‘ती’ – २४

17 11 2015

माझा मित्र ‘ती’च्या प्रेमात वगैरे होता. ती त्याच्याच कॉलेज मधली, त्याची ज्युनियर. माझेही स्टडी सेंटर तेच कॉलेज. त्याने कधीतरी ‘ती’ची तोंडदेखली ओळख करुन दिली. मला फक्त तिचं नावं लक्षात होतं.

एके दिवशी अचानक कोणीतरी मुलगी मला भेटायला माझ्या शक्रवारपेठेतल्या रुमवर आली. तिने नाव सांगितले तरीही मी तिला पाहून जरा गोंधळलेच. मग तिने माझ्या मित्राचे नाव घेतले. आणि लगेच लिंक लागली. ‘ती’ त्याची ती होती तर…

ती काही कामासाठी मी राहते तिथे आली होती व तिला काही पैशांची गरज होती. त्याने तिला सांगितले असावे की मी त्याच परिसरात राहते. ती माझा माग काढत माझ्याकडे आली. रक्कम अगदीच शुल्लक नव्हती. पंधरावर्षा पूर्वी तेवढ्या पैशात अर्ध्या महिन्याचे मेसचे जेवता येऊ शकत होते. ‘ती’ने हे पैसे त्याला लगेच द्यायला सांगते असे म्हणून गळ घातली. मीही तयार झाले. नशिबाने तेवढे होते माझ्यापाशी. तिचे धन्यवाद वगैरे स्विकारुन मी पैसे दिले व ते पैसे स्विकारुन ‘ती’ निघून गेली.

ती जाताच माझ्या मैत्रिणीने मला फटकारलेच की विसर आता हे पैसे. तिची बत्ताशी खरी निघेल हे वाटलेच नव्हते तेव्हा. ‘ती’ गेली ती गेलीच. नंतर ती काही मला भेटली नाही. तो भेटला काही वेळा पण कुठेकाही मागमूस नाही. मी सुद्धा स्वत:हून पैसे परत मागितले नाहीत. असतात आपले काही घेणेकरी असा विचार करुन मी त्यांवर पाणी सोडले. माणूस चुकून विसरतो कधीतरी.

मुद्दा तो नाहीच मुळी, ज्यावेळी मी तिला मदत केली त्यावेळी शिक्षण, पुस्तकं, पार्ट-टाईम नोकरी, रुमचे भाडे, मेसचा डब्बा या सगळ्यांत महिन्याचा हिशेब जुळवणे ही कसरतच होती. घरुन पैसे घेणं मी जवळ-जवळ बंद करुन टाकलं होतं. जे करायचं ते स्वत:च्या बळावर हा नारा. त्यात हा भुरदंड (तेव्हा) मोठा होता. ‘ती’ला ते विसरणे फारच सहज, सोईस्कर व सोप्पं होतं. आणि मला…?

पुढे तिचे त्याच्याशी लग्न झाले. दोघांनी भरपूर पगाराच्या नोकऱ्या पटकावल्या. परदेशात राहिले बरीच वर्ष. त्यात आनंदच आहे. मधली काही वर्ष संपर्क तुटला. जुना विषय तर मी केव्हाच विसरले होते पण एक माणूसकी म्हणून ‘ती’ने नुसती आभासी ओळख तरी ठेवावी ना? ते ही नाही… आज एवढा काळ लोटल्यावर मी थोडीच पैसे परत दे म्हणणार आहे?

काही माणसं त्यांच्या विशिष्ट वर्तवणूकीमुळे लक्षात राहतात. ‘ती’ त्यांतलीच एक!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २३
‘ती’ – २२
‘ती’ – २१
‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape

‘ती’ – २२

24 10 2015

तो माझा पहिला बालमित्र. आम्ही एकाच वयाचे, एकाच वर्गात. ‘ती’, त्याची ‘आई’. ‘ती’ माझ्या आईच्या भीशी ग्रूपमधेही होती. एकाच कॉलनीत रहायचो आम्ही. आम्हा मुलांशी तशी ती प्रेमाने वागायची. मला आवडते म्हणून ‘नेसकफे’ची कॉफी तिने केल्याचे अजून आठवते. परक्यांशी नीट वागणारी ‘ती’ आपल्या मुलाशी मात्र असे का बरं वागली असेल?

‘ती’ सरकारी नोकरीत होती. नवरा खाजगी नोकरीत. सोन्या सारखा मुलगा. ‘दृष्ट लागावा असा संसार’ अशी म्हण आहे ना, तशी खरंच दृष्ट लागली बहुतेक… ‘ती’ तिच्याच बरोबर काम करत असणाऱ्या एक पुरुषाच्या नादी लागली. प्रेमात पडली, की नादी लागली, की त्याने तिला नादी लावले? कोणताही वाक्प्रचार वापरा अर्थ एकच! भरल्या संसारात ‘ती’ला हे वेगळेच डोहाळे लागले. ‘ती’ कोण्या आईंची भक्त होती. त्यांच्या सत्संगालाही जायची. तिथेही तो बरोबर असायचा. खरं खोटं देवच जाणो. पण हळूहळू तिचं मनं संसारातून उडायला लागले. तिच्या या वागण्याने ‘ती’ चर्चेचा विषय होऊ लागली.

