‘ती’ – २

23 11 2011

तिच्या विषयी लिहायला घेतलं खरं पण नक्की कुठून सुरुवात करु आणि काय काय लिहू असे झाले क्षणार्धात…’ती’ माझ्या आयुष्यातले सगळ्यात प्रभावी व्यक्तिमत्व!
 
तिचे माहेर सिंधुदुर्गातले छोटेसे खेडे ‘पोईप’ आणि तिला दिले देवगडच्या ‘हिंदळे’ गावात. लग्नानंतर ती मुंबईत आली असावी. मुंबईच्या चाळींमधे जसे अनेकांनी संसार केले तसा हिने सुद्धा. ती तिथेच थांबली नाही. चेंबुरच्या हाऊसिंग बोर्डच्या बिल्डींग मधे स्वत:ची हक्काची जागा घेण्यापर्यंत तिने मजल मारली. ‘ती’च्या घराची दारं सगळ्यांच्या स्वागतासाठी नेहमी उघडी होती.

ती अतिशय जिद्धी, खंबीर, मनाने हळवी, हौशी, प्रेमळ, सुधारीत विचारसरणीची, विशाल ह्रुदयी आणि त्या सगळ्या गुणांना पूर्णत्व देणारा एक असामान्य गुण, तो म्हणजे – दानशूरपणा.

नवर्‍याची जेमतेम पगाराची मिलमधली नोकरी. त्यात त्यांची नोकरीची धरसोड सुरु असायची. मग हिने देखील काही ना काही करुन संसाराला हात भार लावला. दूधाचे सेंटर अनेक वर्ष चालविले. पहाटे लवकर उठून दूधाच्य गाड्या आल्या की दूध उतरवून घेणे, दूध पोचविणार्‍या मुलांकडे त्यांच्या लाईनच्या पिशव्या तयार करुन देणे. सगळा हिशोब बघणे. जातीने लक्ष घालून ती काम करत असे. कायम कष्ट करण्यात आयुष्य गेलं तिचे.

स्वत:च्या मुला-बाळांबरोबर तिने अनेकांना आपलेसे केले, अनेक होतकरु नातेवाईकांना आधर दिला. ते दिवस माणुसकीला महत्व देणारे. हिच्या अनेक ओलखी-पाळखी. कित्येक जणांना हिच्या शब्दाखातर नोकरी मिळाली असेल. परत याबद्दल कोणाकडेही वाच्यताही नाही. कोणालाही कसलीही मदत करायला ही सगळ्यांच्या पुढे. ज्याला जे हवे ते देणे, आपल्याला जमेल ती मदत करणे हा नियम होता. तिचा धडपडा स्वभाव ती जाईपर्यंत तिच्यात होता. कधी लोक गैरफायदाही घेत, पैशाला फसवत. पण हिने त्यांना माफ केले आणि आपले चांगले वागणे सोडले नाही. सगळ्यांच्या सुख-दु:खात ती धावून गेली.  मुलंही तशीच हिच्या वळणावर गेली.
 
दिसायला गोरीपान, अतिशय देखणी, उंच, मध्यम बांधा, पाचवरी साडी, केसांचा छानसा आंबाडा, मोठे कुंकु, वयोमननुसार लागलेला भिंगचा चष्मा. शंकर हे तिचे आराध्य दैवत. त्याच्यावर तिची निस्सीम श्रद्धा. पण त्याच्या कुठेही बाऊ नाही की उगाच थोटांड नाही. खोटेपणा, दिखाऊपणा तिच्या रक्तातच नव्हता. तिच्या वागण्यात एक भावणारा मनस्वीपणा होता. फिरायची भयंकर आवड. १२ ज्योतिर्लिंग आणि बराच भारत फिरुन झाला होता. हाताला चव अशी की नुसती आमटी केली तरी खाणारा बोटं चोखत बसेल. तांदळ्याच्या शेवया-नारळाचा रस, सातकाप्याचे घावनं, इत्यादी पदार्थांमधे तिचा हातखंड होता. कालागणिक हे पदार्थसुद्धा नामशेष झाले.

