एक मोऽऽऽठ्ठ्ठा माणूस!

17 10 2012
“एकीकडे सगळं जगं आहे, आणि दुसरीकडे ‘मी’…तर सांग बघू तू कोणाकडे जाशील?” हा त्यांचा मला नित्याचा प्रश्न! मस्करीत माझे उत्तर “जगाकडे…” हे एकून त्यांच्या चेहर्‍यावर मिष्किलवजा खट्टू आविर्भाव आणि माझ्या चेहर्‍यावर ‘विजयी’ मुद्रा. असे हे अगदी ते जाईपर्यंत सुरु होते…
ते एकुलते एक. लहानपणीच त्यांची आई गेली. वडिलांनीच (आबांनी) यांना वाढविले. म्हणूनच असेल कदाचित त्यांच्यात एक विलक्षण लाघवी ‘मूलपण’ होते.

काही कारण्यास्त्व एकत्र कुटुंब सांभाळायची जबाबदारी पेलावी लागणार्‍या आबांना स्वत:च्या मुलाची कुवत असूनही मेडिकलला पाठवता आले नाही. तरीही त्याला चांगले संस्कार आणि शिक्षण देण्यात ते कुठेच कमी पडले नाही. ती अपुरी इच्छा आपल्या मुलीला डॉक्टर करुन पुर्ण केली. अनेक लोकांनी नाके मुरडली की मुलीला एवढे शिकवून काय फायदा, ती तर लग्न होऊन सासरी जाणार. पण त्यांना आपल्या लेकीची कुवत ठाऊक होती, किंबहुना विश्वासवजा खात्रीच होती. आम्ही दोघी बहिणी त्यांच्या खूप लाडक्या! आम्हा भावंडांचेच नाही तर आमच्या सगळ्या गोतवळ्यात ‘चिल्लर पार्टी’ चे ते खूप लाड करत. म्हणून ते ही मुलांचे लाडके होते. माझी मामे-भावंडे त्यांना ‘चिऊ-पप्पा’ म्हणत. माझे घरातले नाव ‘चिऊ’ आणि माझे पप्पा त्यांना स्वत:च्या पप्पांसारखे प्रिय, म्हणून त्यांचे ‘चिऊ-पप्पा’. आमच्याशी ते आमच्या वयाचे होऊन खेळत.

माझ्या बहिणीवर त्यांचा विशेष जीव होता. तिच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी हे नेमके देवासारखे तिच्यासमोर तिच्यासाठी हजर होत. हा प्रत्यत तिला नेहमी येत असे. ती telepathy होती की काय ते देव जाणो… आता वाटते ते फक्त त्यांचे त्यांच्या लेकीसाठीचे प्रेम होते!

माझ्या जन्माच्या वेळची एक गोष्ट आहे. एका मुली नंतर तुम्हाला मुलगा होईल असे वाटले होते. मी झाले आणि तुम्ही थोडे नाखुष झालात. पण मला हातात घेतलेत आणि तुमची नाराजी कुठंच्या कुठे पळून गेली. तुमच्याच भाषेत सांगायचे तर “हा मोठ्ठा कापसाचा गोळा होतीस तू, चेहरा अगदी आईसारखा, वाटले माझी आईच आलीए!” मी शाळेत काही केल्या जात नव्हते म्हणून महिनाभर ते माझ्याबरोबर शाळेत येऊन बसत होते. मला ते शाळेतले दिवस, तो ‘रंजन’ हॉलमधे कोपर्‍यात भरणारा L.K.G. चा क्लास अजून आठवतो.

माझी फोटोग्राफीची आवड अनुवंशीक आहे. त्यांनाही फोटोग्राफीचे वेड होते. त्यांच्या बॉक्स-कॅमेर्‍याने ते भरपूर फोटो काढायचे. रोल मात्र मुंबईहून डेवलप करुन आणायचे. मी कॅमेरा हातात घेतला तो ते गेल्या नंतर. आपला एखादा तरी फोटो त्यांनी पाहायला हवा होता असे वाटत रहाते. शाबासकी देणारे ते हात मात्र आज नाहीत.

विज्ञानाची प्रचंड आवड, रसायनशास्त्रात हातखंड. घरीच कपड्यांसाठीची निळं, अगरबत्ती, वेगवेगळी अत्तरं बनविणे, मिक्सर – washing machine – radio दुरुस्त करणे. आमचा आवज, गाणी टेप करुन ठेवणे हा त्यांचा छंद. त्यावेळी गंमत म्हणून केलेल्या गोष्टी आता अनमोल ठेवा होऊन बसल्या आहेत.