मनाचे ऐकून, जनाची पर्वा न करता एके दिवशी ‘ती’ने घर सोडले. ‘ती’ व्यभिचारी ठरली. तेव्हा फार काही समजण्याची अक्कल नव्हती, तरी काहीतरी घडले हे कळले होते. सात-आठ वर्षांच्या माझ्या मित्राकडे सगळे ‘बिचारा’ म्हणून बघू लागले. त्याची आई कुठेतरी निघून गेली हे ऐव्हाना मित्रमंडळीत समजले होते. त्याच्या आई बद्दल त्याला एका चकार शब्दानेही विचारायचे नाही असा माझ्या घरुन दंडक होता. तेव्हा बालवयातही तिचा राग आला होता. एकदा तो मित्र चिक्कार आजारी पडला. हॉस्पिटल मधे होता. माझ्या आईनेही डबे पुरविल्याचे आठवते. पण तेव्हाही त्याची आई आली नव्हती. आई म्हणजे मायेचा निर्झर…हक्काची कुशी…प्रेमाची पराकाष्ठा! काय परिणाम झाला असेल त्या निरागस, निष्पापी मुलावर?

मित्राच्या घरी गावाहून आजीला आणले गेले. त्यांनी राहती जागा सोडली व दुसरीकडे राहायला गेले. पण आम्ही एकाच वर्गात, मैत्री होतीच, शिवाय एकाच ठिकाणी शिकवणी. दररोज भेट होत असे. सगळी मुलं एकत्र एकएकाच्या घरी खेळायला जमायचो. त्याची आजी फार लाड करायची त्याचे. आजी त्याला द्यायची ती लोणी-साखरेची वाटी अजून डोळ्यांसमोर येते. त्याच्याकडे ‘टेबल क्रिकेट’ चा खेळ होता. BSA SLR ची सायकल होती. इतरही चिक्कार खेळ होते पण कुठेतरी काहीतरी सलत होते. त्याच्यातही आणि आम्हा मुलांच्या मनातही!

पुढे आठवीत त्याचे कुटुंब(?) डोंबिवलीला निघून गेले. तरी दर वर्षी मे महिन्यात तो व त्याचे वडिल रत्नागिरीला येत असत तेव्हा आमच्याही घरी यायचे. दहावी नंतर विशेष थेट संपर्क राहिला नाही पण कोणा ना कोणा कडून हालहवाल कळायचा. घटस्फोट केव्हाच झाला. याच्या वडिलांनी दुसरा विवाह केल्याचे ही समजले.

‘ती’ ने मुंबईला बदली घेऊन त्या माणसाबरोबर राहत होती. ‘ती’ला संसारात कशाची कमी भासली असावी की तिने नवऱ्यासोबत मुलाचाही विचार केला नाही! व्यभिचार करायला का प्रवृत्त झाली ती? नवऱ्याची काही चूक होती?की मुळातच तिला हवा तसा जोडीदार नवऱ्यात मिळाला नाही? तिने उचललेलं पाऊल योग्य की अयोग्य हे तिलाच ठाऊक पण त्याने ऐहिक दृष्ट्या ‘ती’ तिरस्काराला पात्र ठरली. एक आई म्हणून ‘ती’ चुकलीच अाहे, असेल! पण एक ‘बाई’ म्हणून खरच ती चुकली का हे सांगणे तितकेच कठिण!

काहीही असो ‘ती’ मनावर एक वेगळाच ठसा उमटवून गेली. ‘ती’ ज्या आईंना मानायची, त्यांनी चांगलेच वर्तन करायची शिकवण दिली ना? मग हिने ते नाही आत्मसात केलं? पुढे अनेक वर्ष का कोण जाणे पण माझ्या डोक्यात त्या ‘आईं’ बद्दलही तिडीक गेली होती.

काही काळाने ‘ती’ गेल्याची बातमी आली. बराच पैसा-अडका मुलाच्या नावाने ठेवून ती गेली. मुलाने अग्नी द्यावा व अंतिम कार्य करावे ही ‘ती’ ची शेवटची ईच्छा होती. मुलाने ती पूर्ण केली की झिडकारुन टाकली हे माहित नाही. मुलाने ‘मुलाचे’ कर्तव्य पार पाडायला, ‘ती’ने कुठे ‘आई’ची कर्तव्य पार पाडली होती?

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २१
‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape

‘ती’ – २१

25 09 2015

अचानक ‘ती’ चे लग्न ठरल्याचे तिने कळविले. एकदम तडकाफडकी! लग्नकार्यही लगबगीने उरकले. मी तर विना लग्न पत्रिका, आमंत्रण स्विकारुन मंगलकार्यालयात पोहचले होते, मला आठवतंय. नवरा मुलगा दिसायला तिच्यापेक्षा गोरा, देखणा, उजवा, चांगली नोकरी, सुखवस्तू कुटुंब. ‘ती’ तशी सावळी, दिसायला चार-चौघींसारखी.