प्रेमळ स्वभावाला सीमा नाही – इतका की जावयाला मुलगा करुन घेतले आणि सुनांवर मुली सारखीच माया. सगळ्यांचे खूप लाड होत. मुलगी-जावई-नात चिंचवडला होते. त्यांची आठवण आली की त्यांच्यासाठी खाऊ, मासे (मुंबईत ताजे मिळतात ना…) घेऊन ही पहाटेच मुंबईहून पुण्याला निघायची. बस नाही मिळाली तर मिळेल त्या वहानाने ही चिंचवड गाठायची. अतिश्योक्ती वाटेल पण हे खरं आहे – अनेक वेळा तिने ट्रक-टेंपो मधून देखील लिफ्ट घेतली आहे. एकदम निडर आणि तितकीच घरंदाज. तिच्या बद्दल त्या ट्रक-टेंपोवाल्यांनाही आदर वाटला असणार यात काही शंका नाही.

माझ्यावर तिचा अतिशय जीव. माझ्या प्रत्येक वाढदिवसाला ती मुंबईहून न चुकता रत्नागिरीला यायची. सोबत रात्रभर जागून, एस.टीच्या गराड्यातून मांडीवर सांभाळत आणलेला Monginis चा केक असायचा. आजही ते आठवले की तिच्या आठवणींनी गहिवरुन येते.

मे महिन्याच्या सुट्टीत तिच्याकडे चेंबुरला जाऊन राहाणे म्हणजे एक परवणीच! मी, माझी मोठी बहिण आणि माझा मामे भाऊ… आमच्या तिघांचे अतिशय लाड केले तिने. खेळ, पुस्तके, कपडे, खाऊ, त्यावेळी भाड्याने (तासावर) सायकल, रेखाच्या दुकानातला दूधाचा पेप्सीकोल व क्रीम वेफर्स (पिकविक), चेंबुर स्टेशन जवळची भेलपुरी, सरोजची स्वीट कचोरी, ‘यांकी डूडल’चे आईस्क्रीम, मोंजिनिजचा केक, घसितारामची मिठाई, असे एक न अनेक हट्ट तिने पुरवले. मला अजूनही आठवतेय मी आणि माझा मामे भाऊ तासावर भाड्याने सायकल आणायचो. बिल्डिंगच्या ग्राऊंडवर आम्ही सायकल चालवायचो. नेमकी त्याच वेळी शेजारची (आमच्याच वयाची) ‘चारु’ आमच्या त्या सायकलसाठी हट्ट करुन रडायची. आम्हाला प्रेमळ विनवणी व्हायची “द्या रे बाळांनो तिला थोडा वेळ सायकल” आणि ‘ती’ च्यासाठी चारुला सायकल द्यायचो. त्या चारुचा भयंकर राग यायचा. आत्ता हसू येते. मी दुसरीत असल्यापासून तिला इंग्लिशमधे पत्र लिहायचे. त्याचे तिला कोण कौतुक! माझी मामी तिला ती पत्र वाचून दाखवायची. वर्षभराची अशी ही माझी पोस्ट कार्ड ती  जमवून ठेवायची. त्या दिवसांची आज आठवण आली की खरंच वाटते “लहानपण देगा देवा..”

तब्येतीची कुठलीही पथ्य तिने कधीच पाळली नाहीत. २ महिने आरामासाठी लेकीकडे गेली. त्याच दरम्याने तिचा मेहुणा (बहिणीचा नवरा) वारला. मुंबईत परतली आणि ही बातमी कळताच बहिणीसाठी जीव कळवळला. लगोलाग तिला भेटायला घेऊन जा असे मधल्या मुलाला म्हणाली. मुलुंडला बहिणीच्या बिल्डिंग खाली आली. बहिणीचे कसे सांतवन करु या विचाराने भावना अनावर झाल्या आणि त्यातच ह्रुदयविकाराच तीव्र झटका आला. पहिल्या पायरीवर मुलाच्या हातात प्राण गेला. वय ६३. कोणालाच विश्वास बसण्या पलिकडची घटणा. ती गेली ती तारीख २२ नोव्हेंबर. काल तिला जाऊन १८ वर्ष झाली. शेवटी काय ‘जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला’ हेच खरं.

