‘ती’ – २३

28 10 2015

‘ती’ माझी दूरची नातेवाईक. उन्हाळ्यात ती कुटुंबासोबत अमेरिका फिरायला आली होती. आमचे निमंत्रण स्विकारुन ‘ती’ घरी आली. खरंतर ती आमची पहिली आणि (आता म्हणावं लागतंय) शेवटची भेट!

‘ती’ ला दोन मुली. मोठीचे वय १३/१४ असेल तर लहान ८/९ वर्षांची. ‘ती’ चांगल्या हुद्द्यावर नोकरीला होती. सावळी, बेताची उंची, मध्यम बांधा. दर दिवशी न चुकता योगासनं, सुर्यनमस्कार, खाण्या-पिण्यात पथ्य, ‘ती’ आम्हाला सुदृढ राहणे कसे जरुरीचे आहे हे सांगत होती. मस्त जेवण, (तिच्या आवडीची) वोडका, गप्पांबरोबर माहोल छान रंगला होता. दुसऱ्या दिवशी त्यांना नायगाराला निघायचे होते. भरपूर फिरुन, खरेदी करुन, मजेत सुट्टी घालवून ‘ती’ भारतात परतली.

मागच्या महिन्यात एका पहाटे फोन किणकिणला. ‘ती’ची तब्येत अचानक बिघडली, ‘ती’चे काही खरं नाही…ही बातमी! एकदम काही सुचेनासे झाले. मग कळले, दुपारी ‘ती’ गणपती कार्यक्रमात मुलीच्या नाच बघत असताना कोसळली व बेशुद्ध झाली. आधी घरचा डॉक्टर व मग हॉस्पिटलला नेले तोवर मेंदूत रक्तस्त्राव होऊन ‘ती’ची तब्येत गंभीर झाली होती. त्या दिवशी रात्री तिला कृत्रिम श्वासोश्वास देणाऱ्या यंत्रावर ठेवण्यात आले. डॉक्टरांनी ‘ती’ला ‘ब्रेन डेड’ अर्थात ‘मेंदू निकामी मृत’ घोषित केले. वैदकीय दृष्ट्या ‘ती’ गेलेली होती. पण तरी काहीतरी चमत्कार होईल आणि ती डोळे उघडेल म्हणून तिचे घरच्यांनी (खोटी) आशा बाळगून तिचा कृत्रिम श्वासोश्वास सुरु ठेवला होता. तिची केस सांगून भारतभरातील, परदेशात इतर कुठे, काही मदत मिळते का ते शोधण्यात आले पण सगळीकडून नकारच येत होता. फार भीषण परिस्तिथी झाली होती. कृत्रिम श्वासोश्वासामुळे ऊर धडधडत असतो आणि ते पाहून आपले माणूस जिवंत असल्यासारखे वाटते. आणि अशा वेळी मन सत्य स्विकारायला तयार होत नाही.

‘ती’ ला उच्च रक्तदाबाचा त्रास होता, ज्याकडे तिने कानाडोळा केला. शिवाय तिला रक्तवाहिन्यांचा एक विकार होता, ज्यात त्यांच्या भिंती नाजूक होतात. त्यामुळे अती रक्तप्रवाह झाल्यास त्या लगेच फुटतात किंवा वाहिन्यांना कोंब येतात. ‘aneurysm’ असे नाव आहे त्या दोषाचे. हे ती गेल्यानंतर कळले. परंतू हा विकार अनुवंषिक असू शकतो व तिच्या नातेवाईकांची ही चाचणी करावी लागली.

मेंदूतील रक्तस्त्राव इतका झाला की मेंदू व कवटी यातील पूर्ण जागा रक्ताच्या गुठळ्यांनी भरली. ‘ती’चे वाचणे अशक्य झाले. सगळे शरिर नियंत्रित करणारा मेंदूच निकामी झाला. वैदकीय भाषेत याला ‘ब्रेन डेड’ म्हणतात. आणि कानूनी भाषेतही ‘ब्रेन डेड’ म्हणजे ‘डेड’! यापुढे तिला किती काळ कृत्रिम श्वासोश्वासावर ठेवायचे हे हॉस्पिटलने घरच्यांवर सोपविले. ७-८ दिवसात ‘ती’ गेल्याचे कळले.