लग्नानंतर तिच्या आईकडून तिचे सासरचे किस्से कानावर येत होते. सासरी ती अगदी मजेत व आनंदात होती. सासूला सासूरवास ठाऊक नव्हता. दोघी सकाळी मस्त चहा घेत, गप्पा मारत बसायच्या, वगैरे. मलाही खूपच आनंद वाटला. प्रत्येक मुलीला असे सासर हवे असे वाटले.

हळूहळू ती संसारात रमली. एकाच शहरात राहून भेटी-गाठी कठिण झाल्या. पाच-एक वर्षां अलिकडची गोष्ट असावी. मी लक्ष्मी रस्त्यावर एका दुकानात शिरले आणि अचानक ‘ती’ दिसली. बरोबर नवराही होता. मी बोलायला गेले. ती ही बोलली – अलिप्तपणे, तुटक व मोजकंच! जणू मैत्री नसून आमची फक्त तोंडदेखली ओळख होती. काम झाले तशी, न थांबता दोघे नजरेआड गेलेही.

‘ती’शी छान मैत्री होती. पण ‘ती’ ने स्वत:च काही संपर्क ठेवला नाही. जणू ‘ती’ला टाळायचे आहे. मला की कोणाला? की एखादे कुणी नको ‘त्या’ विषयाला उगाच हात घालू नये म्हणून मुद्दाम…

‘ती’च्या लग्नाला नक्कीच दहा वर्ष झाली असावीत. अजून मुल-बाळ नाही. यामुळेच तर नसेल ना..? या बेरक्या समाजाने बोलचे असेल का तिला या टोकदार, धारेच्या सावालाने? इतके की ‘ती’ ने स्वत:च्याच कोषात स्वत:ला लपवून घेतले. दूर-दूर केले ‘ती’ने जाणून-उमगून, आपल्याला इतरांपासून…

की अजून काही असेल? घाईत झालेले लग्न फसवून तर केले गेले नसेल? एखादे व्यंग लपवायला? आणि ‘ती’ पदरी पडले व पावन झाले म्हणत जगतेय आपली. हे आणि असे खंडीभर प्रश्न मनात उभे राहतात ‘ती’चा विचार केला की.

मागे म्हणाले तसे – मुलं होणं, न होणं, मुलं होऊ देणं, न देणं हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे व आपण त्यात फार स्वारस्य घेणं मला पटत नाही. सहज म्हणून जाणून घ्यायलाही विचारते कोणीही – मुलं आहेत का? कोण आहे? किती? हा स्वाभाविकपणाचा एक भाग झाला. नेहमी हे विचारण्यात हिणविणे वा तुच्छ लेखणे हा हेतू असतो असे नाही. खाजगी असलेतरी ‘खाजगी’ वर्तुळाच्या आत घुसण्याची काहींना (निदान जिवाच्या मैतरांना) बुभा असतेच! आणि ती असावीच लागते…याने झालीच तर मदतच होते.

आज कितीतरी विनापत्य जोडपी नांदतायत आनंदाने. त्यांना प्रयत्न करुनही नाही झाली मुलं. हे वास्तव स्विकारुन, एकमेकांवर तितकेच प्रेम करत, जपत, सुखाने संसार करतात. यातील काहींनी अनाथ मुलांना दत्तक घेऊन आपले आणि त्या निराधार लेकरांचे आयुष्य संपन्न केले. अनेक जोडप्यांना (होणार असलीतरी) मुलं नकोच आहेत. ते आपल्या मतांवर ठाम आहेत. ओळखी-पाळखीतले मुलं असलेले लोकं जेव्हा मुलांच्या त्रासापाई आसवं गाळतात तेव्हा ही लोकं स्वत:ला भाग्यवानच समजत असतील. संसारसुखाला ‘मुलं असणं’ या मोजमापात तोलणंच मुळी चुकीचं आहे. मागासलेला समाज कधी कात टाकणार देव जाणे? बरं हा कलंक अजूनही लागतो फक्त बायकांचाच माथी. पुरुषांच्या पौषार्थाला कुठेही कणभर सुद्धा धक्का लावला जात नाही. मी काही वादात शिरत नाही किंवा पुरषांच्या विरोधात नाही. पण निदान आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती(?) प्रचलीत आहे. हे सुधारण्याची नितांत गरज आहे. प्रेम, आदर एकीकडे आणि शारिरीक व्यंग दुसरीकडे. माझ्या ओळखीत एक-दोघी आहेत ज्यांना चक्क फसवून विवाह करण्यात आला. एकीने घटस्फोट घेऊन सासरकडच्यांना अद्दल शिकवली. दुसरे लग्न करुन सुखी झाली. दुसरी दोष नसला तरी रोष ओढवून घेत जगतेय.

