‘ती’ – २२

24 10 2015

तो माझा पहिला बालमित्र. आम्ही एकाच वयाचे, एकाच वर्गात. ‘ती’, त्याची ‘आई’. ‘ती’ माझ्या आईच्या भीशी ग्रूपमधेही होती. एकाच कॉलनीत रहायचो आम्ही. आम्हा मुलांशी तशी ती प्रेमाने वागायची. मला आवडते म्हणून ‘नेसकफे’ची कॉफी तिने केल्याचे अजून आठवते. परक्यांशी नीट वागणारी ‘ती’ आपल्या मुलाशी मात्र असे का बरं वागली असेल?

‘ती’ सरकारी नोकरीत होती. नवरा खाजगी नोकरीत. सोन्या सारखा मुलगा. ‘दृष्ट लागावा असा संसार’ अशी म्हण आहे ना, तशी खरंच दृष्ट लागली बहुतेक… ‘ती’ तिच्याच बरोबर काम करत असणाऱ्या एक पुरुषाच्या नादी लागली. प्रेमात पडली, की नादी लागली, की त्याने तिला नादी लावले? कोणताही वाक्प्रचार वापरा अर्थ एकच! भरल्या संसारात ‘ती’ला हे वेगळेच डोहाळे लागले. ‘ती’ कोण्या आईंची भक्त होती. त्यांच्या सत्संगालाही जायची. तिथेही तो बरोबर असायचा. खरं खोटं देवच जाणो. पण हळूहळू तिचं मनं संसारातून उडायला लागले. तिच्या या वागण्याने ‘ती’ चर्चेचा विषय होऊ लागली.

मनाचे ऐकून, जनाची पर्वा न करता एके दिवशी ‘ती’ने घर सोडले. ‘ती’ व्यभिचारी ठरली. तेव्हा फार काही समजण्याची अक्कल नव्हती, तरी काहीतरी घडले हे कळले होते. सात-आठ वर्षांच्या माझ्या मित्राकडे सगळे ‘बिचारा’ म्हणून बघू लागले. त्याची आई कुठेतरी निघून गेली हे ऐव्हाना मित्रमंडळीत समजले होते. त्याच्या आई बद्दल त्याला एका चकार शब्दानेही विचारायचे नाही असा माझ्या घरुन दंडक होता. तेव्हा बालवयातही तिचा राग आला होता. एकदा तो मित्र चिक्कार आजारी पडला. हॉस्पिटल मधे होता. माझ्या आईनेही डबे पुरविल्याचे आठवते. पण तेव्हाही त्याची आई आली नव्हती. आई म्हणजे मायेचा निर्झर…हक्काची कुशी…प्रेमाची पराकाष्ठा! काय परिणाम झाला असेल त्या निरागस, निष्पापी मुलावर?

मित्राच्या घरी गावाहून आजीला आणले गेले. त्यांनी राहती जागा सोडली व दुसरीकडे राहायला गेले. पण आम्ही एकाच वर्गात, मैत्री होतीच, शिवाय एकाच ठिकाणी शिकवणी. दररोज भेट होत असे. सगळी मुलं एकत्र एकएकाच्या घरी खेळायला जमायचो. त्याची आजी फार लाड करायची त्याचे. आजी त्याला द्यायची ती लोणी-साखरेची वाटी अजून डोळ्यांसमोर येते. त्याच्याकडे ‘टेबल क्रिकेट’ चा खेळ होता. BSA SLR ची सायकल होती. इतरही चिक्कार खेळ होते पण कुठेतरी काहीतरी सलत होते. त्याच्यातही आणि आम्हा मुलांच्या मनातही!

पुढे आठवीत त्याचे कुटुंब(?) डोंबिवलीला निघून गेले. तरी दर वर्षी मे महिन्यात तो व त्याचे वडिल रत्नागिरीला येत असत तेव्हा आमच्याही घरी यायचे. दहावी नंतर विशेष थेट संपर्क राहिला नाही पण कोणा ना कोणा कडून हालहवाल कळायचा. घटस्फोट केव्हाच झाला. याच्या वडिलांनी दुसरा विवाह केल्याचे ही समजले.

‘ती’ ने मुंबईला बदली घेऊन त्या माणसाबरोबर राहत होती. ‘ती’ला संसारात कशाची कमी भासली असावी की तिने नवऱ्यासोबत मुलाचाही विचार केला नाही! व्यभिचार करायला का प्रवृत्त झाली ती? नवऱ्याची काही चूक होती?की मुळातच तिला हवा तसा जोडीदार नवऱ्यात मिळाला नाही? तिने उचललेलं पाऊल योग्य की अयोग्य हे तिलाच ठाऊक पण त्याने ऐहिक दृष्ट्या ‘ती’ तिरस्काराला पात्र ठरली. एक आई म्हणून ‘ती’ चुकलीच अाहे, असेल! पण एक ‘बाई’ म्हणून खरच ती चुकली का हे सांगणे तितकेच कठिण!

काहीही असो ‘ती’ मनावर एक वेगळाच ठसा उमटवून गेली. ‘ती’ ज्या आईंना मानायची, त्यांनी चांगलेच वर्तन करायची शिकवण दिली ना? मग हिने ते नाही आत्मसात केलं? पुढे अनेक वर्ष का कोण जाणे पण माझ्या डोक्यात त्या ‘आईं’ बद्दलही तिडीक गेली होती.

काही काळाने ‘ती’ गेल्याची बातमी आली. बराच पैसा-अडका मुलाच्या नावाने ठेवून ती गेली. मुलाने अग्नी द्यावा व अंतिम कार्य करावे ही ‘ती’ ची शेवटची ईच्छा होती. मुलाने ती पूर्ण केली की झिडकारुन टाकली हे माहित नाही. मुलाने ‘मुलाचे’ कर्तव्य पार पाडायला, ‘ती’ने कुठे ‘आई’ची कर्तव्य पार पाडली होती?

************

‘ती’ शृंखला –

‘ती’ – २१
‘ती’ – २०
‘ती’ – १९
‘ती’ – १८
‘ती’ – १७
‘ती’ – १६
‘ती’ – १५
‘ती’ – १४
‘ती’ – १३
‘ती’ – १२
‘ती’ – ११
‘ती’ – १०
‘ती’ – ९
‘ती’ – ८
‘ती’ – ७
‘ती’ – ६
‘ती’ – ५
‘ती’ – ४
‘ती’ – ३
‘ती’ – २
‘ती’ – १
Page copy protected against web site content infringement by Copyscape


अंमलबजावणी

Information

यावर आपले मत नोंदवा