गजरा

25 08 2016

पायऱ्यांपलिकडे जमिनीत लावलेला जाई-जुईचा वेल टेलिफोनच्या वायरचा आधार घेऊन वर गच्चीपर्यंत गेला आणि तिथे बहरू लागला. अंगणातून चार पायऱ्या चढून वर कुणी दाराशी आलं की, आतून कुणी, दार उघडेस्तोवर हा फुलांचा सुगंध येणाऱ्याचे स्वागत करायला आधीच सज्ज असायचा.

दर संध्याकाळी वर गच्चीत जाऊन जाई-जुईच्या कळ्या वेचून त्यांचा गजरा करणं हा आईचा नियमित कार्यक्रम! एकावेळी २-३ गजरे सहज होतील एवढ्या कळ्या… संध्याकाळ जशी कूस बदलून काळोखाकडे मुखडा फिरवी तशा या गजऱ्यातील टपोऱ्या कळ्या उमलून फुलांच्या चांदण्या होऊन जायच्या, सुगंधू लागायच्या.

एखादा गजरा स्वत:ला ठेऊन बाकीचे गजरे कुणाच्याही नशिबी यायचे. कधी कुणी शेजारीण तो आंबाड्यात रोवून मिरवायची, कधी घरी आलेली पाहुणी, तर कधी कामवाली बाई तो माळून टाकायची. हा परिपाठ अनेक वर्ष सुरू होता, अगदी तिचे गुढगे साथ देईपर्यंत… नंतर तिला जिने चढणे जमेना. म्हणून की काय कल्पना नाही पण जाई-जुईच्या वेलींनी आपला बहर कमी केला.

पुण्यात सिग्नलला कुणी ना कुणी वासाचे गजरे विकत असायचे. माझाही एक ठरलेला गजरेवाला होता. आधी गजऱ्यासाठीचा आग्रह, मग ओळखीचा सुप्त होकार. मी नेमाने गजरे घेऊ लागले. त्यालाही माहित होते, अचानक सिग्नल सुटलाच तर मी पुढे जाऊन गाडी बाजूला ओढणार आणि पैसे चुकते करणार. अर्थात तो घेतलेला गजरा मी केसात न माळता, गाडीच्या rearview mirror वर लावायचे. त्या सुवासात माझी आई जवळ असल्याचा भास होता!

आॅफिसात अशीच एक मुलगी गजरा माळून यायची. ती आली की त्याच ओळखीच्या वासाने मनं एकदम प्रफुल्लीत व्हायचे. तिच्याशी माझी घट्ट मैत्री झाली, गजऱ्यातल्या घट्ट विणेसारखी.

गजरा दिसला की आठवते ती माझी आई, तिचे फुलांसाठीचे वेड, माझं घर, तो वेल, तो गजरेवाला, आणि माझी मैत्रिण… सगळं खूप जिव्हाळ्याचं, खूप मना जवळचं, अगदी मनभावन!

आज अनेक वर्षांनी मनाच्या बंद कुपीतला तो गजऱ्याचा सुवास निसटून, मनात घमघमू लागला. मनाचं आणि आठवणींचं अजबच नातं आहे. मनात आठवणी ओत-प्रोत भरून वाहत असतात आणि मनं त्याच आठवणींत रमत असते…

************
Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – ८

13 09 2014

दर वर्षी वटपोर्णिमेला मला या ‘ती’ ची आठवण येते. अगदी न चुकता! लग्ना आधीची सुद्धा कित्तेक वर्ष ‘वट पोर्णिमा’ म्हटले की याच डोळ्यांसमोर येत. आत्ता ही याच येतात.

त्यांचे नाव ‘शुभांगी घाणेकर’. पण सहसा उल्लेख ‘घाणेकर बाई’ असा. आमच्या घरी त्या घरकामाला होत्या. बारीकशा, सावळ्या, बेताची उंची, एक वेणी, तोंडावर वांगाचे डाग, गरिबीला साजेसे बसलेले गाल, पण वावर चुणचुणीत, कष्टाळू, कामाचा उरक भयंकर! माझी आई त्यांना “कामाला वाघ आहेत” असे कौतुकाने म्हणायची. त्यांचे घर बरेच लांब होते. साधारण अर्धातास चालून मग होडीने तरं आेलांडून त्यांचे गाव होते. त्यांची ३-४ घरकामं होती आणि त्या कामांसाठी त्यांना येणे भाग होते.