वाटल्याने सुख वाढते आणि संकटं, दुःख कमी होते. आणि म्हणूनच माझ्या या मैत्रिणीला सांगावेसे वाटते की तू ही अढी, हा न्यूनगंड मनातून काढून टाक व बोलती हो. हे यातले अगदीच काहीही असले/नसले तरी “मी खूप सुखात आहे!” एवढेच सांग…!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape

‘ती’ – १८

17 09 2015

परदेशात येण्या आधी, ‘हवामान’ हा चर्चेचा विषय असतो किंवा त्याला इतके कौतुक असते हे माझ्या ‘गावी’ (दोन्ही अर्थी 😉) नव्हते. इथे आल्यावर त्यामागचे कारण कळले. बेभरवशी हवामानावर सगळेच अवलंबून असते. सर्व ऋतुंमध्ये उन्हाळा श्रेयस्कर – मोठा दिवस, छान उन, थंडी/बर्फ नाही!

उन्हाळा सुरु झाला की लोक संध्याकाळी घराबाहेर पडून भटकताना दिसतात. बाबागाड्या बाहेर येतात. लहान चिल्ली-पिल्ली घसरगुंड्या, झोपाळ्यांजवळ गर्दी करताना दिसतात.

आमच्या चिरंजीवांनाही या वर्षी दुडदुडता येत असल्यामुळे कॉलनीत खेळायला (त्यांनी आम्हाला) बाहेर काढले. त्याचा एक मराठी मित्र झाला. मित्राच्या पालकांशी आमची ओळख झाली. नाव-गाव चौकशी केल्यावर माझ्या माहेरुन काहीतरी ओळख निघाली. नंतर काही दिवसांतच एक साडी घातलेल्या बाई संध्याकाळी कॉलनीत चक्कर मारताना दिसू लागल्या. ह्या त्या म्हणजे आजची ‘ती’.

‘ती’ उंच, सडसडीत अंगकाठी, पाचवारी साडी, चषमा, साठी ओलांडलेली, तरतरीत, आणि बोलण्यात ती ठराविक मालवणी लकब. ‘ती’ माझ्या मुलाच्या मित्राची आजी हे लगेच लक्षात आले. मग येता-जाता भेटी होऊ लागल्या. माझा लेकही ‘ती’ला ‘जीजी’ (त्याच्या भाषेत आजी) म्हणू लागला.

एकदा ‘ती’ ला मी माझे माहेरचे आडनाव सांगितल्यावर ‘ती’ मला सुखद धक्का देत म्हणाली,”माझ्या आईचे पण तेच आडनाव.” मी उडालेच. कारण आमचे आडनाव तसे अद्वितीय. ऐकीवात दुर्मिळ. या ‘ती’शी काही ना काही नाते निघणारच याची खात्री पटली. शिवाय ‘ती’ तिच्या गावी ज्या ठिकाणी राहते तिथेच माझ्या मामीचे माहेर. अशी दुहेरी ओळख!

घरी आईशी बोलून पक्के नाते शोधून काढले. उलगडलेले नाते ‘ती’ ला सांगणार एवढ्यात ‘ती’ भारतात परतली. मनातून हळहळले. परत कधी भेट होईल देव जाणे. पण ‘ती’ शी फोनवर नक्कीच बोलता येईल.

ह्या उन्हाळ्याचे आभार मानायला हवेत, त्याच्याचमुळे मला ‘ती’ अर्थात माझी एक (लांबची) आत्या मिळाली!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape

‘ती’ – १५

11 09 2015

मी एकोणीसाव्या वर्षी नोकरीला लागले. तेव्हा माझे सगळेच सहकारी माझ्याहून वयाने बरेच होते. मेहनतीचे फळ म्हणून असेल किंवा होतकरु, लहान म्हणून असेल पण सगळे प्रेमाने वागायचे, वागवायचे. ‘ती’ ही त्यांतलीच एक होती.

‘ती’ गोरी, नाकावर चष्मा, गोड हसू, खट्याळ बोलणं, सुबक ठेंगणी. ‘ती’ बंगाली. पण पुण्यात वाढल्यामुळे मराठी तर इतके अस्खलित बोलते की मातृभाषा असूनही, मराठी बोलायची लाज वाटते अशा अमराठी जीवांना थोतरीत बसेल. ‘थोडंसं खाल्लं की आणखी जास्त भूक लागते’ याला ‘ती’ (बंगाली असूनही) ‘भूक खवळली’ हा वाक्प्रचार वापरते. यातच सगळे आले. ‘ती’ चे इंग्रजीही अफलातून आहे, अगदी अग्रगणी व सुप्रसिद्ध वर्तमानपत्रात पत्रकारीता करण्या इतके. पण मला ‘ती’ची वेगळी ओळख करुन द्यायची आहे.