जो पर्यंत आपल्या माहितीतल्यांशी एखादी गोष्ट होत नाही तोवर आपल्याला त्याचे गांभीर्य कळत नाही. ‘ती’ गेली! आमच्या घरी आम्हा जमलेल्यांनी ती सांगत होती,”मीच तुमच्यात वयाने सगळ्यांत मोठ्ठी आहे पण मीच सर्वांच्यात फिट आहे!”. काटेकोर पथ्य, व्यायाम करणाऱ्या ‘ती’चे शब्द आठवले. तिच्या मुलींसाठी जास्त हळहळायला होते. जाताना ‘ती’, तिच्या मुलींच्या चेहऱ्यावरची ‘हसी-खुशी’ घेऊन गेली…!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २२
‘ती’ – २१
‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape

Advertisements
‘ती’ – २२

24 10 2015

तो माझा पहिला बालमित्र. आम्ही एकाच वयाचे, एकाच वर्गात. ‘ती’, त्याची ‘आई’. ‘ती’ माझ्या आईच्या भीशी ग्रूपमधेही होती. एकाच कॉलनीत रहायचो आम्ही. आम्हा मुलांशी तशी ती प्रेमाने वागायची. मला आवडते म्हणून ‘नेसकफे’ची कॉफी तिने केल्याचे अजून आठवते. परक्यांशी नीट वागणारी ‘ती’ आपल्या मुलाशी मात्र असे का बरं वागली असेल?

‘ती’ सरकारी नोकरीत होती. नवरा खाजगी नोकरीत. सोन्या सारखा मुलगा. ‘दृष्ट लागावा असा संसार’ अशी म्हण आहे ना, तशी खरंच दृष्ट लागली बहुतेक… ‘ती’ तिच्याच बरोबर काम करत असणाऱ्या एक पुरुषाच्या नादी लागली. प्रेमात पडली, की नादी लागली, की त्याने तिला नादी लावले? कोणताही वाक्प्रचार वापरा अर्थ एकच! भरल्या संसारात ‘ती’ला हे वेगळेच डोहाळे लागले. ‘ती’ कोण्या आईंची भक्त होती. त्यांच्या सत्संगालाही जायची. तिथेही तो बरोबर असायचा. खरं खोटं देवच जाणो. पण हळूहळू तिचं मनं संसारातून उडायला लागले. तिच्या या वागण्याने ‘ती’ चर्चेचा विषय होऊ लागली.

मनाचे ऐकून, जनाची पर्वा न करता एके दिवशी ‘ती’ने घर सोडले. ‘ती’ व्यभिचारी ठरली. तेव्हा फार काही समजण्याची अक्कल नव्हती, तरी काहीतरी घडले हे कळले होते. सात-आठ वर्षांच्या माझ्या मित्राकडे सगळे ‘बिचारा’ म्हणून बघू लागले. त्याची आई कुठेतरी निघून गेली हे ऐव्हाना मित्रमंडळीत समजले होते. त्याच्या आई बद्दल त्याला एका चकार शब्दानेही विचारायचे नाही असा माझ्या घरुन दंडक होता. तेव्हा बालवयातही तिचा राग आला होता. एकदा तो मित्र चिक्कार आजारी पडला. हॉस्पिटल मधे होता. माझ्या आईनेही डबे पुरविल्याचे आठवते. पण तेव्हाही त्याची आई आली नव्हती. आई म्हणजे मायेचा निर्झर…हक्काची कुशी…प्रेमाची पराकाष्ठा! काय परिणाम झाला असेल त्या निरागस, निष्पापी मुलावर?

मित्राच्या घरी गावाहून आजीला आणले गेले. त्यांनी राहती जागा सोडली व दुसरीकडे राहायला गेले. पण आम्ही एकाच वर्गात, मैत्री होतीच, शिवाय एकाच ठिकाणी शिकवणी. दररोज भेट होत असे. सगळी मुलं एकत्र एकएकाच्या घरी खेळायला जमायचो. त्याची आजी फार लाड करायची त्याचे. आजी त्याला द्यायची ती लोणी-साखरेची वाटी अजून डोळ्यांसमोर येते. त्याच्याकडे ‘टेबल क्रिकेट’ चा खेळ होता. BSA SLR ची सायकल होती. इतरही चिक्कार खेळ होते पण कुठेतरी काहीतरी सलत होते. त्याच्यातही आणि आम्हा मुलांच्या मनातही!

