‘ती’ – ८

13 09 2014

दर वर्षी वटपोर्णिमेला मला या ‘ती’ ची आठवण येते. अगदी न चुकता! लग्ना आधीची सुद्धा कित्तेक वर्ष ‘वट पोर्णिमा’ म्हटले की याच डोळ्यांसमोर येत. आत्ता ही याच येतात.

त्यांचे नाव ‘शुभांगी घाणेकर’. पण सहसा उल्लेख ‘घाणेकर बाई’ असा. आमच्या घरी त्या घरकामाला होत्या. बारीकशा, सावळ्या, बेताची उंची, एक वेणी, तोंडावर वांगाचे डाग, गरिबीला साजेसे बसलेले गाल, पण वावर चुणचुणीत, कष्टाळू, कामाचा उरक भयंकर! माझी आई त्यांना “कामाला वाघ आहेत” असे कौतुकाने म्हणायची. त्यांचे घर बरेच लांब होते. साधारण अर्धातास चालून मग होडीने तरं आेलांडून त्यांचे गाव होते. त्यांची ३-४ घरकामं होती आणि त्या कामांसाठी त्यांना येणे भाग होते.

दोन लहान मुलगे, नवरा आणि या. त्यांचा नवरा अगदीच ऐतखाऊ नव्हता. कुठेकुठे हंगामी गवंडी कामाला होता खरा पण त्याची कमाई दारुत घालवायचा. मग मारहाण, शिवीगाळ हे ओघाने आलेच. तो दिसायला बराच बरा, बाईंहून तरुण व लहान वाटायचा. कष्टांनी बाई खंगल्यासारख्या दिसायच्या. त्यांच्याच कमाईवर घर चालायचे. शिवाय नवर्याला काम नसेल तेव्हा त्याच्या दारुला पण या पैसे पुरवायच्या. मोठा मुलगा असेल ५-६ वर्षांचा, तो बोला-चालायला चुणचुणीत होता. छोट्या २.५ – ३ वर्षांचा, रडका, मुडदुस झाल्यासारखे हात-पाय होते. या मुलांसाठी त्या जगत होत्या. माझी आई त्यांना लागेल ते पुरवायची. कुठे सणावाराला कपडे, कुठे खाऊ, साबण, कुठे छत्री, कुठे पुस्तकं-दप्तर. बाईंचे जेवण आमच्याकडेच होते. त्या छोट्याला दर दिवशी बटाट्याची भाजी लागायची. माझी आई न चुकता एका बटाट्याला फोडणी देत असे, मग घरी कुठलीही भाजी असो. आम्ही तिला बोलायचो की फार लाडावून ठेवतेस बाईंच्या मुलाला पण आमच्याकडे लक्ष न देता आई त्यांना प्रेमाने जेवू घालायची.

एकदा बाईंचे काहीतरी बिनसले होते. चेहरा, अंग काळे-निळे पडलेले. त्याचच त्या कामात असताना त्यांचा नवरा आमच्या दाराशी येऊन त्यांना दारुच्या नशेत िशव्या देऊ लागला. माझ्या वडिलांनी पोलिसांची भीती घालून त्याला पळवून लावले. त्यांच्या गावाकर्््यांना पण हे यांचे प्रकरण ठाऊक होते. थोडे दिवस गेले की बाईंच्या नवर्याला कोण जाणे पण ही अवकळा लागत असे. पुन्हा एके दिवशी असेच झाले आणि तो ढोरासारखे बाईंना मारताना त्यांचे शेजारी मध्ये पडले आणि याला पोलिसांच्या हवाली केले.

बाई उशीरा घरी आल्या. आणि आल्या त्या रडतच. झाला प्रकार कळल्यावर खरंतर आम्ही आनंदलोच. “बरं झालं गजा आड केला, पोलिसी खाक्या मिळेल तेव्हाच डोळे उघडतील या राक्षसाचे” असा विचार मनात आला. पण बाईंचे काहीतरी वेगळेच. त्या पोलिसांशी मध्यस्ती करुन नवर्याला सोडविण्यात मदत करा अशी याचना माझ्या वडिलांना करत होत्या. आम्हा भावंडांचे डोकंच सटकले. ‘अरे काय बाई आहे??? जीवावर बेतेल असा मार खाते दारुड्या नवर्याचा तरी त्याचाच पुळका???’ रागच आला होता बाईंचा. अजाणच वय ते आमचे. सुदैवाने माझ्या वडिलांनी तिला मदत केली. आणि शेवटी एकदाचा त्यांचा नवरा सुटला कोठडीतून.

दुसर्या दिवशी बाई कामावर आल्या. आईचा उपास होता. चहा घेत त्या आईला म्हणाल्या “माझाही उपास आहे. आज वट पोर्णिमा ना!”. आम्हाला हसावे की रडावे कळेना!!! एवढे रामायण झाले तरी…एक जन्म काढताना जड आणि हा नवरा हवा त्यांना ७ जन्म!

मी स्त्रीमुक्ती, स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीसमानता वगैरेची पुरस्करती! एकीकडे असा विचार आला की ही बाई का एवढे सहन करते? सोडून का नाही देत अशा व्यसनी माणसाला? तसंही हीच रेटतेय संसारा(?) चा गाडा…मग का अजूनही स्वतःला अबला समजते? केवळ अशिक्षित आहे म्हणून? की माहेरचा पाठींबा नाही म्हणून? की लोकलज्जेस्तव? पण जगाला माहीत आहेच नवरा कसा आहे ते. दुसरीकडे वाटले किती सहनशील असावे कोणी? की जीव गुंतलाय? की ‘आपले’ माणूस कसेही वागले तरी ‘आपले’च हे संस्कार उराशी बाळगून जगणार अशा बायका मरेपर्यंत आणि आयुष्यभर असेच संसाररुपी आगीत सरपणासारख्या जळत राहणार? अशीच व्यथा अनेक कष्टकरी स्त्रियांची आहे. आपण मदतीचा हात जरी पुढे केला तरी त्या तो घेतीलच असं नाही. मग होईल ती (आणि त्यांना मानवेल ती) मदत करण्या पलीकडे आपल्या हातात काहीच उरत नाही!

आई बाईंच्या त्या छोट्या मुलाला दररोज का बटाट्याची भाजी बनवून द्यायची, का त्यांना हवे-नको ते बघायची, व माझे वडिल का त्या दिवशी बाईंच्या नवर्याला सोडवून आणायला त्यांच्या सोबत पोलिस स्टेशनला गेले या आणि अशा अनेक प्रश्नांची कोडी आपोआप उलगडत गेली…

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १

Page copy protected against web site content infringement by Copyscape


अंमलबजावणी

Information

4 responses

9 06 2017
Gayatri

Chan lihites 👍

9 06 2017
Aarati

I second ur friends above comments….. hach message karaila tuzya “bhinti” war aale hote 😊. Love reading ur blogs. As soon as I was getting some downtime in between meetings I was reading it. Khup surekh lihites!!! Keep writing ….

9 06 2017
Tarangini

‘Garibila saajese baslele gaal’- you have a true gift for prose, you bring your characters to life. Maybe one day your blog can be published as a book? I would buy it, and read it over and over again.

20 09 2014
Mohana

<<>> हे झालं अशिक्षित, कामवाल्या बाईंचं वागणं. पण अशा कितीतरी स्रिया आहेत, प्रत्येकीची कारणं वेगळी हेच खरं.

यावर आपले मत नोंदवा