दोन लहान मुलगे, नवरा आणि या. त्यांचा नवरा अगदीच ऐतखाऊ नव्हता. कुठेकुठे हंगामी गवंडी कामाला होता खरा पण त्याची कमाई दारुत घालवायचा. मग मारहाण, शिवीगाळ हे ओघाने आलेच. तो दिसायला बराच बरा, बाईंहून तरुण व लहान वाटायचा. कष्टांनी बाई खंगल्यासारख्या दिसायच्या. त्यांच्याच कमाईवर घर चालायचे. शिवाय नवर्याला काम नसेल तेव्हा त्याच्या दारुला पण या पैसे पुरवायच्या. मोठा मुलगा असेल ५-६ वर्षांचा, तो बोला-चालायला चुणचुणीत होता. छोट्या २.५ – ३ वर्षांचा, रडका, मुडदुस झाल्यासारखे हात-पाय होते. या मुलांसाठी त्या जगत होत्या. माझी आई त्यांना लागेल ते पुरवायची. कुठे सणावाराला कपडे, कुठे खाऊ, साबण, कुठे छत्री, कुठे पुस्तकं-दप्तर. बाईंचे जेवण आमच्याकडेच होते. त्या छोट्याला दर दिवशी बटाट्याची भाजी लागायची. माझी आई न चुकता एका बटाट्याला फोडणी देत असे, मग घरी कुठलीही भाजी असो. आम्ही तिला बोलायचो की फार लाडावून ठेवतेस बाईंच्या मुलाला पण आमच्याकडे लक्ष न देता आई त्यांना प्रेमाने जेवू घालायची.

एकदा बाईंचे काहीतरी बिनसले होते. चेहरा, अंग काळे-निळे पडलेले. त्याचच त्या कामात असताना त्यांचा नवरा आमच्या दाराशी येऊन त्यांना दारुच्या नशेत िशव्या देऊ लागला. माझ्या वडिलांनी पोलिसांची भीती घालून त्याला पळवून लावले. त्यांच्या गावाकर्््यांना पण हे यांचे प्रकरण ठाऊक होते. थोडे दिवस गेले की बाईंच्या नवर्याला कोण जाणे पण ही अवकळा लागत असे. पुन्हा एके दिवशी असेच झाले आणि तो ढोरासारखे बाईंना मारताना त्यांचे शेजारी मध्ये पडले आणि याला पोलिसांच्या हवाली केले.

बाई उशीरा घरी आल्या. आणि आल्या त्या रडतच. झाला प्रकार कळल्यावर खरंतर आम्ही आनंदलोच. “बरं झालं गजा आड केला, पोलिसी खाक्या मिळेल तेव्हाच डोळे उघडतील या राक्षसाचे” असा विचार मनात आला. पण बाईंचे काहीतरी वेगळेच. त्या पोलिसांशी मध्यस्ती करुन नवर्याला सोडविण्यात मदत करा अशी याचना माझ्या वडिलांना करत होत्या. आम्हा भावंडांचे डोकंच सटकले. ‘अरे काय बाई आहे??? जीवावर बेतेल असा मार खाते दारुड्या नवर्याचा तरी त्याचाच पुळका???’ रागच आला होता बाईंचा. अजाणच वय ते आमचे. सुदैवाने माझ्या वडिलांनी तिला मदत केली. आणि शेवटी एकदाचा त्यांचा नवरा सुटला कोठडीतून.

दुसर्या दिवशी बाई कामावर आल्या. आईचा उपास होता. चहा घेत त्या आईला म्हणाल्या “माझाही उपास आहे. आज वट पोर्णिमा ना!”. आम्हाला हसावे की रडावे कळेना!!! एवढे रामायण झाले तरी…एक जन्म काढताना जड आणि हा नवरा हवा त्यांना ७ जन्म!

मी स्त्रीमुक्ती, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीसमानता वगैरेची पुरस्करती! एकीकडे असा विचार आला की ही बाई का एवढे सहन करते? सोडून का नाही देत अशा व्यसनी माणसाला? तसंही हीच रेटतेय संसारा(?) चा गाडा…मग का अजूनही स्वतःला अबला समजते? केवळ अशिक्षित आहे म्हणून? की माहेरचा पाठींबा नाही म्हणून? की लोकलज्जेस्तव? पण जगाला माहीत आहेच नवरा कसा आहे ते. दुसरीकडे वाटले किती सहनशील असावे कोणी? की जीव गुंतलाय? की ‘आपले’ माणूस कसेही वागले तरी ‘आपले’च हे संस्कार उराशी बाळगून जगणार अशा बायका मरेपर्यंत आणि आयुष्यभर असेच संसाररुपी आगीत सरपणासारख्या जळत राहणार? अशीच व्यथा अनेक कष्टकरी स्त्रियांची आहे. आपण मदतीचा हात जरी पुढे केला तरी त्या तो घेतीलच असं नाही. मग होईल ती (आणि त्यांना मानवेल ती) मदत करण्या पलीकडे आपल्या हातात काहीच उरत नाही!

आई बाईंच्या त्या छोट्या मुलाला दररोज का बटाट्याची भाजी बनवून द्यायची, का त्यांना हवे-नको ते बघायची, व माझे वडिल का त्या दिवशी बाईंच्या नवर्याला सोडवून आणायला त्यांच्या सोबत पोलिस स्टेशनला गेले या आणि अशा अनेक प्रश्नांची कोडी आपोआप उलगडत गेली…

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape





‘ती’ – ६

11 09 2014

‘ती’ माझ्या लांबच्या नात्यातली. ‘ती’ च्या बहिणीला मी ओळखते. ‘ती’ ला मी कधीच पाहिले नाही, मग बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण हल्ली खूप मनातून आतून तिच्याबद्दल वाटायला लागलंय. परिस्थितीच तशी आहे.

‘ती’ अवघी २२ वर्षांची. हुषार. फस्ट क्लासने कंप्युटर ईंजिनीयरींग करुन नोकरीच्या शोधात होती. काही वर्षांपासून छाती, पोट व पोठदुखीचा त्रास होता. दुखीने डोकं वर काढलं की (तेवढ्यापुरते) औषधोपचार करत होती.

मागच्या महिन्यात Liver Cancer with metastasis चे निदान झाले. रोगाने पूर्ण शरिराचा ताबा घेतला. उपचाराला वावच नाही. मुंबईतल्या प्रख्यात हाॅस्पिटलने देखील घरी न्या सांगितले. Chemo, liver transplant काहीकाही शक्य नाहीए. ‘आभाळ कोसळणे’ वगैरे वाक्प्रचार थीटे पडावेत अशी वेळ आली घरच्यांवर. जो जे आयुर्वेदाचे, गावठी उपचार सांगेल तिथे तिथे घेऊन जातात तिला. काही खायची ईच्छा होत नाही तिला. या ‘काही’ मधे फक्त पेय – तांदळाच्या पेजेचे पाणी, वगैरे.

आपल्या मुलीची ही अशी स्थिती बघताना काय यातना होत असतील आई वडिलांना? का नाही या रोगाचे फार आधीच निदान झाले?

आणि तिला स्वतःला काय वाटतं असेल? काहीच पाहिलं-उपभोगलं नाही तिने आयुष्यात. दर क्षणाकडे काय मागणं असेल तिचे? की आता काहीच ईच्छा उरली नसेल? दूरवर येऊन ठेपलेला शाश्वत अंत, तसूंतसूंभर जवळ येतोय ही भावना कित्ती भयावह आहे?

आधी कुणी फोन केला तर “मी बरीए” असे कोणालातरी परस्पर उत्तर द्यायला सांगायची. आत्ता फक्त रडते. तशीही स्वभावाने आधी पासूनच ‘ती’ अबोल!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape





सांगा कसं जगायचं?

29 07 2010

महिन्याच्या सुरुवतीला ‘सोमरविल’ ला जाऊन काही फर्निचरची ऑर्डर देऊन आलो. डिलीवरीला २ आठवडे लागतील असे दुकानदार म्हणाला. म्हणजे अंदाजे १८-१९ तारीख उजाडेल असा आम्ही अंदाज केला. हा-हा म्हणता २३ तारीख उलटून गेली आणि आम्ही वैतागलो. साधा एक फोन नाही त्या दुकानातून. शेवटी ‘अडला हरी….’ स्मरुन आम्हीच फोन करुन त्याला खडसावले की आम्ही ऑर्डर कॅन्सल करतोय. दुकानातला मेन माणूस जाग्यावर नव्हता, दुसरा एक जण होता तो म्हणाला “तुम्ही दुकानात येऊन काय ते बोला”. शनिवारी आम्ही सोमरविल ला निघालो. काहीशा रागानेच, त्या दुकान वाल्याला चांगलेच सूनवायचे हे ठरवून टाकले पण त्या बरोबरच आम्हाला तो सोफा  कॅन्सल ही करायचा नव्हता. म्हणून जरा ‘टॅक्टफूली’ हॅन्डल करावे लागणार होते. काही इलाजही नव्हता. फिर-फिर करुन, हवी तशी वस्तू शोधायची, पैसे द्यायचे आणि अडकून बसायचे. असे झाले होते. 

सोमरविल जसे जवळ आले तशी बरीच गर्दी दिसू लागली. रोड-साईड पार्किंग मिळेना. रस्त्या लगत वेगवेगळ्या Vintage Cars आणि Bikes दिसू लागल्या आणि लक्षात आले की इथे ‘Classic cars show’ सुरु आहे. इकडे असा शो असतो याची माझ्या नवर्‍याला कल्पना होती पण तो कधी असतो ते माहित नव्हते. तो नेमका त्याच दिवशी होता. लांब गाडी लावून आम्ही त्या गाड्या बघत-बघत दुकानात शिरलो. दुकानवाल्याला “ऑर्डर कॅन्सल कर” अशीच सुरुवात केली मग त्याने सॉरी म्हणून अनेक कारणे दिली. मंगळवारी नक्की डिलीवरी देतो याची हमी दिली. आमचा पण राग निवळला होता. आम्हाला पण ऑर्डर कॅन्सल करायची नव्हतीच 😉

बाहेर आलो तर मस्त जुन्या गाड्याच-गाड्या लागल्या होत्या. लोक उत्साहाने त्यांची दखल घेत होते. तरुण मुलं त्यांच्या आजोबांच्या वेळाच्या गाड्यांवर बसून, त्या सुरु करुन बघत होते. कोणी त्यांचे बॉनेट उघडून गाडीचे इंजिन न्याहळत होते, तर कोणी जुन्या एखाद्या बाइक चे firing टेस्ट करत होते. प्रत्येक गाडीचा मालक आपली गाडी कशी चका-चक दिसतेय याची काळजी घेत होता. गर्वाने माहिती देत गाडी शेजारी उभा होता. असंख्य प्रकारच्या आणि असंख्य रंगांच्या गाड्यांचे जणू दालनच भरले होते. ‘जुनं ते सोनं’ म्हणतात ते उगीच नव्हे. असे सोने जपायची  आज गरज आहे. 🙂
 
नेमका माझ्याकडे कॅमेरा नव्हता कारण असे काही बघायला मिळेल हे ध्यानी-मनी नव्हतेच ना! मोबाईलच्या कॅमेरामध्ये एक फोटो काढला. 😦
 
सोफ्याच्या निमित्ताने का होईना काहीतरी नविन बघितल्याचे समाधान पदरी पडले. मनात विचार आला आम्ही दुकानवाल्याशी हुज्जत घालायला येतो काय आणि त्याचे रुपांतर या सुखद आश्चर्यात होते काय? मनोमनं मी त्या दुकानदाराचे आभार मानले. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा जो द्रुष्टिकोन असतो त्यावर सगळे मनाचे खेळ अवलंबून असतात. कशात सुख मनायचे आणि कशात दु:ख हे बर्‍याच वेळा समोरची परिस्थिती लक्षात घेऊन, आपणचं ठरवायचे असते. यावर मंगेश पाडगावकरांच्या ओळी आठवल्या –
 
पेला अर्धा सरला आहे
असंसुद्धा म्हणता येतं;
पेला अर्धा भरला आहे
असंसुद्धा म्हणता येतं!
 
सरला आहे म्हणायचं
की भरला आहे म्हणायचं?
तुम्हीच ठरवा!
 
सांगा कसं जगायचं?
कण्हत कण्हत की गाणी म्हणत?
तुम्हीच ठरवा!

 

Note: अधिक माहितीसाठी “classic car show somerville NJ” म्हणून Google करा.

Page copy protected against web site content infringement by Copyscape





वटपौर्णिमा आणि मॅक-डी!

29 06 2010

हा माझा पहिलाच वटपौर्णिमेचा उपवास. उपवास केला आणि वाटले आपण फारच ‘मोडर्न’ झालो आहोत. आता उपवास करण्यात (तो ही वटपौर्णिमेचा) कसला आलाय ‘मोडर्न’ पणा???… प्लिज पुढे वाचा म्हणजे उलगडा होईल.

माझ्या अहो-आईंनी निघताना (न्यू जर्सीला) ‘२५ ला वटपौर्णिमा आहे’ याची आठवण करुन दिली. “निदान दुपारी १२ (US time) पर्यंत तरी उपास कर.” इति अहो-आई (छोटासा fyi – माझ्या आईला मी ‘मम्मी’ म्हणते) 🙂

आदल्या दिवशी बहिणीने पण reminder टाकला. तसा मी उपवास करणारच होते. ७ जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून का ते माहित नाही पण मनापासून वाटले करावा म्हणून. सकाळी फक्त चहा घेतला, मग एक सफरचंद आणि १ कप दूध. दुपार नंतर आम्ही आमची कामं उरकायला बाहेर पडलो आणि कामांच्या नादात खायचे विसरुन गेलो… नंतर सणकून भूक लागली. बाहेर काय खावे (ते ही उपवासाचे) हेच कळेना. समोर McDonald’s दिसले आणि French fries खाता येतील असे डोक्यात click झाले. Drive-thru ला कार आत घातली आणि Medium French Fries घेतले. सगळ्यात आधी ‘बटाटा’ निर्माण केल्याबद्दल विधात्याचे आणि त्या नंतर त्या बटाट्यांचे रुचकर Fries च्या receipe चा शोध लावणार्‍याचे (लावणारीचे) आणि last but not the least, हे Fries जगभर पोहचविणार्‍या McDonald’s चे मनोमन आभार मानले.

ह्या ‘फ्राइज’ वरुन आठवले – बर्‍याच लोकांना कदाचित अतिशयोक्ति वाटेल पण माझी या फ्राइज शी ओळख लहानपणी घरच्या-घरीच झाली. अगदी McDonald’s चे ‘French fries’ खायच्या खूप-खूप आधी. माझी मॉम उत्कृष्ट बिर्याणी बनवते आणि त्यावर garnishing साठी ती तळलेले बटाट्याचे फ्राइज, तळलेले काजू आणि खर्पूस तळलेले कांदे घालायची. ती पहिली-वहिली ओळख या फ्राइजशी. नंतर मग संध्याकाळी स्नॅक्स म्हणून किंवा कधीतरी उपवासाला हे फ्राइज केले जायचे. आणि त्यावर ताव मरला जायचा. जोडीला मॉम ने घरीच केलेला आणि म्हणून मुबलक असलेला टॉमेटो केचप असायचा. हुह! घरच्या आठवानींने एकदम मनं भरुन आले. आईच्या हातचे अन्नं म्हणजे ‘Heaven!!!’. दुसरा कुठला शब्दंच नाही.

ओह! माझ्या गाडीने जरा रुळ सोडला- ‘फ्रेन्च फ्राइज’ खाऊन पोटाला थोडा आधार दिला. पुन्हा मग शोपींग करत इकडून तिकडे हिंडत बसलो. हा-हा म्हणता संध्याकाळचे ८:३० वाजले आम्ही ‘वॉल-मार्ट’ मधे खरेदी करत होतो. पुन्हा एकदा पोटात कावळे ओरडायला लागले आणि बिलिंग काऊंटरपाशी पुन्हा McDonald’s दिसले. “चल, तू एक स्मॉल फ्रेन्च फ्राइज घे, मी चिकन नगेट्स घेतो” इति नवरा. खरं तर परत तेच खायला कंटाळा आला होता पण घरी जाऊन काही करायला उशीर झाला असता. दुसरा पर्याय नव्हता. ‘फ्रेन्च फ्राइज’ घेतले आणि खाल्ले. थोडे खाल्यावर खरंच बरं वाटले.

अशा प्रकारे माझा उपवास McD च्या कृपेने सुरळीत पार पडला… आणि रात्री झोपताना वाटले आपण हा असा उपवास करून खरंच ‘मोडर्न’ झालो. 😀

Page copy protected against web site content infringement by Copyscape