पुढे आठवीत त्याचे कुटुंब(?) डोंबिवलीला निघून गेले. तरी दर वर्षी मे महिन्यात तो व त्याचे वडिल रत्नागिरीला येत असत तेव्हा आमच्याही घरी यायचे. दहावी नंतर विशेष थेट संपर्क राहिला नाही पण कोणा ना कोणा कडून हालहवाल कळायचा. घटस्फोट केव्हाच झाला. याच्या वडिलांनी दुसरा विवाह केल्याचे ही समजले.

‘ती’ ने मुंबईला बदली घेऊन त्या माणसाबरोबर राहत होती. ‘ती’ला संसारात कशाची कमी भासली असावी की तिने नवऱ्यासोबत मुलाचाही विचार केला नाही! व्यभिचार करायला का प्रवृत्त झाली ती? नवऱ्याची काही चूक होती?की मुळातच तिला हवा तसा जोडीदार नवऱ्यात मिळाला नाही? तिने उचललेलं पाऊल योग्य की अयोग्य हे तिलाच ठाऊक पण त्याने ऐहिक दृष्ट्या ‘ती’ तिरस्काराला पात्र ठरली. एक आई म्हणून ‘ती’ चुकलीच अाहे, असेल! पण एक ‘बाई’ म्हणून खरच ती चुकली का हे सांगणे तितकेच कठिण!

काहीही असो ‘ती’ मनावर एक वेगळाच ठसा उमटवून गेली. ‘ती’ ज्या आईंना मानायची, त्यांनी चांगलेच वर्तन करायची शिकवण दिली ना? मग हिने ते नाही आत्मसात केलं? पुढे अनेक वर्ष का कोण जाणे पण माझ्या डोक्यात त्या ‘आईं’ बद्दलही तिडीक गेली होती.

काही काळाने ‘ती’ गेल्याची बातमी आली. बराच पैसा-अडका मुलाच्या नावाने ठेवून ती गेली. मुलाने अग्नी द्यावा व अंतिम कार्य करावे ही ‘ती’ ची शेवटची ईच्छा होती. मुलाने ती पूर्ण केली की झिडकारुन टाकली हे माहित नाही. मुलाने ‘मुलाचे’ कर्तव्य पार पाडायला, ‘ती’ने कुठे ‘आई’ची कर्तव्य पार पाडली होती?

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २१
‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape

‘ती’ – २१

25 09 2015

अचानक ‘ती’ चे लग्न ठरल्याचे तिने कळविले. एकदम तडकाफडकी! लग्नकार्यही लगबगीने उरकले. मी तर विना लग्न पत्रिका, आमंत्रण स्विकारुन मंगलकार्यालयात पोहचले होते, मला आठवतंय. नवरा मुलगा दिसायला तिच्यापेक्षा गोरा, देखणा, उजवा, चांगली नोकरी, सुखवस्तू कुटुंब. ‘ती’ तशी सावळी, दिसायला चार-चौघींसारखी.

लग्नानंतर तिच्या आईकडून तिचे सासरचे किस्से कानावर येत होते. सासरी ती अगदी मजेत व आनंदात होती. सासूला सासूरवास ठाऊक नव्हता. दोघी सकाळी मस्त चहा घेत, गप्पा मारत बसायच्या, वगैरे. मलाही खूपच आनंद वाटला. प्रत्येक मुलीला असे सासर हवे असे वाटले.

हळूहळू ती संसारात रमली. एकाच शहरात राहून भेटी-गाठी कठिण झाल्या. पाच-एक वर्षां अलिकडची गोष्ट असावी. मी लक्ष्मी रस्त्यावर एका दुकानात शिरले आणि अचानक ‘ती’ दिसली. बरोबर नवराही होता. मी बोलायला गेले. ती ही बोलली – अलिप्तपणे, तुटक व मोजकंच! जणू मैत्री नसून आमची फक्त तोंडदेखली ओळख होती. काम झाले तशी, न थांबता दोघे नजरेआड गेलेही.

