‘ती’ – ९

20 09 2014

‘ती’ ने आग्रहाने मला तिच्याकडे बोलावले. इतकेच काय तर माझ्याकडे तेव्हा गाडी नव्हती म्हणून मला न्यायला-सोडायला स्वतः आली. मोठी व्हॅन होती तिची. आम्ही एका आलिशान घरा समोर येऊन थांबलो. या अशा घरांना ‘Single family home’ म्हणतात हे देखील माहीत नव्हते तेव्हा मला. पुढे २-३ गाड्या सहज मावतील असा drive way, घरात शिरल्यावर Living room, family room, formal dining, kitchen with island dinnette, study cum home office, master bedroom, दोन मुलांच्या bedrooms, guest room, घराखाली बेसमेंट, २ car garage, मागे मोठे backyard, ती घर दाखवत होती. दाखवता-दाखवता मुलांच्या खोल्यांपाशी ती जरा रेंगाळली. फार प्रशस्त घर होते. घराची सजावट पण अफलातून प्रकारे केली होती. फॅमीली रुम मधे, फायर प्लेसवरच्या एका सुंदर िचत्रावर माझी नजर खिळली. मुंबईच्या कोण्या चित्रकाराला ‘सांगून’ ते चित्र काढून घेतलं आहे असं मला सांगण्यात आलं.

आम्ही पहिल्यांदाच भेटत होतो. माझ्या मामीशी माहेरहून तिच्या भावाशी ओळख. ती माझ्या घराजवळ राहते ते कळल्यावर मामाने भेट घडवून आणली. शिवाय नविन लग्न करुन परदेशी आल्यामुळे ओळख व्हावी हा त्याचा हेतू.

२५-३० वर्षांपूर्वी ‘ती’ ने नवर्याच्या मागून ‘मम्’ म्हणत भारत सोडला. महत्वाकांक्षी वगैरे होती का माहीत नाही पण मुलं मोठी झाल्यावर (आणि अर्थातच तो पर्यंत ग्रीन कार्ड आले असल्यामुळे) तिने काही वर्ष नोकरी केली. ती सांगत होती – “अगं, आपले भारतीय जिन्नस, भाज्या, वस्तू सगळे मिळते आत्ता सहज इथे. आम्ही आलो तो काळ फार वेगळा होता. महिन्यातून एकदा आपल्या भाज्यांचा ट्रक यायचा एडीसनला मग आम्ही लगबगीने निघायचो. प्रत्येकाकडे गाडीही नसायची. मग काय, एकमेका सहाय्य करु…” ती बोलत होती. लग्न होऊन आलेली ती सुरुवातीला बावरलेलीच होती. नवा देश, नवे राहणीमान, नवे ऋतु…पण ती पदर खोचून तयारी लागली – इंग्रजी बोलणे, आणि त्याहून महत्वाचे गोर्यांचे उच्चार समजून घेणे, ड्रायविंग शिकणे, एकटीने ग्रोसरी करणे, नविन ओळखी, एक ना अनेक टप्पे ती पार करत गेली. पुढे मुलं झाली. आणि ती त्यांच्या संगोपनात रममाण झाली. जमतील तसे भारतीय संस्कार त्यांच्यात रुजविण्यासाठी तिची धडपड सुरु झाली. त्यात येणारी वादळं सुद्धा झेलंलीच तिने. नवर्याची प्रगती होत होती, मुलं ही मोठी होत होती. अपार्टमेंट ते टाऊन हाऊस, आणि टाऊन हाऊस ते सिंगल फॅमीली होम असे करत सुबत्तेचा हा टप्पा येऊन ठेपला.

नवरा आता Fortune 100 कंपनीमधे मोठ्या हुद्द्यावर आहे. ती मुलांविषयी कौतुकाने सांगत होती. त्यांच्या शाळा, शिक्षणं, इथली शिक्षण पद्धती, त्यांची स्पोर्टस् मधली प्रगती, त्यांचे प्रोजेक्टस्…बरेच काही. आता मुलगा रोबोटीक्स मधे आहे. मुलगी इनव्हेस्टमेंट बॅंकींगमधे. दोघेही छान सेटल झालेत. घरापासून दूर वेगवेगळ्या स्टेट्स मधे राहतात. सुट्टीला येतात. मागच्या क्रिसमसला आले होते दोघेे. मुलांच्या आठवणीने तिचा आवाज हळवा झालेला जाणवला मला. मुलांच्या खोल्यातर ते दर दिवशीच्या वापरात आहेत अशाच वाटत होत्या, फक्त टापटीप होत्या. पण बाकी मॅकबुक, इतर gadgets, पुस्तकं सगळे काही रोजवर्णीचे वाटावे असे होते.

ितने मला काहीतरी खायला दिले. थोड्या वेळ बसल्या नंतर तिने मला घरी सोडले. ती गेली तशी तिच्या विषयीच्या विचारांत मी गुंतले. कुठे तरी खाेलवर तिचा एकटेपणा मनाला टोचत राहिला. एवढ्या मोठ्याला घरात दोघंच राहतात, त्यात दिवसभर नवरा कामावर, ही एकटीच!

उत्तरायणाकडे झुकलेल्या तिच्या आयुष्यात एक िवचित्र पोकळी दिसायला लागली. पिल्लं उडून गेलेलं ते ‘ती’चं सुबक घरटं अचानक भकास वाटायला लागलं…

************
‘ती’ शृंखला –

‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape


अंमलबजावणी

Information

१ प्रतिसाद

26 09 2014
Pradnya Mulye

tula kay mhanayachay te yogya shabdat sangata yete Ruhi…
I can say only one word “perfect” !
Last 2 lines… ekdam chan…
~Pradnya

यावर आपले मत नोंदवा