गजरा

25 08 2016

पायऱ्यांपलिकडे जमिनीत लावलेला जाई-जुईचा वेल टेलिफोनच्या वायरचा आधार घेऊन वर गच्चीपर्यंत गेला आणि तिथे बहरू लागला. अंगणातून चार पायऱ्या चढून वर कुणी दाराशी आलं की, आतून कुणी, दार उघडेस्तोवर हा फुलांचा सुगंध येणाऱ्याचे स्वागत करायला आधीच सज्ज असायचा.

दर संध्याकाळी वर गच्चीत जाऊन जाई-जुईच्या कळ्या वेचून त्यांचा गजरा करणं हा आईचा नियमित कार्यक्रम! एकावेळी २-३ गजरे सहज होतील एवढ्या कळ्या… संध्याकाळ जशी कूस बदलून काळोखाकडे मुखडा फिरवी तशा या गजऱ्यातील टपोऱ्या कळ्या उमलून फुलांच्या चांदण्या होऊन जायच्या, सुगंधू लागायच्या.

एखादा गजरा स्वत:ला ठेऊन बाकीचे गजरे कुणाच्याही नशिबी यायचे. कधी कुणी शेजारीण तो आंबाड्यात रोवून मिरवायची, कधी घरी आलेली पाहुणी, तर कधी कामवाली बाई तो माळून टाकायची. हा परिपाठ अनेक वर्ष सुरू होता, अगदी तिचे गुढगे साथ देईपर्यंत… नंतर तिला जिने चढणे जमेना. म्हणून की काय कल्पना नाही पण जाई-जुईच्या वेलींनी आपला बहर कमी केला.

पुण्यात सिग्नलला कुणी ना कुणी वासाचे गजरे विकत असायचे. माझाही एक ठरलेला गजरेवाला होता. आधी गजऱ्यासाठीचा आग्रह, मग ओळखीचा सुप्त होकार. मी नेमाने गजरे घेऊ लागले. त्यालाही माहित होते, अचानक सिग्नल सुटलाच तर मी पुढे जाऊन गाडी बाजूला ओढणार आणि पैसे चुकते करणार. अर्थात तो घेतलेला गजरा मी केसात न माळता, गाडीच्या rearview mirror वर लावायचे. त्या सुवासात माझी आई जवळ असल्याचा भास होता!

आॅफिसात अशीच एक मुलगी गजरा माळून यायची. ती आली की त्याच ओळखीच्या वासाने मनं एकदम प्रफुल्लीत व्हायचे. तिच्याशी माझी घट्ट मैत्री झाली, गजऱ्यातल्या घट्ट विणेसारखी.

गजरा दिसला की आठवते ती माझी आई, तिचे फुलांसाठीचे वेड, माझं घर, तो वेल, तो गजरेवाला, आणि माझी मैत्रिण… सगळं खूप जिव्हाळ्याचं, खूप मना जवळचं, अगदी मनभावन!

आज अनेक वर्षांनी मनाच्या बंद कुपीतला तो गजऱ्याचा सुवास निसटून, मनात घमघमू लागला. मनाचं आणि आठवणींचं अजबच नातं आहे. मनात आठवणी ओत-प्रोत भरून वाहत असतात आणि मनं त्याच आठवणींत रमत असते…

************
Page copy protected against web site content infringement by Copyscape


अंमलबजावणी

Information

2 responses

30 09 2016
Mangal Rane

रूही किती छान लिहितेस गं. अगदी तुझ्यासारखंच.. नितळ आणि पारदर्शी😊
मला computer वर जास्त वेळ बसता येत नाही. त्यामुळे fb एक एक दोन दोन महिन्यांनी चाळते.
फोनवर fb नाही घेतलंय. त्यामुळे तुझं ‘ती’ miss करत होते. पण आता तू लिंक पाठवल्यामुळे मी फोनवर ‘ती’ ला भेटू शकते.
तुझं पुस्तक (पुस्तकं) लवकरात लवकर प्रकाशीत होवो हिच सदिच्छा..😄

26 08 2016
Meera Walavalkar

Kay mast topic ghetlas ga. Gazra. Maza khup khup fav aahe. Awadla mala. Tuza likhan mhanje treat asate. Mast topic ghetes tu. Roz chya life madhle, Nehmiche. Aathwanit kayam rahnare pan kinchit durlakshit. Go Ruhi go!

यावर आपले मत नोंदवा