‘ती’शी छान मैत्री होती. पण ‘ती’ ने स्वत:च काही संपर्क ठेवला नाही. जणू ‘ती’ला टाळायचे आहे. मला की कोणाला? की एखादे कुणी नको ‘त्या’ विषयाला उगाच हात घालू नये म्हणून मुद्दाम…

‘ती’च्या लग्नाला नक्कीच दहा वर्ष झाली असावीत. अजून मुल-बाळ नाही. यामुळेच तर नसेल ना..? या बेरक्या समाजाने बोलचे असेल का तिला या टोकदार, धारेच्या सावालाने? इतके की ‘ती’ ने स्वत:च्याच कोषात स्वत:ला लपवून घेतले. दूर-दूर केले ‘ती’ने जाणून-उमगून, आपल्याला इतरांपासून…

की अजून काही असेल? घाईत झालेले लग्न फसवून तर केले गेले नसेल? एखादे व्यंग लपवायला? आणि ‘ती’ पदरी पडले व पावन झाले म्हणत जगतेय आपली. हे आणि असे खंडीभर प्रश्न मनात उभे राहतात ‘ती’चा विचार केला की.

मागे म्हणाले तसे – मुलं होणं, न होणं, मुलं होऊ देणं, न देणं हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे व आपण त्यात फार स्वारस्य घेणं मला पटत नाही. सहज म्हणून जाणून घ्यायलाही विचारते कोणीही – मुलं आहेत का? कोण आहे? किती? हा स्वाभाविकपणाचा एक भाग झाला. नेहमी हे विचारण्यात हिणविणे वा तुच्छ लेखणे हा हेतू असतो असे नाही. खाजगी असलेतरी ‘खाजगी’ वर्तुळाच्या आत घुसण्याची काहींना (निदान जिवाच्या मैतरांना) बुभा असतेच! आणि ती असावीच लागते…याने झालीच तर मदतच होते.

आज कितीतरी विनापत्य जोडपी नांदतायत आनंदाने. त्यांना प्रयत्न करुनही नाही झाली मुलं. हे वास्तव स्विकारुन, एकमेकांवर तितकेच प्रेम करत, जपत, सुखाने संसार करतात. यातील काहींनी अनाथ मुलांना दत्तक घेऊन आपले आणि त्या निराधार लेकरांचे आयुष्य संपन्न केले. अनेक जोडप्यांना (होणार असलीतरी) मुलं नकोच आहेत. ते आपल्या मतांवर ठाम आहेत. ओळखी-पाळखीतले मुलं असलेले लोकं जेव्हा मुलांच्या त्रासापाई आसवं गाळतात तेव्हा ही लोकं स्वत:ला भाग्यवानच समजत असतील. संसारसुखाला ‘मुलं असणं’ या मोजमापात तोलणंच मुळी चुकीचं आहे. मागासलेला समाज कधी कात टाकणार देव जाणे? बरं हा कलंक अजूनही लागतो फक्त बायकांचाच माथी. पुरुषांच्या पौषार्थाला कुठेही कणभर सुद्धा धक्का लावला जात नाही. मी काही वादात शिरत नाही किंवा पुरषांच्या विरोधात नाही. पण निदान आपल्या देशात पुरुषप्रधान संस्कृती(?) प्रचलीत आहे. हे सुधारण्याची नितांत गरज आहे. प्रेम, आदर एकीकडे आणि शारिरीक व्यंग दुसरीकडे. माझ्या ओळखीत एक-दोघी आहेत ज्यांना चक्क फसवून विवाह करण्यात आला. एकीने घटस्फोट घेऊन सासरकडच्यांना अद्दल शिकवली. दुसरे लग्न करुन सुखी झाली. दुसरी दोष नसला तरी रोष ओढवून घेत जगतेय.