अवघ्या तिशीत त्यांनी चाकोरीबद्ध आयुष्याविरुद्ध बंड पुकारुन स्वत:चा व्यवसाय सुरु केला आणि स्वत:च्या हिमतीवर केमिकल फॅक्टरी काढली. व्यवसाय म्हटले की उतार-चढाव आलेच. त्यांनी खूप कष्ट केले. आम्हाला काही मागायच्या आधीच वस्तू मिळालेली असायची. त्यात विविध पुस्तके, निबंधमाला, dictionary, drawing books, colors आणि त्याच बरोबर Basket Ball, Tennis racket, Badminton racket, Chess etc board games, खेळाची पुस्तके हे देखील असायचे. धंद्यामुळे त्यांच्या जेवायच्या वेळाही ठरलेल्या नसायच्या. आम्हालाही फार वेळ देता यायचा नाही. आम्ही मुले मोठी झाल्यावर त्यांना विचारत असू – “तुम्ही इतरांच्या बाबांसारखी नोकरी का नाही केली?” त्यावर ते म्हणत “मी मोऽऽऽठ्ठ्ठा माणूस आहे आणि मोऽऽऽठ्ठ्ठी माणसे स्वत:चा व्यवसाय करतात”. त्याचा आताकुठे थोडा अर्थ कळायला लागलाय. आणि तेव्हा आपण किती क्षुद्र विचार करत होतो हे आज जाणवतेय.

तल्लख बुध्दी, सुधारलेली विचारसरणी, खेळकर व शांत स्वभाव, सदैव हसतमुख असा चेहरा, कोणत्याही प्रतिकुल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता, हळूवार पण सखोल विचार लाभलेली वाणी, जगमित्र असे ते एक प्रसन्न व्यक्तिमत्व! अशा पित्रू-छायेत वाढल्याचे भाग्य लाभले हे आमचे नशिबच. तुमचा खरंच खूप अभिमान वाटतो. तुम्ही जे संस्कार दिलेत त्यातील अर्धे जरी आम्हाला पुढेच्या पिढीला देता आले तरी जीवन सार्थक झाले असे समजू!

तुम्ही अचानक आमच्यातून निघून गेलात आणि बरेच काही अर्धवट राहिले. तुम्हाला जाऊन आज ७ वर्ष झाली तरी अजुन तुमचा भास होतो, तुमची प्रेमळ हाक एकू येते आणि खरचं सगळं घडले का? असा प्रश्न पडतो…

कुठेतरी मोरपंखी निळ्या रंगाचे कापड दिसते (जो तुम्ही तुमच्या कारखान्यात बनवायचात), अगरबत्तीचा सुगंध दरवळतो (तुम्हाला अगरबत्ती बनविण्याचे कौशल्य आत्मसात होते), कोण्याच्यातरी तोंडून “ए-वन!” अशी कशालातरी दाद जाते (जे तुमचे पेटंट होते) आणि जीव तुमच्या आठवणीने अगदी गलबलून जातो. सगळीकडे तुमचे अस्तित्व आहे असे जाणवत रहाते.

आणि हो पप्पा – तुमच्या प्रश्नाचे खरं उत्तर द्यायला खूप उशीर झालाय पण तरीही मला खात्री आहे तुम्हाला माहित होते की “एकीकडे सगळं जगं असेल, आणि दुसरीकडे तुम्ही असाल तर मी तुमच्याचकडे येईन!!!” Pops, I miss you so much…always…!

Page copy protected against web site content infringement by Copyscape


हे वाचेले का? –
पापा केहते थे…!
‘ती’ – २

23 11 2011

तिच्या विषयी लिहायला घेतलं खरं पण नक्की कुठून सुरुवात करु आणि काय काय लिहू असे झाले क्षणार्धात…’ती’ माझ्या आयुष्यातले सगळ्यात प्रभावी व्यक्तिमत्व!
 
तिचे माहेर सिंधुदुर्गातले छोटेसे खेडे ‘पोईप’ आणि तिला दिले देवगडच्या ‘हिंदळे’ गावात. लग्नानंतर ती मुंबईत आली असावी. मुंबईच्या चाळींमधे जसे अनेकांनी संसार केले तसा हिने सुद्धा. ती तिथेच थांबली नाही. चेंबुरच्या हाऊसिंग बोर्डच्या बिल्डींग मधे स्वत:ची हक्काची जागा घेण्यापर्यंत तिने मजल मारली. ‘ती’च्या घराची दारं सगळ्यांच्या स्वागतासाठी नेहमी उघडी होती.

ती अतिशय जिद्धी, खंबीर, मनाने हळवी, हौशी, प्रेमळ, सुधारीत विचारसरणीची, विशाल ह्रुदयी आणि त्या सगळ्या गुणांना पूर्णत्व देणारा एक असामान्य गुण, तो म्हणजे – दानशूरपणा.