‘ती’ चे एका मुलावर प्रेम होते. तिच्या बोलण्यात त्याचा खूप वेळा उल्लेख असायचा. वयाच्या अदबीमुळे मी स्वत:हून त्याच्याबद्दल तिला कधीच काही विचारले नव्हते. तो मुंबईचा होता एवढेच ठाऊक. एकदा तो तिला भेटायला येणार होता. जेवणाच्या सुट्टी आधी थोडावेळ ती मला म्हणाली,”रुही बेबी, (हो. मला बेबी झाले तरी ती अजूनही मला याच नावाने हाक मारते) तो आलाय. चल तू पण. आपण एकत्र बाहेर जाऊ लंचला.” तेव्हा ‘कबाब में हड्डी’ वगैरे गावीही नव्हते. मी पण तिच्या खास मित्राला भेटूया या उत्साहात तिच्या बरोबर निघाले. आम्ही वेळेच्या आधीच रेस्टॉरंटला पोहचलो आणि टेबल रिझर्व केला. वाट पाहत असताना एक तरुण आत शिरला. तिच्याकडे बघून हसत आमच्या दिशेने आला. लागलीच आणखी एक तरुण आत येताना दिसला. त्याचा काखेत कुबड्या होत्या. तो आमच्या टेबलवर येताच ‘ती’ ने माझी ओळख करुन दिली. मला एका क्षणासाठी काहीच कळेनासे झाले. हे अनपेक्षित होते. भानावर येत मी हस्तांदोलन केले. आधी आलेला तरुण त्याचा मित्र होता. गप्पा करत करत जेवण झाले. पुढे त्याच्याशी छान ओळख झाली.

धडधाकट असलेल्या ‘ती’ चा ‘तो’ दोन्ही पायांनी पांगळा आहे. हे पचविणे मला जड गेले. तिचे घरचे लग्नाला तयार नव्हते. तब्बल आठ एक वर्षांनी त्या दोघांनी लग्न केले. तो कामानिमित्त परदेशात आला. दोघांनी तिथेच संसार थाटला. तो हुशार आहे. त्याच्या बुद्धीने त्याने कमतरतेवर मात केली. त्याने उत्तम करियर घडविले.

कालांतराने मी ही परदेशी आले. आम्ही फोनवर बोलत होतो. ‘ती’ सांगत होती,”अॉफिस जवळच घर बघतो आम्ही. बरं पडते. मी इकडे गाडी चालवायला लागले. त्याला ऑफिसला सोडावे-आणावे लागते. तो गाडी चालवतो पण मलाही गाडी लागते बाहेरची कामे करायला.” तिचे सगळेच आयुष्य त्याच्या भोवती फिरत होते. तिच्या बोलण्यात त्याच्यासाठी कुठे आईची माया होती, कुठे बायको या नात्याने त्याच्या हुशारीचे कौतुक होते, कुठे प्रेयसीची काळजी होती, कधी त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान डोकावत होता. दाखवायला ही राग, तक्रार, त्रागा, कंटाळा नव्हता. आणि वेळप्रसंगी यातील एक किंवा सगळ्या गोष्टी तिने दर्शविल्या असत्यातरी ते वागणे मनुष्यसुलभ वृत्तीला धरुनच आहे. तेवढी मुभा तिला नक्कीच आहे. संयम नेहमीच बाळगता यावा अशी सक्ती कुठं आहे?. तो कधी ढळला ही असेल. बोलणे आणि करणे यात जमिन-अस्मानाची तफावत असते. आणि ‘ती’ सगळं आनंदाने करतेय.

तिची परदेशात स्थिरावण्याची मुख्य कारणं होती, अपंगांसाठी इथे असलेल्या सोई, दिली जाणारी समानतेची वागणूक. अगदी खरं होते ते. परदेशात अपंगांना दयेचा नजरेने कोणी बघत नाही. त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी योग्य त्या सोई करण्यात मात्र देश कार्यशील असतो. अशांसाठी खास प्रकारच्या कार, आरक्षित पार्कींग, दुकानांमधे बसून खरेदी करता येईल अशा बैठ्या गाड्या, व्हीलचेरसकट आत जाता येईल अशा बस, तशी प्रसाधनगृह आणि पुष्कळ काही.

प्रेम आंधळं असतं म्हणतात पण ‘ती’ ने असे काही प्रेम केले की प्रेमाला एका नविन अर्थ, एक नविन परिभाषा दिली! ‘ती’ने त्याचे आयुष्य नुसते सुखकरच नाही तर सुकर ही केलं.

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape

‘ती’ – १४

11 09 2015

‘ती’ च्या बद्दल खूप वेळा लिहावं वाटलं – तिच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका मिळाली तेव्हा, ती आजी झाली तेव्हा, तिचा व्हॉटस् ॲपचा फोटो पाहिला तेव्हा…निमित्त बरीच होती पण योग जुळून येत नव्हता. आज तिच्याशी बोलावे असे खूप वाटले. तिच्याशी छान तासभर गप्पा मारल्या. दोघीही फ्रेश झालो. तिचे खळखळणारे हसू ऐकले आणि वाटलं आजच लिहायला घ्यावे.

‘ती’ मुंबईची. रुईयाची. एस्.वाय. ला होती तेव्हा लग्न झाले. सासरी आली तेव्हा तिला काहीच स्वयंपाक येत नव्हता ते (ज्याने आत्ता तिच्या हातचे खाल्लेय त्याला) सांगून विश्वास बसणार नाही. तिच्या नवर्याने तिचा पदार्थ जमून आला नाही म्हणून ताट भिरकावले होते. तिने लगेच ते आव्हान स्विकारले. नुसतेच स्विकारले नाही तर त्यात बाजीही मारली. आज तिचा नवरा तिच्या स्वयंपाकाची तारीफ करताना थकत नाही.