वाटल्याने सुख वाढते आणि संकटं, दुःख कमी होते. आणि म्हणूनच माझ्या या मैत्रिणीला सांगावेसे वाटते की तू ही अढी, हा न्यूनगंड मनातून काढून टाक व बोलती हो. हे यातले अगदीच काहीही असले/नसले तरी “मी खूप सुखात आहे!” एवढेच सांग…!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape

‘ती’ – २०

19 09 2015

माझ्या ऑफिसमधे काही भारतीय सहकारी होते. ‘ती’ ही त्यातलीच एक. सगळ्यांशी ‘ती’ फटकून वागायची. म्हणून सगळे तिला बिचकून असायचे. सहसा ‘ती’ च्या वाट्याला कुणी जायचे नाही. मी मराठी आहे हे कळल्यावर ती डेस्कपाशी थांबली. मोघम कोण-कुठली हे बोलणे झाले. तिचे किस्से एकून, रवैय्या बघून, एरवी मराठीचा धागा जुळला की स्वत:हून बोलायला जाणारी मी तिच्यापासून चार हात लांबच होते.

‘ती’ मुंबईची, आय.आय.टी. ची, पुढे इकडे एम.एस्. केले, कॉम्पूटर फिल्डमधे आली कारण इतरांच्याहून लवकर ग्रीन कार्ड मिळते, दिसायला काळी-सावळी, उंच, दांडगत, गळ्यापर्यंतचे पिंजारलेले केस, उद्धत वाटावे असे बोलणे, अजागळ राहायची. तिच्याबद्दलचे मत सिद्ध व्हावे असाच तिचा आविर्भाव.

दर आठवड्याला मिटींगच्या शेवटी दोन नविन जणांनी स्वतःची ओळख करून द्यायची हा पायंडा पाडलेला – नाव, शिक्षण, गाव (गावाची थोडक्यात ओळख), अनुभव. त्याप्रमाणे ‘ती’ची पाळी आली. ‘ती’ आपल्या मुंबईबद्दल काय बोलते ते ऐकायला मी उत्सुक झाले. मुंबईची ओळख करुन देताना ‘ती’ म्हणाली – “what to tell you about Mumbai?ummmm…it is famous for slum areas. You guys must have watched ‘Slumdog millionaire'”. मुंबईची ही अशी ओळख करुन देणारी ही पहिलीच महाभाग! मला अगदीच न राहवून मी म्हणाले “अगं, मुंबईची ही एवढीच ओळख???”. मग काहीतरी थातूरमातूर बडबड करून ‘ती’ खाली बसली. पुढे काय बरळली ते संतापाच्या भरात मला ऐकू आले नाही. अमेरिकेसाठी जे महत्व न्यू योर्कला, ते भारतात मुंबईला! पण तिच्याकडून दुसरी काय अपेक्षा?

मी कॉफी तयार करायला पॅन्ट्रीमधे गेले की ‘ती’च्याशी गाठ पडायची. हळूहळू आम्ही बोलू लागलो. माझ्यापेक्षा ‘ती’च बोलू लागली… ‘ती’ चा लेटेस्ट बॉयफ्रेंड हाफ अमेरिकन-हाफ युरोपियन होता. तो ड्रगस् वगैरे घ्यायचा. मग पोलिसांनी त्याला पकडले आणि ‘आत’ टाकले. नंतर यांचे फाटले. ‘ती’ काही कारण नसताना मला सांगत होती. ‘ती’ने स्वत: तसे काही केलंय असं सांगितले असते तरी मला आश्चर्य वाटले नसते. ‘ती’ सुद्धा डिप्रेशन मधे होती. काही काळ तिने ईलाज घेतला त्यावर. नंतर एकदा मला म्हणाली,”तुझ्या ओळखीत एखादे मराठी स्थळ (अर्थात अमेरिकेत राहणारे) असेल तर मला सुचव. फक्त एकच अट आहे की मला मुलं नकोत.” मुलं होऊ देणं, न देणं हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे व मी तिच्या निर्णयाचा आदर करते. पण त्यामागचे तिचे कारण मजेशीर वाटले. मी गप्प ऐकून घेतले. तसंही मी तिच्या फंदात पडणार नव्हते.