ती गेली तो मनाला चटका लावून. ती एक आदर्श स्त्री होती -चांगली मुलगी, बहिण, पत्नी, आई, वहिनी, जाऊ, सासू, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक उत्कृष्ट आजी होती. होय… ती माझ्या आईची आई… माझी ‘आजी’! माझ्या वडिलांची आई ते लहान असतानाच गेली. त्यामुळे त्याची भरपाई म्हणून असेल कदाचित की देवाने दोन आजींची एकत्र मिळून ही अशी ‘एक’ आजी दिली. आम्ही खूप मोठे व्हावे ही तिची ईच्छा. तिने केले संस्कार नकळत आमच्यात रुजले. म्हणून की काय कोण जाणे तिच्याच सारखी माझीही (बर्‍याच उशीरा) पण नकळत शंकरावर श्रद्धा जडली. माझी बहिण डॉक्टर व्हावी हे तिचे स्वप्न. तिला क्रिकेट मधे अतिशय रुची. त्या काळी तिला हा खेळ समजत होता, टि.व्ही वर सामने बघण्यात ती मग्न होत असे. तिचीच सुप्त इच्छा असावी म्हणून माझा मामे-भाऊ क्रिकेटर (fast bowler) आहे. त्याचे क्रिकेटचे वेड अनुवंशिक आहे. सल एवढीच की हे सगळे बघायला ती आमच्यात नाहीए.  

ती गेली त्यानंतर कार्यासाठी तिचा फोटो लागणार होता. तिचा एकटीचा असा एकही स्वतंत्र फोटो मिळेना. माझ्या आजोबांचे स्नेही चित्रकार होते आणि ही वहिनी लाडकी होती. त्यांनी तिचे तरुणपणीचे इतके सुंदर portrait रेखाटले की बघत बसावे. त्यांच्या त्या म्हातार्‍या बोटांतून देखील तिच्या खातर एक सुंदर कलाकृती कॅन्वासवर अवतरली. ते आजीचे पेंटिंग आजही माझ्या मामाकडे फ्रेम करुन लावले आहे.
 
आजूनही आमच्या घरात-नात्यात-ओळखीत तिचा विषय निघाला, तिची आठवण काढली की लहान-थोर सगळेच हळवे होतात. तिच्यात ती जादू होती…!

*************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

 

Page copy protected against web site content infringement by Copyscape


अंमलबजावणी

Information

4 responses

31 07 2018
Nirupama

khupach sunder, saglech, shabd apure padat ahet.

4 01 2012
Mrs.Snehal Anil Sawant

tichaya kadun kahi nahi tari chnagle wagnyachi shikavan tari ghayvi. Kharech Abhimanane sangave ” AASHICH AAMUCHI AAI ASATI SUNDAR RUPAVATI”.Vachta vachta dole bharun aale. Khup khup chhan.Mala mazi AAi athavali.

17 12 2011
sharmistha swami

aaji……….ek shala sanskarachi,ek mandir ashirvadach,ek ghar apulkich ,ek kus kautukachi……mayechi……….

28 11 2011
studioblossoms

I think its best to say all the superbest things for your writing skills at the last….karan nantar tuzhya sarkhe amchya kade shabd sangraha nahi…Hats off Ruhide….ek no hote he…(ekdam kalajala bhidle) khup halve vichar ani khupach sutrabadh bandhani….way2go buddy…keep writing…

यावर आपले मत नोंदवा