संसारात पूर्णपणे रमली असताना अचानक नशीबाने परिक्षा घेतली. तिच्या नवर्याला तरुण वयात ह्रदयविकाराचा झटका आला आणि शस्त्रक्रिया करावी लागली. हॉस्पिटल मागे लागले. डॉक्टरांशी भेटी होत होत्या. त्यातून तिला एका नविन ‘पर्फुशनीस्ट’ नावाच्या ‘पॅरामेडिकल’ क्षेत्राशी ओळख झाली. पुढे नवर्याची तब्येत सुधारली. तिने ‘पर्फुशनीस्ट’ चा वर्षभराचा कोर्स करायचे ठरविले. त्याच अभ्यासक्रमासाठी ती पुण्यात होती, जेव्हा आमची भेट झाली. नवर्या-मुली पासून लांब राहून तिने कोर्स पूर्ण केला. परत आपल्या गावी जाऊन नोकरीला लागली.

चौकटीच्या बाहेर पडून तिने एक वेगळे पाऊल टाकले. शिक्षणानंतर एका तपानंतर तिचे करियर सुरु झाले. तिचा निर्णय सत्यात उतरविण्यात तिच्या नवर्याचा मोलाचा वाटा होताच, मुलीचे-घरच्यांचे सहकार्य होतेच पण तिची जिद्धही होतीच! कुठलीही गोष्ट पूर्णत्वाला नेण्याकरिता, ती करण्यासाठीची जिद्ध लागते. सबबी, पळवाटा शोधल्या की चिक्कार सापडतात पण त्यावर मात करता यायला हवी. मग प्रगती ही होणारच! आज ‘ती’ स्वतंत्रपणे स्वत:च्या पायावर उभी आहे.

‘ती’च्या नातीचे कौतुक ऐकून झाल्यावर मी तिला ‘आजीबाई’ म्हणून चिडवत विचारले,”काय गं, लेकीचा बाल-विवाह केलास?” त्यावर तिचे उत्तर,”बाल-विवाह तिचा कुठे? बाल-विवाह तर माझा झाला होता!” पुढे ती म्हणाली,”मुलीचे तिनेच जमविले. सगळे वेळीच झाले की चांगले. थांबायचे कारण नव्हते मग करुन टाकले तिचे.” मलाही पटते – कमी वयात आपण जास्त परिवर्तशील असतो. पार्टनरशी जुळवून घ्यायला सापं जाते. वयामुळे जितके विचार प्रगल्भ होतात, तितकेच ते ठाम होत जातात व जुळवून घेणे कठिण होत जाते. संसार म्हंटलं की सगळे पुढे-मागे, कमी-जास्त जुळवून घेतातच. इथे वय कोवळे असण्याचा फायदाच जास्त होत असावा. अगदीच वीशीत नाही पण शिक्षण पूर्ण झाले व नोकरीला लागून स्थिरावलो की पंचविशी उलटतेच, आणि तेच वय योग्य. त्यावयात योग्य जोडीदाराची योग्य साथ मिळाली की दोघांचे आयुष्य बहरु शकते असे मला तरी वाटते. असो! हे ज्याचे त्याचे वैयक्तिक प्राधान्य आहे.

परवाच ‘ती’ने व्हॉटस् ॲपवर तिचा ‘सितार’ वाजवितानाचा फोटो टाकला. तो बघून मी (हम आपके हैं कोन स्टाईलने) तिला विचारले,”बजाना-वजाना भी आता हैं, या सिर्फ पोज लेगे खडी हो?”. तिचे लगेच उत्तर आले,”अगं शिकतेय सितार. बरेच वर्षापासून ईच्छा होती.” मी मनातून आनंदले. कुठलीही नविन गोष्ट शिकायला, करायला कधीच उशीर झालेला नसतो हे ‘ती’ने पुन्हा दाखवून दिले.

नेहमी प्रमाणे मी या ‘ती’ची नीटशी ओळख करुन देते – ‘ती’ गोरी, घारी, उंच आहे, लांब केस, उत्साही, बोलघेवडी व हसरी आहे. आशा आणि जगजीतसाठी वेडी आहे. ‘ती’ चिरतरुण आहे आणि तशीच राहवी असे मला वाटते. आम्ही पेईंग गेस्ट होतो तिथे ही ‘ती’ काही महिने माझी शेजारी होती. माझ्या या मैत्रिणीत आणि माझ्यात तब्बल दहा वर्षांचा फरक आहे पण मैत्रीला थोडंच वयाचे बंधन असते?

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape

‘ती’ – १२

3 09 2015

खडकमाळ मधे पोलिस वसाहतीत तिचे घर होते. पहिली छोटीशी खोली म्हणजे तिचे ‘पार्लर’. एक आरसा, त्यालाच जोडून तिचे साहित्य ठेवायचे टेबल, गिर्हाईक बसेल ती खुर्ची, अवघडलेपण टाळायला पडदा, एवढे सगळे आणि उभ्याने काम करण्यासाठी परतायला जेमतेम जागा उरत होती. ‘ती’ कडे मी केस कापायला जात असे. मुलगी मेहनती होती, काम चोख करायची, शिवाय ओळखीतून तिच्याकडे गेले होते.

गोरी, उंच, लांब केस, त्यांची कायम एक जाड वेणी, तपकीरी डोळे, दिसायलाही बरीच म्हणाली लागेल, वय पंचविशी पुढचे असावे कारण लग्नाळू होती.

‘ती’ कडे गेलं की गप्पा व्हायच्या. ती घरच्यांबद्दल वगैरे बोलायची. तिचं लग्न ठरायला उशीर होत होता यामुळे ‘ती’ च्या घरचे चिंतेत होते. ती सुद्धा बरेच उपास-तापास करायची.

थोड्या महिन्यात ‘ती’ने लग्न ठरल्याची बातमी दिली. नवरा कोण कुठला ते सांगून, ‘ती’ आनंदाने पुढे बोलत होती,”तू रत्नागिरीचा ना गं? मग तुम्हाला चांगलंच जवळ आहे राजेंद्र (नाव बदलले) महाराजांचे गाव. त्यांच्याच आशीर्वादाने लग्न ठरले!” मला कळायला काही मार्ग नव्हता. तिने खुलासा केला – “मी महाराजांच्या दर्शनाला गेले. त्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले एका महिन्यात तुझं लग्न ठरेल. आणि अगदी तसेच झाले बघ”. मी महाराजांकडे का गेले नाही? ते किती महान आहेत वगैरे ती सांगत राहिली.

माझ्या विवेकबुद्धीला हे काही पटणारे नव्हते तरी तिला मी काहीच बोलले नाही. एक तर माझा बुवा-महाराजांवर विश्वास नव्हता-नाही. तसेच या महाराजांचे ‘खरे’ कारनामे बहुश्रृत होते. म्हणूनच हा पाजी बुवा आमच्या प्रांतातला असलातरी त्याचा ‘भक्तगण’ घाटावरच्या भागातला होता. जनतेला टोप्या घालणार्यांपेक्षा, त्या घालून घेण्यार्यांची मला जास्त कीव येते.

कालांतराने ती सासरी गेली, रूळली. अचानक तिने काम बंद केले. का विचारायची गरज नव्हतीच पण तरी तिने स्पष्टीकरण दिले,”महाराजांच्या कृपेने गोड बातमी आहे!” 🙂

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape

अ.चि.गो.- २. राग

31 07 2015

त्याचे सगळे वेळेवर व्हावे म्हणून तिची धडपड. त्यात त्याला पसारा करायची आवड. सारखी त्याची तिच्या आजूबाजूला घुटमळायची सवय. ती गर्क आपल्या कामात. असाच तो अचानक तिच्या मागे येऊन उभा राहतो. ती वळते आणि हातातले काहीबाही खाली पडते. ती रडकुंडीला येते. रागाने ओरडते त्याच्यावर. नाराज होत सोफ्यावर बसते. तो जवळ येतो, आपल्या दोन्ही हाताने तिचा चेहरा ओंजळीत घेतो आणि हलकेच आपले ओठ टेकवितो तिच्या ओठांवर. तिच्या रागाचे अवसान गळून पडते. त्याला घट्ट कवटाळल्याशिवाय तिला राहवत नाही.

~~~~~~~~~~~~~~~~

इतर अगदी चिमुकल्या गोष्टी :-

१. चौथी खोली

‘ती’ – ७

12 09 2014

Note : या ‘ती’ ला आपण ‘त्या’ म्हणूया. कारण मी त्यांना एकेरी संबोधत नाही.

‘त्या’ आल्याच! माझ्या बाळाच्या बारशाच्या आमंत्रणाचा स्वीकार करुन ‘त्या’ नक्की येतील असे वाटत होते. पण तरी आडवळणाचा, भर उन्हाळ्यातला, कंटाळवाणा, परगावचा प्रवास करून त्या येतील का? त्यांना मुलांच्या गडबडीत जमेल का? असे प्रश्न मनात डोकावून जात होते. पण ‘त्या’ आल्याच… ‘माझ्या’ साठी ‘त्या’ आल्याच!

तब्बल ४ वर्षांनंतरची भेट. एकमेकींना बघून आम्ही मनोमन सुखावलो. माझ्या बाळाला त्यांनी प्रेमाने जवळ घेतलं. मी म्हणाले “छान वाटले आलात.” त्यावर त्या म्हणाल्या “राहवलेच नाही. ठरवलं काही झालं तरी तुला भेटायचंच. मुलं पण म्हणाली – आई, तू जाच. आम्ही करतो मॅनेज. आयुष्यात पहिल्यांदा एकटीने परगावचा प्रवास केला.” माझ्या घरच्यांच्या तर त्या चांगल्याच परिचयाच्या आहेतच पण माझ्या नवर्याला त्या प्रथमच भेटत होत्या. पुढे गप्पा रंगल्या.

‘त्या’ माझ्या ८ वी – १० वी च्या टिचर! ऐन पंचविशीतल्या, गोर्यापान, उंच, प्रसन्न व्यक्तिमत्व, चेहर्यावर कायमस्वरुपी फुललेलं हसू, आणि अगदी बोलघेवड्या! वडिलांचा विरोध पतकरुन त्यांनी प्रेमविवाह केला होता. रत्नागिरी सारख्या छोट्या शहरात ते गुपीत राहतं तर नवलंच. आमचा ५-६ मैत्रिणींचा ग्रुप होता. आम्ही त्यांच्या भोवती घोळका करु लागलो. त्या ही आमच्यात सामील झाल्या. त्यांच्या घरापासून समुद्र जवळ. एकदा आम्हा मैत्रिणींचा समुद्रावर जाण्याचा बेत ठरला. त्यांनी स्वतः घरी येण्याचे सुचविले का आम्हीच स्वतःहून त्यांच्या घरी गेलो हे नीटसं आठवत नाही पण त्या नंतर जातच राहिलो, जातच राहिलो. त्यांच्या वाढदिवसाला गेलो, त्यांचे बाळ बघायला गेलो, कधी शिकायला परगावी जाते हे सांगायला, कधी रिझल्ट कळवा़ला, कधी नोकरीचे पेढे, कधी onsite हून आणलेली, (त्यांच्या मुलांसाठी मुद्दाम राखून ठेवलेली) chocolates द्यायला, कधी मनं मोकळ्या गप्पा मारायला, नंतर लग्नासाठी कुणालातरी पसंत केला हे सांगायला, जातच राहिलो. एक जगावेगळ्या मैत्रीचे, आदरयुक्त प्रेमाचे नाते जडले होते. आम्हा मैत्रिणींंबरोबर त्या समुद्रावर यायच्या, गप्पा, भेळ-आईस्क्रिम, भाजका बुट्टा, खूप धम्माल यायची. चटकन सगळे डोळ्यांसमोर तरळले.

पुढे करियर, लग्नानवये सगळ्या मैत्रिणी विखुरलो. पण मी रत्नागिरीला गेले की न चुकता त्यांना भेटत होते. ते अगदी लग्नापर्यंत. मग परदेशात आल्यावर फोनवर बोलणं होत होतं. माझी pregnancy ची बातमी ऐकून माझ्या घरच्यांइतकाच त्यांनाही आनंद झालेला. मी बाळाला घेऊन भारतात आले हे त्यांना कळल्या पासून आम्ही भेटीचा मनसुबा आखत होतो पण काही ना काही कारणाने योग येत नव्हता. शेवटी देवाने तो योग जुळवून आणला. पुढच्या प्रत्यक्ष भेटीपर्यंत पुरेल एवढा आनंद मनात सामावून घेतला आम्ही दोघींनी. बाकी अप्रत्यक्ष भेटींची अनेक साधनं आहेतच – fb, email, picasa albums, वगैरे.

निघताना खूप आशीर्वाद देऊन, कौतुक करुन ‘त्या’ गेल्या. त्यांची ती माया पाहून सगळेच थबकले. काही ऋणानुबंधच असे असतात!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape

‘ती’ – ६

11 09 2014

‘ती’ माझ्या लांबच्या नात्यातली. ‘ती’ च्या बहिणीला मी ओळखते. ‘ती’ ला मी कधीच पाहिले नाही, मग बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण हल्ली खूप मनातून आतून तिच्याबद्दल वाटायला लागलंय. परिस्थितीच तशी आहे.

‘ती’ अवघी २२ वर्षांची. हुषार. फस्ट क्लासने कंप्युटर ईंजिनीयरींग करुन नोकरीच्या शोधात होती. काही वर्षांपासून छाती, पोट व पोठदुखीचा त्रास होता. दुखीने डोकं वर काढलं की (तेवढ्यापुरते) औषधोपचार करत होती.

मागच्या महिन्यात Liver Cancer with metastasis चे निदान झाले. रोगाने पूर्ण शरिराचा ताबा घेतला. उपचाराला वावच नाही. मुंबईतल्या प्रख्यात हाॅस्पिटलने देखील घरी न्या सांगितले. Chemo, liver transplant काहीकाही शक्य नाहीए. ‘आभाळ कोसळणे’ वगैरे वाक्प्रचार थीटे पडावेत अशी वेळ आली घरच्यांवर. जो जे आयुर्वेदाचे, गावठी उपचार सांगेल तिथे तिथे घेऊन जातात तिला. काही खायची ईच्छा होत नाही तिला. या ‘काही’ मधे फक्त पेय – तांदळाच्या पेजेचे पाणी, वगैरे.

आपल्या मुलीची ही अशी स्थिती बघताना काय यातना होत असतील आई वडिलांना? का नाही या रोगाचे फार आधीच निदान झाले?

आणि तिला स्वतःला काय वाटतं असेल? काहीच पाहिलं-उपभोगलं नाही तिने आयुष्यात. दर क्षणाकडे काय मागणं असेल तिचे? की आता काहीच ईच्छा उरली नसेल? दूरवर येऊन ठेपलेला शाश्वत अंत, तसूंतसूंभर जवळ येतोय ही भावना कित्ती भयावह आहे?

आधी कुणी फोन केला तर “मी बरीए” असे कोणालातरी परस्पर उत्तर द्यायला सांगायची. आत्ता फक्त रडते. तशीही स्वभावाने आधी पासूनच ‘ती’ अबोल!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape
%d bloggers like this: