बरोबर पोहोचले. म्हणून म्हणाले आजी फेमस होत्या आमच्या.
 
आजींना तब्येतीमुळे मुलाकडे रहाण्याचा निर्णय घेणार होत्या म्हणून आम्ही ती जागा सोडायचे ठरवले. तब्बल ३.५ वर्षांचा ऋणानुबंध होता. त्या जागेवर प्रेम आणि आजींवर श्रद्धा जडली होती. त्या वास्तूत आम्ही आमच्या आयुष्याच्या घडणीतले सोनेरी क्षण जगलो होतो. त्या परिसरात वाढलो होतो. नंतर पुण्यातल्या बर्‍याच ठिकाणी राहिलो. आता तर स्वत:ची घरं झाली माझी आणि प्रज्ञाची पण अजूनही बाजीराव रस्त्यावर गेलो की जो आपलेपणा जाणवतो तो इतरत्र कुठेही नाही. तिथून सोडून गेलो तरी त्या रस्त्यावरुन जाताना,  बागेसमोर थांबुन “ती दिसतेय ना ती आमची रूम” असे त्या खोलीकडे बोट करत आम्ही जणू ‘मस्तानी महाल’ किंवा ‘शनिवार वाडा’ दाखवतोय अशा थाटात सोबतच्या नातेवाईकांना/मित्र/मैत्रिणींना दाखवत असू.
 
तिथून निघलो ते चांगल्यासाठी… आजींचे आशिर्वाद घेऊन. आम्ही दोघीही खूपच साध्या-सरळ होतो (अहो, अजूनही आहोत). फाजिल चोचले करायला वेळ आणि पैसा दोन्ही नव्हता. काहीतरी चांगले करावे, बनावे हेच ध्येय समोर होते. प्रज्ञाचे शिक्षण सुरु होते आणि माझी तर दुहेरी कसरत – नोकरी व शिक्षण दोन्ही. एन्जोयमेन्ट केलीच नाही असे ही नाही. त्यावेळी कपडे घेण्यापेक्षा एखादे अभ्यासाचे पुस्तक विकत घेणे जस्त होत होते. अभ्यास-नोकरी-पुस्तकं-कॉम्पूटर-मेस चे जेवण करता-करता गप्पा, या व्यतिरिक्त काहीच करमणूक नव्हती. गरजा कमी होत्या आणि ते कमी गरजांचे आयुष्य आनंदी होते.
 
आम्ही ती जागा सोडली आणि काही वर्षात ते घर पाडून तिथे नविन बिल्डिंग बांधली जातेय हे कळले आणि मनं हळहळले. आपले घर पाडत आहेत याचा आजींना कित्ती त्रास झाला असेल याची कल्पनाच करवेना. रस्त्यावरुन दिसणारी आमची ती खोली, ती खिडकी कायमची नाहिशी झाली. नंतर उभ्या राहिलेल्या बिल्डिंग बद्दल आदर असण्याचे कारण नव्हते. शेजारच्या ‘माई जोशी’ यांच्या कडून एमींची चौकशी करत होते. एमी आता फार थकल्यात हेच समजत असे. खूप वेळा त्यांना भेटायचे ठरवले पण राहून गेले.

पुण्यातले वाडे पाडून त्या जागी नविन इमारती उभ्या राहातात हे अनेक वेळा वाचले होते पण त्या जुन्या जागी राहणार्‍यांना घर तुटताना काय वाटत असेल याचे दु:ख आम्ही आमचे स्वत:चे घर नसतानाही अनुभवले. एमींसारख्या अनेक वृद्धांना ते हयातीत बघावे लागले हे न जाणो कोणत्या जन्माचे भोग होते.
 
जग कित्ती लहान आहे याचा अजून एक अनुभव आला. २००९ मध्ये मी कामानिमित्त अमेरिकेत आले. डॅलसहून मुंबईला परतत होते आणि एअरपोर्ट वर ओळखीचे चेहरे दिसले. आजींचा मुलगा रमेश काका आणि त्यांची बायको होते. आजींची नात डॅलसला असते, तिकडे राहून ते पण परत चालले होते. दोघेही आपुलकीने बोलले. बोलून झाले आणि त्यांनी काजू कतरीचा एक पुडा हातत दिला आणि म्हणाल्या “हा घे तुला”. परक्या देशी आणि इतक्या वर्षांनंतर भेटून देखील त्यांचे हे वागणे मनाला आनंद देऊन गेले. आजींनी कधी तोंडावर स्तुती केली नाही पण  मला कळले की त्यांनाही आमच्याबद्दल काहीतरी वाटत होते, काही भावना होत्या.

मागच्या महिन्यात एमी गेल्याचे कळले…ते ही फेसबुकवर. लगेच ती बातमी कन्फर्म करुन घेतली. दु:ख झाले. खूप आठवणी मनात दाटून आल्या आणि गहिवरुन आले.
 
त्यांच्या विषयी काही लिहावे वाटले, त्या घरा विषयी लिहावे वाटले. आज ते घर नाही, ती आमची खोली नाही, ती सुंदर बालकनी नाही आणि त्या एमी ही नाहीत.  पण मनात अजूनही सगळे अगदी जसेच्या तसे आहे….ते घर, आमची खोली, त्यातल्या आमच्या वस्तू, ती बालकनी, त्या वेताच्या खुर्चीवर बसलेल्या आमच्या आजी आणि त्यांच्याशी गप्पा मारत बसलेल्या आम्ही दोघी…

Page copy protected against web site content infringement by Copyscape
%d bloggers like this: