गजरा

25 08 2016

पायऱ्यांपलिकडे जमिनीत लावलेला जाई-जुईचा वेल टेलिफोनच्या वायरचा आधार घेऊन वर गच्चीपर्यंत गेला आणि तिथे बहरू लागला. अंगणातून चार पायऱ्या चढून वर कुणी दाराशी आलं की, आतून कुणी, दार उघडेस्तोवर हा फुलांचा सुगंध येणाऱ्याचे स्वागत करायला आधीच सज्ज असायचा.

दर संध्याकाळी वर गच्चीत जाऊन जाई-जुईच्या कळ्या वेचून त्यांचा गजरा करणं हा आईचा नियमित कार्यक्रम! एकावेळी २-३ गजरे सहज होतील एवढ्या कळ्या… संध्याकाळ जशी कूस बदलून काळोखाकडे मुखडा फिरवी तशा या गजऱ्यातील टपोऱ्या कळ्या उमलून फुलांच्या चांदण्या होऊन जायच्या, सुगंधू लागायच्या.

एखादा गजरा स्वत:ला ठेऊन बाकीचे गजरे कुणाच्याही नशिबी यायचे. कधी कुणी शेजारीण तो आंबाड्यात रोवून मिरवायची, कधी घरी आलेली पाहुणी, तर कधी कामवाली बाई तो माळून टाकायची. हा परिपाठ अनेक वर्ष सुरू होता, अगदी तिचे गुढगे साथ देईपर्यंत… नंतर तिला जिने चढणे जमेना. म्हणून की काय कल्पना नाही पण जाई-जुईच्या वेलींनी आपला बहर कमी केला.

पुण्यात सिग्नलला कुणी ना कुणी वासाचे गजरे विकत असायचे. माझाही एक ठरलेला गजरेवाला होता. आधी गजऱ्यासाठीचा आग्रह, मग ओळखीचा सुप्त होकार. मी नेमाने गजरे घेऊ लागले. त्यालाही माहित होते, अचानक सिग्नल सुटलाच तर मी पुढे जाऊन गाडी बाजूला ओढणार आणि पैसे चुकते करणार. अर्थात तो घेतलेला गजरा मी केसात न माळता, गाडीच्या rearview mirror वर लावायचे. त्या सुवासात माझी आई जवळ असल्याचा भास होता!

आॅफिसात अशीच एक मुलगी गजरा माळून यायची. ती आली की त्याच ओळखीच्या वासाने मनं एकदम प्रफुल्लीत व्हायचे. तिच्याशी माझी घट्ट मैत्री झाली, गजऱ्यातल्या घट्ट विणेसारखी.

गजरा दिसला की आठवते ती माझी आई, तिचे फुलांसाठीचे वेड, माझं घर, तो वेल, तो गजरेवाला, आणि माझी मैत्रिण… सगळं खूप जिव्हाळ्याचं, खूप मना जवळचं, अगदी मनभावन!

आज अनेक वर्षांनी मनाच्या बंद कुपीतला तो गजऱ्याचा सुवास निसटून, मनात घमघमू लागला. मनाचं आणि आठवणींचं अजबच नातं आहे. मनात आठवणी ओत-प्रोत भरून वाहत असतात आणि मनं त्याच आठवणींत रमत असते…

************
Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – २४

17 11 2015

माझा मित्र ‘ती’च्या प्रेमात वगैरे होता. ती त्याच्याच कॉलेज मधली, त्याची ज्युनियर. माझेही स्टडी सेंटर तेच कॉलेज. त्याने कधीतरी ‘ती’ची तोंडदेखली ओळख करुन दिली. मला फक्त तिचं नावं लक्षात होतं.

एके दिवशी अचानक कोणीतरी मुलगी मला भेटायला माझ्या शक्रवारपेठेतल्या रुमवर आली. तिने नाव सांगितले तरीही मी तिला पाहून जरा गोंधळलेच. मग तिने माझ्या मित्राचे नाव घेतले. आणि लगेच लिंक लागली. ‘ती’ त्याची ती होती तर…

ती काही कामासाठी मी राहते तिथे आली होती व तिला काही पैशांची गरज होती. त्याने तिला सांगितले असावे की मी त्याच परिसरात राहते. ती माझा माग काढत माझ्याकडे आली. रक्कम अगदीच शुल्लक नव्हती. पंधरावर्षा पूर्वी तेवढ्या पैशात अर्ध्या महिन्याचे मेसचे जेवता येऊ शकत होते. ‘ती’ने हे पैसे त्याला लगेच द्यायला सांगते असे म्हणून गळ घातली. मीही तयार झाले. नशिबाने तेवढे होते माझ्यापाशी. तिचे धन्यवाद वगैरे स्विकारुन मी पैसे दिले व ते पैसे स्विकारुन ‘ती’ निघून गेली.

ती जाताच माझ्या मैत्रिणीने मला फटकारलेच की विसर आता हे पैसे. तिची बत्ताशी खरी निघेल हे वाटलेच नव्हते तेव्हा. ‘ती’ गेली ती गेलीच. नंतर ती काही मला भेटली नाही. तो भेटला काही वेळा पण कुठेकाही मागमूस नाही. मी सुद्धा स्वत:हून पैसे परत मागितले नाहीत. असतात आपले काही घेणेकरी असा विचार करुन मी त्यांवर पाणी सोडले. माणूस चुकून विसरतो कधीतरी.

मुद्दा तो नाहीच मुळी, ज्यावेळी मी तिला मदत केली त्यावेळी शिक्षण, पुस्तकं, पार्ट-टाईम नोकरी, रुमचे भाडे, मेसचा डब्बा या सगळ्यांत महिन्याचा हिशेब जुळवणे ही कसरतच होती. घरुन पैसे घेणं मी जवळ-जवळ बंद करुन टाकलं होतं. जे करायचं ते स्वत:च्या बळावर हा नारा. त्यात हा भुरदंड (तेव्हा) मोठा होता. ‘ती’ला ते विसरणे फारच सहज, सोईस्कर व सोप्पं होतं. आणि मला…?

पुढे तिचे त्याच्याशी लग्न झाले. दोघांनी भरपूर पगाराच्या नोकऱ्या पटकावल्या. परदेशात राहिले बरीच वर्ष. त्यात आनंदच आहे. मधली काही वर्ष संपर्क तुटला. जुना विषय तर मी केव्हाच विसरले होते पण एक माणूसकी म्हणून ‘ती’ने नुसती आभासी ओळख तरी ठेवावी ना? ते ही नाही… आज एवढा काळ लोटल्यावर मी थोडीच पैसे परत दे म्हणणार आहे?

काही माणसं त्यांच्या विशिष्ट वर्तवणूकीमुळे लक्षात राहतात. ‘ती’ त्यांतलीच एक!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २३
‘ती’ – २२
‘ती’ – २१
‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – १५

11 09 2015

मी एकोणीसाव्या वर्षी नोकरीला लागले. तेव्हा माझे सगळेच सहकारी माझ्याहून वयाने बरेच होते. मेहनतीचे फळ म्हणून असेल किंवा होतकरु, लहान म्हणून असेल पण सगळे प्रेमाने वागायचे, वागवायचे. ‘ती’ ही त्यांतलीच एक होती.

‘ती’ गोरी, नाकावर चष्मा, गोड हसू, खट्याळ बोलणं, सुबक ठेंगणी. ‘ती’ बंगाली. पण पुण्यात वाढल्यामुळे मराठी तर इतके अस्खलित बोलते की मातृभाषा असूनही, मराठी बोलायची लाज वाटते अशा अमराठी जीवांना थोतरीत बसेल. ‘थोडंसं खाल्लं की आणखी जास्त भूक लागते’ याला ‘ती’ (बंगाली असूनही) ‘भूक खवळली’ हा वाक्प्रचार वापरते. यातच सगळे आले. ‘ती’ चे इंग्रजीही अफलातून आहे, अगदी अग्रगणी व सुप्रसिद्ध वर्तमानपत्रात पत्रकारीता करण्या इतके. पण मला ‘ती’ची वेगळी ओळख करुन द्यायची आहे.

‘ती’ चे एका मुलावर प्रेम होते. तिच्या बोलण्यात त्याचा खूप वेळा उल्लेख असायचा. वयाच्या अदबीमुळे मी स्वत:हून त्याच्याबद्दल तिला कधीच काही विचारले नव्हते. तो मुंबईचा होता एवढेच ठाऊक. एकदा तो तिला भेटायला येणार होता. जेवणाच्या सुट्टी आधी थोडावेळ ती मला म्हणाली,”रुही बेबी, (हो. मला बेबी झाले तरी ती अजूनही मला याच नावाने हाक मारते) तो आलाय. चल तू पण. आपण एकत्र बाहेर जाऊ लंचला.” तेव्हा ‘कबाब में हड्डी’ वगैरे गावीही नव्हते. मी पण तिच्या खास मित्राला भेटूया या उत्साहात तिच्या बरोबर निघाले. आम्ही वेळेच्या आधीच रेस्टॉरंटला पोहचलो आणि टेबल रिझर्व केला. वाट पाहत असताना एक तरुण आत शिरला. तिच्याकडे बघून हसत आमच्या दिशेने आला. लागलीच आणखी एक तरुण आत येताना दिसला. त्याचा काखेत कुबड्या होत्या. तो आमच्या टेबलवर येताच ‘ती’ ने माझी ओळख करुन दिली. मला एका क्षणासाठी काहीच कळेनासे झाले. हे अनपेक्षित होते. भानावर येत मी हस्तांदोलन केले. आधी आलेला तरुण त्याचा मित्र होता. गप्पा करत करत जेवण झाले. पुढे त्याच्याशी छान ओळख झाली.

धडधाकट असलेल्या ‘ती’ चा ‘तो’ दोन्ही पायांनी पांगळा आहे. हे पचविणे मला जड गेले. तिचे घरचे लग्नाला तयार नव्हते. तब्बल आठ एक वर्षांनी त्या दोघांनी लग्न केले. तो कामानिमित्त परदेशात आला. दोघांनी तिथेच संसार थाटला. तो हुशार आहे. त्याच्या बुद्धीने त्याने कमतरतेवर मात केली. त्याने उत्तम करियर घडविले.

कालांतराने मी ही परदेशी आले. आम्ही फोनवर बोलत होतो. ‘ती’ सांगत होती,”अॉफिस जवळच घर बघतो आम्ही. बरं पडते. मी इकडे गाडी चालवायला लागले. त्याला ऑफिसला सोडावे-आणावे लागते. तो गाडी चालवतो पण मलाही गाडी लागते बाहेरची कामे करायला.” तिचे सगळेच आयुष्य त्याच्या भोवती फिरत होते. तिच्या बोलण्यात त्याच्यासाठी कुठे आईची माया होती, कुठे बायको या नात्याने त्याच्या हुशारीचे कौतुक होते, कुठे प्रेयसीची काळजी होती, कधी त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान डोकावत होता. दाखवायला ही राग, तक्रार, त्रागा, कंटाळा नव्हता. आणि वेळप्रसंगी यातील एक किंवा सगळ्या गोष्टी तिने दर्शविल्या असत्यातरी ते वागणे मनुष्यसुलभ वृत्तीला धरुनच आहे. तेवढी मुभा तिला नक्कीच आहे. संयम नेहमीच बाळगता यावा अशी सक्ती कुठं आहे?. तो कधी ढळला ही असेल. बोलणे आणि करणे यात जमिन-अस्मानाची तफावत असते. आणि ‘ती’ सगळं आनंदाने करतेय.

तिची परदेशात स्थिरावण्याची मुख्य कारणं होती, अपंगांसाठी इथे असलेल्या सोई, दिली जाणारी समानतेची वागणूक. अगदी खरं होते ते. परदेशात अपंगांना दयेचा नजरेने कोणी बघत नाही. त्यांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी योग्य त्या सोई करण्यात मात्र देश कार्यशील असतो. अशांसाठी खास प्रकारच्या कार, आरक्षित पार्कींग, दुकानांमधे बसून खरेदी करता येईल अशा बैठ्या गाड्या, व्हीलचेरसकट आत जाता येईल अशा बस, तशी प्रसाधनगृह आणि पुष्कळ काही.

प्रेम आंधळं असतं म्हणतात पण ‘ती’ ने असे काही प्रेम केले की प्रेमाला एका नविन अर्थ, एक नविन परिभाषा दिली! ‘ती’ने त्याचे आयुष्य नुसते सुखकरच नाही तर सुकर ही केलं.

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – ११

2 09 2015

अकाळी वडिल गेले. त्यांचे कार्य उरकून मी परत नोकरीवर रूजू झाले. मन हळवे झाले होते. आठवणींनी टचकण डोळ्यांत पाणी येई. मी परत आले कळल्यावर माझी मॅनेजर माझ्या डेस्कपाशी थांबली. मला गहिवरून आले. ती सांतवन करत म्हणाली,”वाईट झालं. पण तुला तुझे वडिल इतकी वर्ष लाभले तरी, मी अगदी लहान असताना माझे वडिल गेले. त्यांचा चेहराही मला आठवत नाही!”

एवढेच बोलून ती निघून गेली. माझं दु:ख उगाच हलकं झाल्यासारखं वाटायला लागलं आणि तिचंच सांतवन करावंसं वाटायला लागलं.

‘ती’ चायनीज होती. शिकायला पुण्यात आली व तिथेच नोकरीला लागली. तिच्याशी फक्त कामापुरतेच बोलणं होत असे. बरेच वर्ष पुण्यात काढल्यामुळे बोलता येत नसलेतरी तिला मराठी कळते असे काहीजण म्हणायचे.

त्या कठिण समयी तिने माझ्या दु:खावर जी फुंकर व मनावर जो चटका दिला, त्यामुळे आपल्याहूनही कमनशिबी लोकं आहेत याची जाणीव झाली. त्यासाठी ‘ती’ चे आभार मानायचे मात्र राहूनच गेले.

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – ३

29 11 2011

‘ती’ कोणाच्यातरी ओळखीने आली होती. तिला थोड्या दिवसांसाठी पुण्यात रहायची सोय हवी होती. आमच्या शेजारच्या खोलीत काही दिवस रहायची आजींनी परवांगी दिली आणि ती आमच्या शेजारी रहायला आली. ती B.A.M.S. डॉक्टर होती, निदान तसे तिने सांगितले तरी होते आम्हा सगळ्यांना…

माझी तिच्याशी हळूहळू मैत्री झाली. बोलायला ठीक होती ती. आमच्याच मेसमधे तिने डब्बा सुरु केला. रात्री एकत्र जेवण करुन गप्पा-टप्पा होत असत. ती सातार्‍याची होती. कोणतातरी छोटा कोर्स (बहुदा आयुर्वेदचा असावा) करण्यासाठी ती पुण्यात होती. तिचा एक प्रियकर असल्याचे कळले. तो सुद्धा डॉक्टर होता. त्याच्याबद्दल बोलताना ती वेगळ्याच विश्वात रमत असे. तो पुढच्या महिन्यात मेडिकल कॉन्फरंस् करिता पुण्यात येणार होता. आपटे रोडवरील एका हॉटेलमधे तो नेहमी उतरतो असे ती म्हणली.

कधी कधी तिचे वागणे विचित्र वाटायचे. हिला काहीतरी प्रोब्लेम आहे का अशी शंका यायची. अचानकपणे तिने एक दिवस जागा सोडली. आमच्या घरमालक आजींना कुठूनतरी बातमी कळली कि ‘ती’ घटस्फोटीत होती. माहेरच्यांनी हिच्याकडे पाठ फिरवली होती. मला तिची एकीकडे दया आली, दुसरिकडे विचार आला की ती आम्हला खरं सांगू शकली असती…की काही सांगण्या पलिकडचे होते? न जाणो काय त्रास होता तिला.

तिने तिचा सातार्‍याचा फोन दिल होता तिकडे मी कॉल केला तर तो फोन भलत्याचाच निघाला. तो तिच्या घरचा नंबर नव्हताच. दुसर्‍या महिन्याच्या तिने सांगितलेल्या तारखेला मी त्या आपटे रोदवरील हॉटेल मधे गेले आणि तिच्या प्रियकराच्या नावने रुम बूकिंग आहे का याची चौकशी केली. त्या नावाने कोणतेच बूकिंग नव्हते. म्हणजे ती जे काही बोलली, वागली ते सगळे खोटं होते? की तसे वागण्यात तिचा काही नाईलाज होता? तिची दया आली आणि थोडा रागही…कदाचित ती वाईत प्रसंगातून जात होती, तिचा कोणी आधारही नसेल, किंवा ती जीवनाकडून तेच deserve करत असेल. काही कळायला मार्ग नव्हता.

मला तिला जाणून घायचे होते, समजून घायचे होते.. कदचित तिला आधार द्यायचा होता. तिच्या आयुष्यात जे काही झाले ते सगळे विसरुन नविन सुरुवात कर असे सांगायचे होते. आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे – कोणी विश्वास ठेवला तर त्याला पात्र ठर हे सांगायचे होते.

आणखी ३-४ वेळा तिचा फोन लावला पण तिच्याशी काहीच संपर्क झाला नाही. आणि या पुढे कधी होणार नाही. ‘ती’ एक गूढच होती.

*************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape





एका स्वप्नाची पूर्ती!

9 08 2011

कालचा दिवस भाग्याचा!
नविन घराचा ताबा मिळाला. पुण्यात घर व्हावे ही एका तपापासूनची इच्छा…ते स्वप्न आज सत्यात उतरले.

भाऊ, बहिण, आई यांनी घराचा ताबा घेतला. गुरुजींना बोलावून गणेशपुजन केले. संध्याकाळी माझ्या जवळच्या मैत्रिणी आल्या होत्या. मी विडियो-चॅटवर घर पाहिले, सगळे बघत होते, सर्वांशी बोलले. खूप आनंद झाला. माझ्या आईने व बहिणीने घरीच पाव-भाजी केली.

माझ्या आईच्या चेहर्‍यावरचा आनंद बघून मला समाधान वाटले. राहून-राहून माझ्या पपांची उणीव जाणवत होती. त्यांच्या चिऊचे घरटे बघायला ते आज हवे होते.

मी तिकडे नसतानाही माझ्या जिवाभावाच्या मैत्रिणी आपल्या घरच्यांसहित आवर्जून आल्या. मनं भरुन आले होते.

देवाचे शतश: आभार- हा दिवस दाखविल्याबद्दल, घर झाल्याबद्दल आणि माझ्यावर इतके प्रेम करणारी माणसे मला दिल्याबद्दल!

Miss u all…
Love u more!