नवर्‍याची जेमतेम पगाराची मिलमधली नोकरी. त्यात त्यांची नोकरीची धरसोड सुरु असायची. मग हिने देखील काही ना काही करुन संसाराला हात भार लावला. दूधाचे सेंटर अनेक वर्ष चालविले. पहाटे लवकर उठून दूधाच्य गाड्या आल्या की दूध उतरवून घेणे, दूध पोचविणार्‍या मुलांकडे त्यांच्या लाईनच्या पिशव्या तयार करुन देणे. सगळा हिशोब बघणे. जातीने लक्ष घालून ती काम करत असे. कायम कष्ट करण्यात आयुष्य गेलं तिचे.

स्वत:च्या मुला-बाळांबरोबर तिने अनेकांना आपलेसे केले, अनेक होतकरु नातेवाईकांना आधर दिला. ते दिवस माणुसकीला महत्व देणारे. हिच्या अनेक ओलखी-पाळखी. कित्येक जणांना हिच्या शब्दाखातर नोकरी मिळाली असेल. परत याबद्दल कोणाकडेही वाच्यताही नाही. कोणालाही कसलीही मदत करायला ही सगळ्यांच्या पुढे. ज्याला जे हवे ते देणे, आपल्याला जमेल ती मदत करणे हा नियम होता. तिचा धडपडा स्वभाव ती जाईपर्यंत तिच्यात होता. कधी लोक गैरफायदाही घेत, पैशाला फसवत. पण हिने त्यांना माफ केले आणि आपले चांगले वागणे सोडले नाही. सगळ्यांच्या सुख-दु:खात ती धावून गेली.  मुलंही तशीच हिच्या वळणावर गेली.
 
दिसायला गोरीपान, अतिशय देखणी, उंच, मध्यम बांधा, पाचवरी साडी, केसांचा छानसा आंबाडा, मोठे कुंकु, वयोमननुसार लागलेला भिंगचा चष्मा. शंकर हे तिचे आराध्य दैवत. त्याच्यावर तिची निस्सीम श्रद्धा. पण त्याच्या कुठेही बाऊ नाही की उगाच थोटांड नाही. खोटेपणा, दिखाऊपणा तिच्या रक्तातच नव्हता. तिच्या वागण्यात एक भावणारा मनस्वीपणा होता. फिरायची भयंकर आवड. १२ ज्योतिर्लिंग आणि बराच भारत फिरुन झाला होता. हाताला चव अशी की नुसती आमटी केली तरी खाणारा बोटं चोखत बसेल. तांदळ्याच्या शेवया-नारळाचा रस, सातकाप्याचे घावनं, इत्यादी पदार्थांमधे तिचा हातखंड होता. कालागणिक हे पदार्थसुद्धा नामशेष झाले.

प्रेमळ स्वभावाला सीमा नाही – इतका की जावयाला मुलगा करुन घेतले आणि सुनांवर मुली सारखीच माया. सगळ्यांचे खूप लाड होत. मुलगी-जावई-नात चिंचवडला होते. त्यांची आठवण आली की त्यांच्यासाठी खाऊ, मासे (मुंबईत ताजे मिळतात ना…) घेऊन ही पहाटेच मुंबईहून पुण्याला निघायची. बस नाही मिळाली तर मिळेल त्या वहानाने ही चिंचवड गाठायची. अतिश्योक्ती वाटेल पण हे खरं आहे – अनेक वेळा तिने ट्रक-टेंपो मधून देखील लिफ्ट घेतली आहे. एकदम निडर आणि तितकीच घरंदाज. तिच्या बद्दल त्या ट्रक-टेंपोवाल्यांनाही आदर वाटला असणार यात काही शंका नाही.

माझ्यावर तिचा अतिशय जीव. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला ती मुंबईहून न चुकता रत्नागिरीला यायची. सोबत रात्रभर जागून, एस.टीच्या गराड्यातून मांडीवर सांभाळत आणलेला Monginis चा केक असायचा. आजही ते आठवले की तिच्या आठवणींनी गहिवरुन येते.

मे महिन्याच्या सुट्टीत तिच्याकडे चेंबुरला जाऊन राहाणे म्हणजे एक परवणीच! मी, माझी मोठी बहिण आणि माझा मामे भाऊ… आमच्या तिघांचे अतिशय लाड केले तिने. खेळ, पुस्तके, कपडे, खाऊ, त्यावेळी भाड्याने (तासावर) सायकल, रेखाच्या दुकानातला दूधाचा पेप्सीकोल व क्रीम वेफर्स (पिकविक), चेंबुर स्टेशन जवळची भेलपुरी, सरोजची स्वीट कचोरी, ‘यांकी डूडल’चे आईस्क्रीम, मोंजिनिजचा केक, घसितारामची मिठाई, असे एक न अनेक हट्ट तिने पुरवले. मला अजूनही आठवतेय मी आणि माझा मामे भाऊ तासावर भाड्याने सायकल आणायचो. बिल्डिंगच्या ग्राऊंडवर आम्ही सायकल चालवायचो. नेमकी त्याच वेळी शेजारची (आमच्याच वयाची) ‘चारु’ आमच्या त्या सायकलसाठी हट्ट करुन रडायची. आम्हाला प्रेमळ विनवणी व्हायची “द्या रे बाळांनो तिला थोडा वेळ सायकल” आणि ‘ती’ च्यासाठी चारुला सायकल द्यायचो. त्या चारुचा भयंकर राग यायचा. आत्ता हसू येते. मी दुसरीत असल्यापासून तिला इंग्लिशमधे पत्र लिहायचे. त्याचे तिला कोण कौतुक! माझी मामी तिला ती पत्र वाचून दाखवायची. वर्षभराची अशी ही माझी पोस्ट कार्ड ती  जमवून ठेवायची. त्या दिवसांची आज आठवण आली की खरंच वाटते “लहानपण देगा देवा..”

तब्येतीची कुठलीही पथ्य तिने कधीच पाळली नाहीत. २ महिने आरामासाठी लेकीकडे गेली. त्याच दरम्याने तिचा मेहुणा (बहिणीचा नवरा) वारला. मुंबईत परतली आणि ही बातमी कळताच बहिणीसाठी जीव कळवळला. लगोलाग तिला भेटायला घेऊन जा असे मधल्या मुलाला म्हणाली. मुलुंडला बहिणीच्या बिल्डिंग खाली आली. बहिणीचे कसे सांतवन करु या विचाराने भावना अनावर झाल्या आणि त्यातच ह्रुदयविकाराच तीव्र झटका आला. पहिल्या पायरीवर मुलाच्या हातात प्राण गेला. वय ६३. कोणालाच विश्वास बसण्या पलिकडची घटणा. ती गेली ती तारीख २२ नोव्हेंबर. काल तिला जाऊन १८ वर्ष झाली. शेवटी काय ‘जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला’ हेच खरं.

ती गेली तो मनाला चटका लावून. ती एक आदर्श स्त्री होती -चांगली मुलगी, बहिण, पत्नी, आई, वहिनी, जाऊ, सासू, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक उत्कृष्ट आजी होती. होय… ती माझ्या आईची आई… माझी ‘आजी’! माझ्या वडिलांची आई ते लहान असतानाच गेली. त्यामुळे त्याची भरपाई म्हणून असेल कदाचित की देवाने दोन आजींची एकत्र मिळून ही अशी ‘एक’ आजी दिली. आम्ही खूप मोठे व्हावे ही तिची ईच्छा. तिने केले संस्कार नकळत आमच्यात रुजले. म्हणून की काय कोण जाणे तिच्याच सारखी माझीही (बर्‍याच उशीरा) पण नकळत शंकरावर श्रद्धा जडली. माझी बहिण डॉक्टर व्हावी हे तिचे स्वप्न. तिला क्रिकेट मधे अतिशय रुची. त्या काळी तिला हा खेळ समजत होता, टि.व्ही वर सामने बघण्यात ती मग्न होत असे. तिचीच सुप्त इच्छा असावी म्हणून माझा मामे-भाऊ क्रिकेटर (fast bowler) आहे. त्याचे क्रिकेटचे वेड अनुवंशिक आहे. सल एवढीच की हे सगळे बघायला ती आमच्यात नाहीए.  

ती गेली त्यानंतर कार्यासाठी तिचा फोटो लागणार होता. तिचा एकटीचा असा एकही स्वतंत्र फोटो मिळेना. माझ्या आजोबांचे स्नेही चित्रकार होते आणि ही वहिनी लाडकी होती. त्यांनी तिचे तरुणपणीचे इतके सुंदर portrait रेखाटले की बघत बसावे. त्यांच्या त्या म्हातार्‍या बोटांतून देखील तिच्या खातर एक सुंदर कलाकृती कॅन्वासवर अवतरली. ते आजीचे पेंटिंग आजही माझ्या मामाकडे फ्रेम करुन लावले आहे.
 
आजूनही आमच्या घरात-नात्यात-ओळखीत तिचा विषय निघाला, तिची आठवण काढली की लहान-थोर सगळेच हळवे होतात. तिच्यात ती जादू होती…!

*************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

 

Page copy protected against web site content infringement by Copyscape

जावे कधीतरी आठवणींच्या गावा…

22 12 2010

Page copy protected against web site content infringement by Copyscape
%d bloggers like this: