‘ती’ – २०

19 09 2015

माझ्या ऑफिसमधे काही भारतीय सहकारी होते. ‘ती’ ही त्यातलीच एक. सगळ्यांशी ‘ती’ फटकून वागायची. म्हणून सगळे तिला बिचकून असायचे. सहसा ‘ती’ च्या वाट्याला कुणी जायचे नाही. मी मराठी आहे हे कळल्यावर ती डेस्कपाशी थांबली. मोघम कोण-कुठली हे बोलणे झाले. तिचे किस्से एकून, रवैय्या बघून, एरवी मराठीचा धागा जुळला की स्वत:हून बोलायला जाणारी मी तिच्यापासून चार हात लांबच होते.

‘ती’ मुंबईची, आय.आय.टी. ची, पुढे इकडे एम.एस्. केले, कॉम्पूटर फिल्डमधे आली कारण इतरांच्याहून लवकर ग्रीन कार्ड मिळते, दिसायला काळी-सावळी, उंच, दांडगत, गळ्यापर्यंतचे पिंजारलेले केस, उद्धत वाटावे असे बोलणे, अजागळ राहायची. तिच्याबद्दलचे मत सिद्ध व्हावे असाच तिचा आविर्भाव.

दर आठवड्याला मिटींगच्या शेवटी दोन नविन जणांनी स्वतःची ओळख करून द्यायची हा पायंडा पाडलेला – नाव, शिक्षण, गाव (गावाची थोडक्यात ओळख), अनुभव. त्याप्रमाणे ‘ती’ची पाळी आली. ‘ती’ आपल्या मुंबईबद्दल काय बोलते ते ऐकायला मी उत्सुक झाले. मुंबईची ओळख करुन देताना ‘ती’ म्हणाली – “what to tell you about Mumbai?ummmm…it is famous for slum areas. You guys must have watched ‘Slumdog millionaire'”. मुंबईची ही अशी ओळख करुन देणारी ही पहिलीच महाभाग! मला अगदीच न राहवून मी म्हणाले “अगं, मुंबईची ही एवढीच ओळख???”. मग काहीतरी थातूरमातूर बडबड करून ‘ती’ खाली बसली. पुढे काय बरळली ते संतापाच्या भरात मला ऐकू आले नाही. अमेरिकेसाठी जे महत्व न्यू योर्कला, ते भारतात मुंबईला! पण तिच्याकडून दुसरी काय अपेक्षा?

मी कॉफी तयार करायला पॅन्ट्रीमधे गेले की ‘ती’च्याशी गाठ पडायची. हळूहळू आम्ही बोलू लागलो. माझ्यापेक्षा ‘ती’च बोलू लागली… ‘ती’ चा लेटेस्ट बॉयफ्रेंड हाफ अमेरिकन-हाफ युरोपियन होता. तो ड्रगस् वगैरे घ्यायचा. मग पोलिसांनी त्याला पकडले आणि ‘आत’ टाकले. नंतर यांचे फाटले. ‘ती’ काही कारण नसताना मला सांगत होती. ‘ती’ने स्वत: तसे काही केलंय असं सांगितले असते तरी मला आश्चर्य वाटले नसते. ‘ती’ सुद्धा डिप्रेशन मधे होती. काही काळ तिने ईलाज घेतला त्यावर. नंतर एकदा मला म्हणाली,”तुझ्या ओळखीत एखादे मराठी स्थळ (अर्थात अमेरिकेत राहणारे) असेल तर मला सुचव. फक्त एकच अट आहे की मला मुलं नकोत.” मुलं होऊ देणं, न देणं हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे व मी तिच्या निर्णयाचा आदर करते. पण त्यामागचे तिचे कारण मजेशीर वाटले. मी गप्प ऐकून घेतले. तसंही मी तिच्या फंदात पडणार नव्हते.

आम्ही ‘मत्सालय’ पाहायला जाण्याचा बेत आखलाय हे कळल्यावर ‘ती’ स्वत:हून आम्ही न बोलावता आमच्याबरोबर येते म्हणाली. मीही तिला नको म्हंटले नाही. निघायला जमल्यावर सांगते,”माझ्या गाडीत सगळा पसारा असतो. माझी गाडी म्हणजे माझा संसारच आहे. अजून एका व्यक्तीलाही बसता येणार नाही. उलट मीच तुमच्या गाडीत येते.” सगळ्यांच्या कपाळावर आठ्या आल्या. कारण ज्याच्या गाडीत जागा शिल्लक होती त्याचे घरचे वाय-फाय, शेजारी होती म्हणून, ही बया न विचारता (निर्ल्लजपणे फुकट) वापरत होती. असो.

ऑफिसमधील लोक एकदम आश्चर्यचकित झाले होते की कोणाशी न बोलणारी ‘ती’ माझ्याशी काय बोलत असते! आणि ‘ती’ जे काही मला सांगायची ते इतरांना सांगण्या पलिकडचे होते. पण त्याचबरोबर ती मला ‘वेड पांघरुन पेडगावला नेणार’ नाही याची मी काळजी घेतली. मी भारतात परतले आणि संपर्क तुटला. ठेवावा एवढी मैत्रीही नव्हती.

काही वर्ष लोटला व अचानक ‘ती’ने मला सोशल साईट वर रिक्वेस्ट पाठवली. विस्मृतीत गेलेल्या ‘ती’च्या सगळ्या स्मृती (फार रंजक नव्हत्या तरी) पुन्हा जाग्या झाल्या.

‘ती’ ने आपली एक-एक पानं माझ्याचसमोर का उघडी केली देव जाणे. आणि मी तरी तिचे बोलणे का ऐकून घेतले? काय गोम होती कुणास ठाऊक? ‘ती’च्याशी बोलण्यात दवडलेल्या माझ्या आयुष्यातल्या वेळेवर ‘ती’चे नाव लिहिलेलं होते बहुतेक!

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape


अंमलबजावणी

Information

१ प्रतिसाद

20 09 2015
Rashmi Ghude

तु लिहीलेले सगळेच लेख अप्रतिम आहेत.

यावर आपले मत नोंदवा