आम्ही ‘मत्सालय’ पाहायला जाण्याचा बेत आखलाय हे कळल्यावर ‘ती’ स्वत:हून आम्ही न बोलावता आमच्याबरोबर येते म्हणाली. मीही तिला नको म्हंटले नाही. निघायला जमल्यावर सांगते,”माझ्या गाडीत सगळा पसारा असतो. माझी गाडी म्हणजे माझा संसारच आहे. अजून एका व्यक्तीलाही बसता येणार नाही. उलट मीच तुमच्या गाडीत येते.” सगळ्यांच्या कपाळावर आठ्या आल्या. कारण ज्याच्या गाडीत जागा शिल्लक होती त्याचे घरचे वाय-फाय, शेजारी होती म्हणून, ही बया न विचारता (निर्ल्लजपणे फुकट) वापरत होती. असो.

ऑफिसमधील लोक एकदम आश्चर्यचकित झाले होते की कोणाशी न बोलणारी ‘ती’ माझ्याशी काय बोलत असते! आणि ‘ती’ जे काही मला सांगायची ते इतरांना सांगण्या पलिकडचे होते. पण त्याचबरोबर ती मला ‘वेड पांघरुन पेडगावला नेणार’ नाही याची मी काळजी घेतली. मी भारतात परतले आणि संपर्क तुटला. ठेवावा एवढी मैत्रीही नव्हती.

काही वर्ष लोटला व अचानक ‘ती’ने मला सोशल साईट वर रिक्वेस्ट पाठवली. विस्मृतीत गेलेल्या ‘ती’च्या सगळ्या स्मृती (फार रंजक नव्हत्या तरी) पुन्हा जाग्या झाल्या.

‘ती’ ने आपली एक-एक पानं माझ्याचसमोर का उघडी केली देव जाणे. आणि मी तरी तिचे बोलणे का ऐकून घेतले? काय गोम होती कुणास ठाऊक? ‘ती’च्याशी बोलण्यात दवडलेल्या माझ्या आयुष्यातल्या वेळेवर ‘ती’चे नाव लिहिलेलं होते बहुतेक!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape

‘ती’ – १९

17 09 2015

नोकरी बदलून मी नविन ठिकाणी रुजू झाले आणि पहिल्याच दिवशी माझा सहकारी खूप चिंतेत दिसला. दक्षिण भारतीय होता तो. मी घाबरतच विचारले तेव्हा कळले की त्याच्या बायकेची उद्या ‘बायोप्सी टेस्ट’ आहे. त्यात काही असामान्य निष्कर्ष निघू नयेत या विवंचनेत तो होता. मी त्याला थोडा धीर देण्याचा प्रयत्न केला. पण समोर येऊन ठेपलेल्या संकटाची जणू त्याला चाहूल लागली होती.

पुढचे दोन दिवस तो सुट्टीवर होता. सोमवारी तो आला तेव्हा त्याला बघून काय ते कळून गेले. त्याच्या बायकोचे स्तनाच्या कर्करोगाचे निदान पक्के झाले होते. दोन लहान मुली – मोठी आठ वर्षांची तर धाकटी दोन – सव्वा दोन. दर दिवशी ‘ती’च्या निरनिराळ्या चाचण्या होत होत्या. तिचा कर्करोग जास्त पसरल्यामुळे ऑपरेशनच्या आधी किमोथेरपी देऊन तो आटोक्यात ठेवण्याचा निर्णय झाला होता. रोज काहीतरी नविन कळत होते. हळूहळू त्याला मिळणारा इडली-सांबर, दही-भाताचा डब्बा कमी होत गेला. तिच्या मुलींचे हाल होऊ लागले. तो सांगत होता,”माझी मोठी मुलगी एकदम सामंजस्याने वागू लागली आहे. छोटीला काही कळत नाही. ती आई मिळत नसल्याने जास्त हट्टी होतेय.” मुलींकडे लक्ष देण्याकरिता तिच्या आईला भारतातून बोलवून घेतले होते. अचानक आणि अशा परिस्थिती आलेली तिची आई भांबावून गेली होती. मनाची तयारी नसलेल्यांना परदेशात तसाही मोठा सांस्कृतिक धक्का बसतोच.

तो सांगत होता,”ती खूप विचलीत झाली. ‘ती’ चे कमरे एवढे केस, तिच्या उपचारांकरिता कापून बॉयकट केला. तिचे लहानपणापासूनचे लांब केस होते. अजून काय काय बघावे लागणार देवाला माहित?” जणू काही तो धक्का ‘ती’ला आजारा एवढाच वेदनादायी होता. मला त्यामागचे गांभीर्य लक्षात आले. वरकरणी छोटी वाटणारी बाब, केवढी शल्य ठरु शकते.

काहीशा रुढिवादी पार्श्वभूमीत वाढलेल्या ती’ च्या साठी परदेशात येणे हेच ‘मोठे आव्हान होते. इथे रुळते न रुळते तोच नियतीने जीवघेणा सारिपट मांडला होता. ‘ती’ची या रोगाशी झुंज सुरु होती, उपचार चालू होते. शस्त्रक्रियाही झाली ते कळले होते. प्रचंड तणाव, उद्या काय होईल याची धाकधुक, आपण यातून जगू का, जगलोच तर अजूण किती काळ जगू ही शंका?, नाही तरुन गेलो तर पुढे? कसलीच शाश्वती नाही. ‘ती’ च्या आजारपणात तिच्यासहित सगळा संसार होरपळून निघाला होता.

नंतर मी ती नोकरी सोडली. ते पुन्हा भारतात परतले. ‘ती’ चा विचार अधूनमधून मनात येत होता. आज त्याच्याकडे ‘ती’ ची घाबरतच चौकशी केली. आणि तिची प्रगती कळली. ‘ती’ कर्करोगरुपी संकटावर विजय मिळवून सुखरुप बाहेर पडली होती.

‘ती’ ला मी कधीच भेटले नाही, पाहिले नाही. पण तरी तिच्याकरिता देवाचा आशिर्वाद मागितला होता, प्रार्थना केली होती. आज ‘ती’ पूर्ण बरी आहे हे जाणून फार बरं वाटतेय! ‘ती’ अशीच सशक्त व निरोगी राहवी हेच अभिष्ट चिंतन…!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape

‘ती’ – १८

17 09 2015

परदेशात येण्या आधी, ‘हवामान’ हा चर्चेचा विषय असतो किंवा त्याला इतके कौतुक असते हे माझ्या ‘गावी’ (दोन्ही अर्थी 😉) नव्हते. इथे आल्यावर त्यामागचे कारण कळले. बेभरवशी हवामानावर सगळेच अवलंबून असते. सर्व ऋतुंमध्ये उन्हाळा श्रेयस्कर – मोठा दिवस, छान उन, थंडी/बर्फ नाही!

उन्हाळा सुरु झाला की लोक संध्याकाळी घराबाहेर पडून भटकताना दिसतात. बाबागाड्या बाहेर येतात. लहान चिल्ली-पिल्ली घसरगुंड्या, झोपाळ्यांजवळ गर्दी करताना दिसतात.

आमच्या चिरंजीवांनाही या वर्षी दुडदुडता येत असल्यामुळे कॉलनीत खेळायला (त्यांनी आम्हाला) बाहेर काढले. त्याचा एक मराठी मित्र झाला. मित्राच्या पालकांशी आमची ओळख झाली. नाव-गाव चौकशी केल्यावर माझ्या माहेरुन काहीतरी ओळख निघाली. नंतर काही दिवसांतच एक साडी घातलेल्या बाई संध्याकाळी कॉलनीत चक्कर मारताना दिसू लागल्या. ह्या त्या म्हणजे आजची ‘ती’.

‘ती’ उंच, सडसडीत अंगकाठी, पाचवारी साडी, चषमा, साठी ओलांडलेली, तरतरीत, आणि बोलण्यात ती ठराविक मालवणी लकब. ‘ती’ माझ्या मुलाच्या मित्राची आजी हे लगेच लक्षात आले. मग येता-जाता भेटी होऊ लागल्या. माझा लेकही ‘ती’ला ‘जीजी’ (त्याच्या भाषेत आजी) म्हणू लागला.

एकदा ‘ती’ ला मी माझे माहेरचे आडनाव सांगितल्यावर ‘ती’ मला सुखद धक्का देत म्हणाली,”माझ्या आईचे पण तेच आडनाव.” मी उडालेच. कारण आमचे आडनाव तसे अद्वितीय. ऐकीवात दुर्मिळ. या ‘ती’शी काही ना काही नाते निघणारच याची खात्री पटली. शिवाय ‘ती’ तिच्या गावी ज्या ठिकाणी राहते तिथेच माझ्या मामीचे माहेर. अशी दुहेरी ओळख!

घरी आईशी बोलून पक्के नाते शोधून काढले. उलगडलेले नाते ‘ती’ ला सांगणार एवढ्यात ‘ती’ भारतात परतली. मनातून हळहळले. परत कधी भेट होईल देव जाणे. पण ‘ती’ शी फोनवर नक्कीच बोलता येईल.

ह्या उन्हाळ्याचे आभार मानायला हवेत, त्याच्याचमुळे मला ‘ती’ अर्थात माझी एक (लांबची) आत्या मिळाली!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape

‘ती’ – १७

15 09 2015

‘ती’ लग्न होऊन माझ्या शेजारच्या घरात मधली सून म्हणून आली. ‘ती’ ऐन पंचविशीतली, गोरी, उंच, लांब सडक केस, दिसायला सुंदर, पदवीधर होती. तिचा नवराही सुस्वभावी होता. तीन मुलगे, सुना, सासू, सासरे असे एकत्र कुटुंब. गोंडस मुलगा झाला ‘ती’ला. बाळ अगदी मातृमुखी. पण काय कशाने कुणास ठाऊक तिचा नवरा दारुच्या आहारी जाऊ लागला. दारुच्या नशेत गाडी चालवताना, तोल ढळला व शेजारुन जाणार्या ट्रकच्या चाकांखाली गेला. एका क्षणात सगळे संपले. अवघे सहा महिन्यांचे बाळ, दीड वर्षांचा संसार!

तिनेच सासरी राहण्याचा निर्णय घेतला की तिचे माहरचे घेऊन गेले नाहीत की सासरच्यांनी तिला ठेऊन घेतले ते कळायला मार्ग नाही. पण तो गेल्या नंतर ती सासरीच राहिली. राहिली ते बरोबरच, हेही तिचे घर होतंच ना! हळूहळू सावरली. मुलात रमली. एके दिवशी ‘ती’ चा पुनर्विवाह होत असल्याची बातमी कळली. महत्वाचे म्हणजे हा विवाह तिच्या सासरच्यांनी जमवून दिला. हे फारच सुखावह होते. विनापत्य असलेल्या विदुराशी तिचं लग्न झाले. तिचे कन्यादान ‘ती’च्या आई-वडिलांनी नाही तर सासू-सासर्यांनी केले. आपल्या गेलेल्या मुलाची शेवटची निशाणी असलेला आपला नातू डोळ्यांसमोर राहवा हा जरी (म्हणायला) स्वार्थी हेतू असला तरी त्यांनी सूनेच्या भविष्याच्या देखील आपलेपणाने विचार केला. तिच्या सुखाला प्राधान्य दिले. ‘ती’ वर देवाने जो अन्याय केला होता त्याला भरपाई म्हणून आई-वडिलांसारखे सासू-सासरे दिले. स्वत:च्या आईचा उल्लेख नसेल एवढा ‘ती’च्या बोलण्यात ‘आमच्या आई’ (सासूबाई) असा उल्लेख असायचा. नविन नात्यासोबतच ‘ती’ने जुने पाश बांधून ठेवले होते. ‘ती’चे सासर तिचे माहेर झाले होते.

‘ती’ चा हा नवरा चांगला होता. त्यांनी ‘ती’च्या मुलाला अंतर दिले नाही. पुढे त्यांनाही मुलं झाले. आज ‘ती’ आनंदात आहे का हे माहित नाही पण समाधानी नक्कीच आहे. मागे भेटले तेव्हा ‘ती’ ने स्वत:चा घरगुती जिन्नस करुन (वा बनवून घेऊन), विकण्याचा व्यवसाय सुरु केल्याचे कळले. मी तिच्या दुकानात काही खरेदी केली.

मेतकुट जरा जास्त हवे होते. ‘ती’ म्हणाली,”मी परवा आमच्या आईंकडे येणार आहे. तेव्हा तुला घरपोच देते मेतकुट. चालेल ना?”. मी ‘हो’ म्हणून पैसे चुकते करुन तिच्याकडून निघाले. ‘आमच्या आई’ हे दोन शब्द समाधान देत, मनात घुमत राहिले…

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape
%d bloggers like this: